
रत्नागिरी : जिल्ह्यात सलग तिसऱ्या दिवशी ढगाळ वातावरण निर्माण झाल्यामुळे आंबा बागायतदार धास्तावले आहेत. हे वातावरण तुडतुडा, बुरशीजन्य रोग, करपा आणि शेंडा पोखरणाऱ्या अळींचा प्रादुर्भाव वेगाने होण्यास पोषक आहे. काही ठिकाणी तुडतुडा मोठ्या प्रमाणात पसरू लागला आहे. त्यामुळे हंगामाच्या सुरुवातीलाच औषध फवारणीचा खर्च बागायतदारांना करावा लागणार आहे. बदलत्या वातावरणामुळे हापूसचा हंगाम दीड महिने लांबला असून, अधिक उत्पन्न देणाऱ्या पहिल्या टप्प्यात बागायतदारांची मोठी निराशा होणार आहे.