चिपळूणात गुटख्याची तस्करी ; दोन वाहनांसह 26 लाखांचा मुद्देमाल जप्त 

मुझफ्फर खान
Saturday, 7 November 2020

पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला या घटनेची माहिती दिली.

चिपळूण - शहरातील खाटीक आळी येथे पोलिसांनी छापा टाकून गुटख्यांनी भरलेली दोन वाहने जप्त केली. एकूण 26 लाखाच्या मुद्देमालासह तिघांना अटक करण्यात आले आहे. आटीकआळी परिसरातील मटण मार्केटजवळच्या नजराणा अपार्टमेंट परिसरात शुक्रवारी सांयकाळी ही घटना घडली. 

याबाबत पोलिस ठाण्यातून मिळालेल्या माहितीनुसार, अंकुश केसरकर, संदिप पाटील (दोघे रा. सावंतवाडी जि. सिंधुदुर्ग ) हे गुटख्यांनी भरलेली मारूती इको (एमएच 08, एन.7793), आयशर टेम्पो (एमएच 07, एक्स 862) घेवून चिपळूण शहरातील खाटीक आळी परिसरातील मुश्ताक कच्छी यांच्याकडे आले होते. दोन गाड्या भरून अनधिकृतपणे गुटखा विक्रीसठी चिपळूणात आल्याची माहिती परिसरातील नागरिकांना मिळाली. जागरूक नागरिकांनी याबाबतची माहिती चिपळूण पोलिसांना दिली. पोलिसांचे एक पथक सांयकाळी चार वाजता घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी केसरकर व पाटील यांच्याकडे गाडीतील मालाबाबत विचारणा केल्यावर त्यांनी उत्तर देण्यास टाळाटाळ केली. पोलिसांनी गाडीची तपासणी केल्यानंतर त्यात गुटखा असल्याचे आढळून आले. हा गुटखा कुणाच्या सांगण्यावरून आणला आणि गुटख्याची विक्री कुठे होणार होती याची माहिती पोलिसांनी विचारल्यावर त्यांनी उत्तर देण्यास नकार दिला. त्यानंतर दोघांनी मुश्ताक कच्छी यांचे नाव घेतले.

हे पण वाचा - राणेंच्या पराभवाला कारणीभूत असलेल्यांनी आता फक्त अस्तित्वाचीच काळजी करायची  

पोलिसांनी अन्न व औषध प्रशासन विभागाला या घटनेची माहिती दिली. अन्न सुरक्षा अधिकारी दशरथ बांबळे रत्नागिरीतून चिपळूणात दाखल झाले. पोलिस, अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कर्मचार्‍यांनी घटनेचा पंचनामा केल्यानंतर श्री. बांबळे यांनी पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानूसार चिपळूण पोलिस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली आहे. गुटख्यासह दोन्ही वाहने जप्त करण्यात आली आहेत.
 

संपादन - धनाजी सुर्वे  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gutkha smuggling in Chiplun