हर्णै बंदर सागरमाला योजनेतून उभारावे, खासदार सुनील तटकरेची मागणी

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 20 September 2020

पहिल्या टप्प्यात हर्णै व जीवना (ता. श्रीवर्धन) व आगरदांडा (ता. मुरुड) या बंदरांना विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी तटकरे यांनी केली. या तीन बंदरांच्या विकासाचा अंदाजे खर्च 558.6 कोटी आहे.

दाभोळ ( रत्नागिरी ) - हर्णैसह रायगड जिल्ह्यातील जीवना (ता. श्रीवर्धन) व आगरदांडा (ता. मुरुड) या बंदरांचा विकास "सागरमाला' योजनेतून करावा, अशी मागणी खासदार सुनील तटकरे यानी केली आहे. या बंदरांच्या ठिकाणी मरीन फूड पार्क, सीफूड रेस्टॉरंट व आर्ट गॅलरीही उभारण्यात यावी, अशीही सूचना त्यांनी केली आहे. 

खासदार सुनील तटकरे यांनी पावसाळी अधिवेशनात केंद्रीय नौकावहन मंत्रालयाचे राज्यमंत्री मनसुख मांडविया यांची भेट घेऊन रायगड मतदारसंघातील 9 मासेमारी बंदरे व 16 फिश लॅंडिंग सेंटर्स केंद्र शासनाच्या "सागरमाला' योजनेतून उभारण्यात यावीत, अशी मागणी केली. 9 बंदरांपैकी 3 बंदरांचा विकास पहिल्या टप्प्यात करावा व उर्वरित बंदरांचा विकास दुसऱ्या टप्प्यात करावा.

पहिल्या टप्प्यात हर्णै व जीवना (ता. श्रीवर्धन) व आगरदांडा (ता. मुरुड) या बंदरांना विशेष प्राधान्य द्यावे, अशी मागणी तटकरे यांनी केली. या तीन बंदरांच्या विकासाचा अंदाजे खर्च 558.6 कोटी आहे. या बंदरांच्या ठिकाणी मरीन फूड पार्क, सीफूड रेस्टॉरंट व आर्ट गॅलरीही उभारण्यात यावी, अशीही सूचना त्यांनी केली. 

या बंदरांचा विकासामुळे मासेमारी व्यवसायाला आधुनिक स्वरूप प्राप्त होऊन सुरक्षित व स्वच्छतेच्या बाबतीत आंतरराष्ट्रीय स्तर निर्माण होईल. आईस प्लॅन्ट, कोल्ड स्टोरेज, आधुनिक लिलावगृह आदी गोष्टींचा समावेशही या बंदरांच्या ठिकाणी असावा, असे तटकरे यांनी पत्रात सुचविले आहे. त्यावर सकारात्मक निर्णय घेण्यात येईल, असे आश्‍वासनही त्यांना मिळाले आहे. 

भूमिपूजनानंतर प्रगती नाही 
हर्णै बंदर सुरक्षित बंदर नसल्याने वादळवाऱ्यावेळी मच्छीमारांना आंजर्ले किंवा दाभोळ खाडीचा आसरा घ्यावा लागतो. या ठिकाणी अद्ययावत बंदराची उभारणी केल्यास या ठिकाणचा व्यवसाय अधिक वाढेल; मात्र अनेक वर्षांपासून या बंदराचा प्रश्‍न प्रलंबित असून अनेकवेळा या बंदराच्या कामाचे भूमिपूजनही केले आहे, याकडे तटकरे यांनी लक्ष वेधले आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Harne Port Build In Sagarmala Scheme Sunil Tatkare Demand