बापरे ! चिपळूणात चक्क गुटखा निर्मितीचे कारखाने

मुझफ्फर खान
Monday, 9 November 2020

मात्र बाहेरच्या राज्यांऐवजी चिपळूण तालुक्यातच गुटखा तयार होत असल्याचे समोर आले आहे.

चिपळूण (रत्नागिरी) : राज्यात गुटखा बंदी असताना चिपळूणात अवैधरित्या गुटखा निर्मिती केली जात आहे. येथे तयार होणार्‍या गुटख्याची राज्यात मोठ्या प्रमाणात विक्री होते. यातून कोट्यवधी रुपयाची उलाढाल होत आहे. काही दिवसापूर्वी चिपळूणात 26 लाखाचा गुटखा जप्त करण्यात आला. तिघांना ताब्यात घेण्यात आले. गृहमंत्र्यांच्या नव्या आदेशानूसार तिघांवर आता मोक्का अंतर्गत कारवाई होणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

हेही वाचा - एसटी कंडक्टरच्या मृत्यूचे गूढ कायम ; मृतदेह गळफास लावलेल्या अवस्थेत पाहून सर्वच चक्रावले -

2012 मध्ये आघाडी सरकार असताना राज्य सरकारने राज्य गुटखा मुक्त करण्याचा निर्णय घेतला होता. पण बाहेरच्या राज्यातून महाराष्ट्रात गुटखा येत असल्यामुळे राज्यात ठिकठिकाणी गुटखा विक्री मोठ्या प्रमाणावर आणि खुलेआम होत आहे. मुंबईत झालेल्या मागील अधिवेशनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याविषयाकडे महाविकास आघाडी सरकारचे लक्ष वेधले होते. गुटखा निर्मिती आणि वाहतूक यावर आळा बसवण्यासाठी राज्य सरकार गुटखा आणणारे आणि विकणारे यांच्यावर मोक्का अंतर्गत कारवाई करेल असे, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी जाहिर केले होते. 

मात्र बाहेरच्या राज्यांऐवजी चिपळूण तालुक्यातच गुटखा तयार होत असल्याचे समोर आले आहे. चिपळूण तालुक्यात ठिकठिकाणी गुटखा निर्मितीचे छोटे कारखाने आहेत. तेथे मोठ्या प्रमाणात गुटखा तयार करून तो राज्याच्या वेगवेगळ्या भागात पाठवला जात आहे. जुलै 2019 मध्ये पोलिसांनी कामथे येथील एका बंगल्यावर छापा टाकला होता. बंगल्यात गुटखा निर्मिती केली जात होती.

पोलिसांनी येथून 15 पोती गुटखा व गुटखा निर्मितीचे साहित्य जप्त केले होते. त्याअगोदर पोलिसांनी कालुस्ते जांभुळ वाडी येथील गुटखा निर्मितीच्या कारखान्यावर धाड टाकली होती. येथून 60 हजार रुपयाचा गुटखा आणि 16 लाख 84 हजार 510 चा मुद्देमाल जप्त केला होता. शहरात अनधिकृत गुटखा निर्मिती केली जात असल्यामुळे गुटख्याची वाहतूक आणि निर्मिती करणार्‍यांवर मोक्का अंतर्गत कारवाई व्हावी. अशी मागणीही शहरातून होत आहे. 

हेही वाचा - अपारंपरिक ऊर्जास्रोतांचा उपयोग करत तरुण खेळवतोय २४ तास वीज -

"चिपळूण पोलिसांनी मागील काही दिवसांत गुटख्यासंबंधी तिसरी मोठी कारवाई केली. त्यामध्ये तिघांना रंगेहात पकडण्यात आले. हा गुटखा नेमका कोठून आणला गेला. कोणत्या भागात त्याची वाहतूक केली जाणार होती. माल कोण खरेदी करणार होता. याची माहिती या तिघांकडून घेण्याचे काम सुरू आहे. तालुक्यात कुठेही गुटखा निर्मिती होत असल्याचे आढळल्यास पोलिसांना माहिती द्या. आम्ही कारवाई करू. "

- देवेंद्र पोळ, पोलिस निरिक्षक चिपळूण 

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: gutkha manufacturing company increased in chiplun ratnagiri now a days