esakal | सामाजिक क्षेत्रातून वेळ काढत आपली मूर्तीकला जपणारा मूर्तीकार
sakal

बोलून बातमी शोधा

handmade ganesh sculpture made by socialist deepak nagale in ratnagiri

मुर्तीकलेचा वारसा गेल्या दोन दशकांपासून जोपासला आहे

सामाजिक क्षेत्रातून वेळ काढत आपली मूर्तीकला जपणारा मूर्तीकार

sakal_logo
By
राजेंद्र बाईत

राजापूर : लोकप्रतिनिधी म्हणून सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत मिळणारा अपुरा कालावधी, त्यामधूनही उपलब्ध वेळेचा सदुपयोग करत जिल्हा परिषदेचे माजी शिक्षण सभापती आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य दिपक नागले यांचे हात गणेशमुर्त्या घडविण्यामध्ये गुंतले आहेत. सामाजिक क्षेत्रामधील वेळेअभावी कामे रखडल्याचे अनेकजण दाखले देतात. मात्र, सामाजिक क्षेत्राची जबाबदारी खांद्यावर पेलताना गणेशमुर्त्या घडविण्याची जबाबदारीही ते गेल्या दोन दशकाहून अधिक काळ पेलत आहेत.

हेही वाचा - कोरोनाचा विसर; डेकोरेशनच्या साहित्यांनी सजली दुकाने...

अवघ्या काही दिवसांवर येवून ठेपलेल्या गणेशोत्सवाची सध्या सगळीकडे जोरदार धामधूम सुरू आहे. गणेशोत्सवाची पूर्वतयारी करण्यामध्ये गणेशभक्त गुंतले आहेत. तर, गणेश कार्यशाळांमध्ये कलाकार मुर्त्यांवर शेवटचा हात फिरविताना दिसत आहे. त्यामध्ये तालुक्यातील कोंडसर बुद्रुक येथील नागले यांचाही समावेश आहे. सर्वसामान्य कुटुंबातील नागले यांनी शिक्षण पूर्ण केल्यानंतर ठिकठिकाणी छोटी-मोठी कामे करताना सामाजिक क्षेत्राचा वसा खांद्यावर घेतला. ज्या वयामध्ये बहुतांश तरूणवर्ग हौस-मौज करण्यामध्ये गुंतलेला असतो त्याच वयामध्ये ते सामाजिक सेवेत गुंतले. 

कोंडसर बुद्रुकचे सरपंच असताना त्यांनी विविध सामाजिक कार्य केले.  शिवसैनिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या नागले यांना  संघटनेने पंचायत समिती आणि जिल्हा परिषद सदस्य अन् पुढे जिल्हा परिषदेचे शिक्षण सभापतीपद भूषविण्याची संधी दिली. पंचायत समिती असो वा जिल्हा परिषद या ठिकाणी विविध विषयांवर पोटतिडकीने आवाज उठविणारे अभ्यासू सदस्य म्हणून जिल्ह्यात ओळखले जातात. त्यांनी विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रम राबवून आपल्या कार्याचा वेगळा ठसा उमटविला आहे. 

हेही वाचा - निसर्गशाळेत ऑनलाईनचे धडे; कोकणातल्या युवतीची शिक्षणासाठी धडपड...

सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असताना त्यांनी आपल्या अंगी असलेले विविध कलागुणही जोपासले आहेत. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत राहून वडील तुकाराम नागले यांच्याकडून त्यांनी मुर्तीकलेचा वारसा गेल्या दोन दशकांपासून जोपासला आहे. गणपती बनविण्यासाठी साच्यांचा उपयोग करत असताना, अनेक मूर्त्या हाताने घडविण्याचे कौशल्य त्यांच्याकडे आहे. गणेश कार्यशाळेमध्ये मुर्त्या घडविण्यासाठी त्यांना वाडीतील काही होतकरू तरूणांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे. सामाजिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या अनेकांकडून वेळ नसल्याची कारणे सांगितली जातात. मात्र, त्याला नागले अपवाद ठरले आहेत. सामाजिक क्षेत्रातून वेळ काढत त्यांनी आपली मूर्तीकला जोपासली आहे. 

संपादन - स्नेहल कदम 

loading image
go to top