
रत्नागिरी : खेडच्या बाजारपेठेत हापूस आंबा दाखल
खेड - येथील बाजारपेठेत फळांचा राजा हापूस आंबा दाखल झाला असून, अडीच डझन आंब्यांच्या पेटीला एक हजार ते बाराशे रुपये दर व्यापाऱ्यांनी निश्चित केला आहे. दोन दिवसांपूर्वी आलेल्या वादळाने आंबा बागेत हजारो फळांचे नुकसान झाल्याने बागायतदार हवालदिल झाले आहेत. बाजारपेठेत आवक कमी असल्याने मध्यमवर्गीयांना यावर्षी आंब्याची चव चाखताना महिन्याचे आर्थिक गणित विस्कळीत होण्याची शक्यता आहे. उत्तर रत्नागिरीमधील फळबागामधून आंबा निर्यात व स्थानिक बाजारपेठेत विक्रीसाठी व्यापारी घेऊन येऊ लागले आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या वादळाने आंब्याच्या बागांना मोठा फटका बसला असून एकेका बागेतून हजारो काढणीयोग्य फळे वादळात जमिनीवर कोसळली असल्याने बागायतदार शेतकरी धास्तावले आहेत. वादळाने झालेल्या नुकसानीची पाहणी शासनाने करून पंचनामे करावेत व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यातून व व्यापाऱ्यांतून होत आहे.
खेड शहरात दरवर्षी तीनबत्ती नाका येथे बहिरवली, पोफळवणे, शिर्शी, मुंबके, तळघर, कात्रण, दमामे इत्यादी ठिकाणाहून व्यापारी व शेतकरी हापूस आंबे विक्रीसाठी घेऊन येतात. यावर्षी देखील व्यापारी व शेतकरी येथे आंबा विक्रीसाठी आले असले तरी त्यांची संख्या खूप कमी आहे. यावर्षी सुमारे चार हजार पाचशे रुपये शेकडा दराने हापूस आंबा विक्रीसाठी उपलब्ध झाला असून एक, दोन व अडीच डझनच्या पेट्यांमध्येही आंबा विक्रीसाठी ठेवण्यात आला आहे.
पोफळवणे येथे आमची शंभरपेक्षा अधिक आंबा झाडे आहेत. दोन दिवसांपूर्वी अचानक वादळ झाले आणि काढणीसाठी तयार असलेल्या आंब्याचे नुकसान झाले. एका बागेत हजारो फळे पडून गेली. यापूर्वी हवामानामुळे भरपूर आलेला मोहर आधीच करपून गेला होता. त्यातही फवारणी करून जपलेल्या मोहरातून आता आंबा हाती लागेल, असे वाटत असताना वादळ झाले आणि नफ्याचे गणितच मांडता येत नाही. सरकारने आता तरी याकडे लक्ष द्यावे.
- राहील मुल्लाजी, आंबा बागायतदार, पोफळवणे.