‘पॅन’शी आधार जोडताना करदाते हैराण

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 28 जुलै 2017

आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना 

गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे दोन महिन्यांपासून आयकर विभागाने दिल्या होत्या; मात्र आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्यावर करदाते जागे झाले आहेत. आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची प्रक्रिया करताना त्यांना अडचणी येत आहेत.

आधार लिंक न झाल्यास विवरणपत्र भरावे - आयकर विभागाची सूचना 

गुहागर - आधार कार्ड पॅन कार्डशी जोडण्याच्या सूचना सुमारे दोन महिन्यांपासून आयकर विभागाने दिल्या होत्या; मात्र आयकर विवरणपत्र भरण्याची अंतिम तारीख जवळ येऊ लागल्यावर करदाते जागे झाले आहेत. आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याची प्रक्रिया करताना त्यांना अडचणी येत आहेत.

गेले दोन ते तीन महिने आधार कार्ड पॅन कार्डला जोडण्याबाबतचे संदेश विविध माध्यमांमधून जनतेपर्यंत पोचविण्यात येत आहे; मात्र या सूचनेकडे दुर्लक्ष केलेल्या अनेक करदात्यांना विवरणपत्र भरण्याच्या अंतिम क्षणी आधार ‘पॅन लिकिंग’ प्रक्रियेत अडचणी निर्माण होत आहेत. वास्तविक पॅन कार्डला आधार कार्ड जोडण्याची प्रक्रिया सोपी आणि सरळ आहे. सर्च इंजिनवर आधार कार्ड पॅन कार्ड लिंकिंग असे टाकल्यावर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळाची माहिती येते. या संकेतस्थळावर गेल्यावर प्रथम पॅन कार्ड क्रमांक टाकला की तो आपोआप तपासला जातो. त्यानंतर आधार कार्ड क्रमांक टाकण्याची चौकट समोर येते. याठिकाणी आधार कार्ड क्रमांक टाकल्यावर मोबाईल क्रमांकावर ओटीपी क्रमांक येतो तो टाकल्यावर आधार कार्ड पॅन कार्डला जोडले गेल्याचा संदेश आपल्याला दिसतो. 

आधार कार्ड काढण्याची प्रक्रिया सुरू असताना दिलेला मोबाईक क्रमांक, ईमेल आयडी आठवत नसल्याने, बदलल्याने अनेकांची पंचाईत झाली आहे. शिवाय खासगी आधार कार्ड काढून देणाऱ्या तत्कालीन सेवाकेंद्रांनी संपूर्ण माहिती भरली नसेल, नाव आणि पत्त्यामध्ये गडबड केली असेल तरीही आधार कार्ड लिंक होत नाही. अनेकांनी त्यावेळी सेवा केंद्राने दिलेल्या स्लीप तपासून पाहिल्या नाहीत. प्रत्येक तालुक्‍यात आधार कार्डची सेवा देणारे एक किंवा दोन सेवा केंद्र सुरू आहेत. एनएसडीएल कंपनीमार्फत चालविली जाणारी अनेक खासगी सेवा केंद्र लोकांनीच तक्रारी केल्यामुळे बंद पडली आहेत. त्यामुळे चुकीची दुरुस्ती करण्यासाठी आधार कार्डधारक करदात्यांना सेवाकेंद्राची शोधाशोध करण्याची वेळ आली आहे. नेहमी विवरणपत्र भरून घेणारे चार्टर्ड अकौंटंटही ग्राहकाचे आधार, पॅन जोडले जात नसल्याने हैराण झाले आहेत. त्यांच्याकडे विवरणपत्राचे तयार काम या एका अडचणीमुळे खोळंबले आहे. उरलेल्या तीन दिवसांत हे काम कसे पूर्ण करायचे अशी चिंता चार्टर्ड अकौंटंटना लागली आहे. 

आधार कार्ड लिंक झाले नसले तरीही ३१ जुलैच्या आत करपत्रक भरावे, असे आवाहन आयकर विभागाने केले आहे. तसे पत्र आजच प्राप्त झाले आहे.
- सुमेध करमकर, चार्टर्ड अकौंटंट, चिपळूण

आधार कार्ड सेवा केंद्राच्या तक्रारीमुळे व चुकीच्या कामामुळे शासनाने खासगी सेवा केंद्रे तीन महिन्यांपूर्वी बंद केली होती. नवीन आधार कार्ड केंद्र सुरू करण्याबाबत प्रशासनाकडून प्रक्रिया सुरू आहे. ऑगस्टअखेर जिल्ह्यातील प्रत्येक मंडलात एक याप्रमाणे आधार कार्ड सेवा केंद्र सुरू होतील.
- रोहित जाधव (आधार कार्ड खात्याचे जिल्ह्याचे प्रमुख)

Web Title: guhagar konkan news tax payer confuse by pancard & aadhar card connected