महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच झाला वायुसैनिक 

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 28 October 2020

श्रेयसच्या सैन्यदलातील खडतर प्रशिक्षणाला पारंभ झाला. हे प्रशिक्षण म्हणजे भरती झालेल्या उमेदवारांची सत्वपरीक्षा ठरते

रत्नागिरी - सैन्यदलात भरती होणे, हे प्रत्येकाला अभिमानास्पद आहे. महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच भारतमातेच्या रक्षणाची प्रेरणा मिळाली होती. यामधून अशा वेगळ्या क्षेत्राची निवड केली याचा मला सार्थ अभिमान आहे, अशी प्रतिक्रिया वायुसैनिक म्हणून पात्र ठरलेल्या रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावचे सुपुत्र श्रेयस सुनील कांबळे यांनी व्यक्त केली.

सोशल मीडियावर राष्ट्रवादाची भावना जपणारे तरूण सैन्यदलातील भरतीकडे पाठ फिरवत असल्याचे चित्र पहायला मिळते; मात्र रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा गावातील श्रेयस सुनील कांबळे या तरुणाने त्याल छेद दिला आहे. भारतीय सेनेत भरती होण्याचा चंग त्याने महाविद्यालयीन शिक्षण घेतानाच बांधला होता. आता तो त्यामध्ये यशस्वीही झाला. सैन्यदलात आतापर्यंत रत्नागिरी जिह्यातील हजारो तरुणांनी योगदान दिले आहे. हे प्रमाण हळूहळू कमी झाले आहे. रत्नागिरीमध्ये गतवर्षी झालेल्या सैन्यदलाच्या भरतीत त्याचा प्रत्यय आला. रत्नागिरी तालुक्यातील हातखंबा कदमवाडी येथील श्रेयस कांबळे या महाविद्यालयीन तरुणाने सैन्यदलात भरती होण्याची खुणगाठ बांधली. वाणिज्य शाखेतून पदवी शिक्षण पूर्ण करण्यासाठी श्रेयस यांचे प्रयत्न सुरु होते. याच कालावधीत सांगली तासगाव येथे 2017 मध्ये सैन्य भरती लागली होती. या भरतीत उतरण्याचा निर्णय घेतला. सैन्यभरतीचा पहिलाच अनुभव होता. त्या भरतीत मिळालेल्या संधीचे सोने केले. भरतीतील शारीरिक, लेखी, वैद्यकीय अशा सर्व पकारच्या चाचण्यात ते यशस्वी झाले. शारीरिक, लेखी चाचण्यांही पार पडल्या. दोन महिन्यांनी झालेल्या वैद्यकीय चाचणीत पात्र ठरल्यानंतर वायुसैनिक म्हणून श्रेयसची निवड झाली. निवडीचा आंनद गगनात मावेनासा होता.

श्रेयसच्या सैन्यदलातील खडतर प्रशिक्षणाला पारंभ झाला. हे प्रशिक्षण म्हणजे भरती झालेल्या उमेदवारांची सत्वपरीक्षा ठरते. श्रेयस मोठ्या उमेदीने बेळगाव येथे ट्रेनिंग गेला. त्या ठिकाणी 6 महिने पशिक्षण घेतले. त्या प्रशिक्षणानंतर दिल्ली येथे कमांडो पशिक्षण होते. तेथील 1 वर्षाच्या पशिक्षणही जिद्दीने पूर्ण केले. या सार्‍या जिद्दीच्या पवासानंतर श्रेयस या भरतीत यशस्वी झाला. त्याला भारतीय हवाई दलात आता ‘एअरकाफ्ट मन’ ही रँक मिळाली असून तो कलकत्ता येथे 3 नोव्हेंबरला रुजू होणार आहे. श्रेयसला या यशासाठी त्यांच्या कुटुंबियांची मोलाची साथ व सदैव मार्गदर्शन लाभले. त्यांच्या पोत्साहनामुळे या भरतीत यश मिळाल्याचे श्रेयस सांगतो. त्याच्या निवडीने गाववाले व पंचकोशीतून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्याची निवड येथील तरूणांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.

हे पण वाचा - महाविकास आघाडीच्या धुसफूसीला कोकणातून सुरवात  

सैन्यदलाच्या भरतीकडे रत्नागिरीतील तरूणांचा ओढा कमी आहे. पण त्यासाठी येथील तरुणांनी योग्य तयारी, मेहनत आणि मार्गदर्शन घ्या. नक्कीच या भरतीच्या यशाला गवसणी घालता येईल.

- श्रेयस कांबळे, हातखंबा कदमवाडी-रत्नागिरी

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: He became an aviator while studying in college