गुहागर तालुक्‍यात एकाच कुटुंबातील 32 व्यक्ती पॉझिटिव्ह 

राजेश लिंगायत
Sunday, 19 July 2020

दीड महिना कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या गुहागर तालुक्‍यात आज 26 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 49 वर पोचली आहे.

गुहागर : दीड महिना कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या गुहागर तालुक्‍यात आज 26 रुग्णांची भर पडली. त्यामुळे कोरोना रुग्णांची संख्या 49 वर पोचली आहे. यामध्ये एकाच कुटुंबाशी संबंधित रुग्णांची संख्या 32 आहे, तर शृंगारतळी, चिखली परिसरातून काताळे नवानगर, पेवे या दोन गावातही कोरोना पोचला आहे. 

तालुक्‍यात 7 जुलैला पहिला रुग्ण सापडल्यानंतर त्याच्या संपर्कात आलेल्यापैकी 61 जणांचे स्वॅब एका दिवसात घेण्यात आले होते. या 61 पैकी 26 स्वॅबचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. यामध्ये सर्वाधिक 24 रुग्ण चिखली गावातील आहेत. हे 24 रुग्ण एकाच कुटुंबाशी संबंधित आहेत. त्यामुळे चिखली गावातील रुग्णसंख्या वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. हा धोका लक्षात घेऊन चिखली गावाला केंद्रीभूत ठेवून 1 किमीचा परिसर आयसोलेट करण्यात आला आहे. 

जुलैच्या महिन्यात 13 रुग्ण शृंगारतळीतील, 34 चिखलीत, पेवे आणि काताळे नवानगर या दोन गावात प्रत्येकी 1 अशी तालुक्‍यातील कोरोना रुग्णांची संख्या 49 वर पोचली आहे. अजूनही सुमारे 25 स्वॅबचा तपासणी अहवाल येणे बाकी आहे. त्यामुळे जुलै महिन्यात गुहागरमधील कोरोना रुग्णांची संख्या अर्धशतक पार करणार हे जवळपास निश्‍चित आहे. तालुक्‍यातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या 73 वर पोचली आहे. त्यापैकी 22 रुग्ण बरे झाले तर 2 मयत झाले. सध्या कोरोनाग्रस्त रुग्ण 49 आहेत. 

 

संपादन : प्रफुल्ल सुतार 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In Guhagar taluka, 32 persons from the same family tested positive