''अधिकारी आमदारांना भेटत नाहीत; शासनाची परिपत्रके काढून कारभार करतात''

सकाळ वृत्तसेवा
Friday, 13 November 2020

भास्कर जाधव; आढावा बैठकीत खंत आली उफाळून

रत्नागिरी : जिल्ह्यात नवीन वरिष्ठ अधिकारी आला की आमदारांना फोन करून सांगणे किंवा भेटणे हे सर्वसाधारण प्रघात आहे; मात्र अधिकारी आमदारांना भेटत नाहीत. केवळ शासनाची परिपत्रके काढून कारभार सुरू आहे. एखादे शिष्टमंडळ आले तर खुर्चीतून उठत नाहीत. अशा भाषेत गुहागरचे आमदार भास्कर जाधव यांनी आढावा बैठकीत शासकीय अधिकाऱ्यांची कानउघाडणी केली. 

भास्कर जाधव यांनी नेहमीच्या आपल्या खड्या आवाजात सभागृहात शिष्टाचाराचा पाढा अधिकाऱ्यांसमोर वाचला. जिल्ह्यातील विविध प्रश्‍नांसंदर्भात पालकमंत्री अनिल परब यांनी काल ता. ११ रोजी आढावा बैठकीचे आयोजन केले होते. ‘निसर्ग’ चक्रीवादळ, अवकाळी पाऊस, कोरोना, जिल्हा नियोनज आदींचा आढावा त्यांनी या बैठकीत घेतला. बैठकीत मंत्री उदय सामंत, आमदार शेखर निकम, राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने, सर्व खात्याचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. राजकीय शिष्टाचाराबद्दल यापूर्वीदेखील माजी खासदार अनंत गीते यांनी, तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना सुनावले होते. अधिकारी राजकीय पुढाऱ्यांना गृहीत धरत असल्याची खंत भास्कर जाधव यांच्या मनात होती.

हेही वाचा- तीन पाटलांची प्रतिष्ठा पणाला; आघाडीतील बिघाडी कोणाच्या पथ्यावर -

काल बैठकीत आक्रमक होऊन त्यांनी ही भडास काढली. ते म्हणाले, जिल्ह्यात नवीन शासकीय वरिष्ठ अधिकारी हजर झाल्यानंतर त्यांनी आमदारांना फोन करून सांगणे किंवा भेटणे हा सर्वसाधारण प्रघात आहे; मात्र जिल्ह्यात असे घडत नाही. अधिकारी आमदारांना भेटत नाहीत, हे अधिकारी केवळ शासनाची परिपत्रके काढून कारभार करत आहेत. एखादे शिष्टमंडळ भेटायला गेले तर हे अधिकारी खुर्चीमधून उठत नाहीत. डाव्या हाताने निवेदन स्वीकारतात, असे अधिकाऱ्यांना सुनावले. 

एकमेकांचा आदर ठेवा..
पालकमंत्री अनिल परब म्हणाले, ‘सर्वांनी एकमेकांच्या समन्वयाने काम करायला हवे. एकमेकांचा मान-सन्मान राखणे आवश्‍यक आहे. मी मंत्री म्हणून तुम्हाला विनाकारण अपमानित केले तर तर ते योग्य नाही. अधिकाऱ्यानी एकमेकांचा आदर ठेवून काम करा,’ असे सांगितले.

संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guhagar MLA Bhaskar Jadhav criticize government officials at the review meeting