गुहागरमध्ये अनधिकृत हॉटेल व्यावसायिकांचे धाबे दणाणले ; का वाचा...

सकाळ वृत्तसेवा
Monday, 3 August 2020

शहरातील १५ हॉटेल व्यावसायिकांना नोटिसा बजावल्या....

गुहागर  (रत्नागिरी) : जेटी आणि सी व्ह्यू गॅलरी पाठोपाठ गुहागर शहरातील अनधिकृत बांधकामांनाही फटका बसला आहे. शहरातील १५ हॉटेल व्यावसायिकांना प्राधान्याने नोटिसा बजावल्या आहेत. त्यामुळे आता अनधिकृत बांधकाम केलेल्या शहरवासीयांचेही धाबे दणाणले आहे. महाराष्ट्र सागरी नियमन व्यवस्थापन समितीची परवानगी न घेता, ज्यांनी बांधकामे केली असे सर्वचजण हरित लवादाच्या निर्णयामुळे अडचणीत सापडले आहेत.

हेही वाचा -  ....अखेर चितारआळीतील व्यापाऱ्यांना दिलासा

सुरवातीला १५ हॉटेल व्यावसायिकांना लक्ष्य केले आहे. प्रांताधिकाऱ्यांच्या आदेशाप्रमाणे गुहागर नगरपंचायतीच्या मुख्याधिकाऱ्यांनी परवानगी न घेता बांधलेल्या इमारतींचे पंचनामे केले आहेत. दोन दिवसांपूर्वी प्रांताधिकारी पवार यांनी गुहागरात येऊन अनधिकृत बांधकाम केलेल्या या हॉटेल व्यावसायिकांशी संवाद साधला. यावेळी गुहागर पर्यटनस्थळ म्हणून विकसित होत असताना आम्ही व्यवसाय कसा करायचा, असा प्रश्न हॉटेल व्यावसायिकांनी उपस्थित केला. मात्र, सदर कारवाई हरित लवादाच्या निर्णयानुसार सुरू आहे. त्यामुळे शासन काहीच करू शकत नाही, असे प्रांताधिकाऱ्यांनी सांगितले.

हेही वाचा - विद्यार्थ्यांनो ऑनलाइन अर्ज करा ; आता अकरावी प्रवेशाचा मार्ग होणार सुकर...

यामुळे परवानगी न घेता इमारती बांधकाम केलेल्या शहरवासीयांचे धाबे दणाणलेत. सध्या ज्यांच्यावर कारवाई सुरू आहे, त्यांनी कायदेशीर बाबींविषयी सल्ला घेण्यास सुरवात केली आहे. गुहागर शहर पर्यटनदृष्ट्या विकसित होऊ लागल्यावर सुविधा उपलब्ध करण्यास प्रारंभ झाला. सुरवातीच्या काळात केवळ घरगुती निवास न्याहरी व्यवस्था उपलब्ध होती. त्यावेळी शासन, राजकारणी, आदी स्तरामधून गुहागरमध्ये पर्यटकांना काय आवश्‍यक त्या सोयीसुविधा उपलब्ध करा, असे सांगितले जात होते. किनाऱ्याशेजारी राहण्याची व्यवस्था हवी. स्वतंत्र एसी खोल्या असायला हव्यात, अशा मागण्या होत्या. त्यामुळे काही स्थानिकांनी आपल्याच बागेत किनारा दिसेल, अशा एसी खोल्या बांधल्या आहेत. 

आधीच उल्हास....
चौपदरीकरण, मोडकाआगर पूल वाहतुकीसाठी बंद असणे, २०१९ मध्ये ऑक्‍टोबर-नोव्हेंबरपर्यंत लांबलेला पावसाळा आणि आता मार्च महिन्यापासून आलेले कोरोनाचे संकट, अशा विविध कारणांमुळे गेली दोन वर्ष गुहागर शहरातील पर्यटन व्यवसाय आर्थिक अडचणीत सापडला आहे. त्याचवेळी अनधिकृत बांधकामांवर कारवाईचा बडगा उगारल्याने आधीच उल्हास, त्यात फाल्गुन मास, अशी अवस्था व्यावसायिकांची झाली आहे.

संपादक - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: harit lavada decision table over unauthorised hotel businessman in guhagar