esakal | दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार; राजेश टोपे
sakal

बोलून बातमी शोधा

Health Minister Rajesh Tope press conference dapoli ratnagiri

दापोली उपजिल्हा रुग्णालयाचेही श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला

दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयातील रिक्त पदे तातडीने भरणार; राजेश टोपे

sakal_logo
By
चंद्रशेखर जोशी

दाभोळ (रत्नागिरी) : राज्यातील उपजिल्हा रुग्णालये तसेच ग्रामीण रुग्णालयांची दर्जावाढ करण्यासाठी आशियायी विकास बँकेकडून 4 हजार कोटींचे कमी व्याजाने कर्ज घेण्यासाठी राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार व मुख्यमंत्री यांनी तत्त्वतः मान्यता दिली असून यामुळे ज्या रुग्णालयांची बांधकामे अर्धवट राहिलेली आहेत ती यामधून  पूर्ण करण्यात येतील. दापोली उपजिल्हा रुग्णालय 100 बेडचे होण्यासाठी 2013 मध्येच मान्यता मिळालेली आहे. मात्र निधीची कमतरता असल्याने या रुग्णालयाचे श्रेणीवर्धन झालेले नाही. आता हा निधीचा प्रश्न मार्गी  लागणार असल्याने दापोली उपजिल्हा रुग्णालयाचेही श्रेणीवर्धन होण्याचा मार्ग मोकळा झाला असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.


राज्याचे आरोग्य मंत्री  राजेश टोपे हे खाजगी दौर्‍यावर दापोली येथे आलेले असताना त्यांनी दापोली उपजिल्हा रुग्णालयात आढावा बैठक घेतली. या बैठकीनंतर ते पत्रकारांशी बोलत होते.
दापोलीतील उपजिल्हा रुग्णालयात स्त्रीरोग तज्ञ व भुलतज्ञ ही पदे रिक्त असून ही पदे तातडीने भरण्यात येतील अशी माहिती आरोग्य मंत्री  राजेश टोपे यांनी दिली तसेच दापोली येथील श्री स्वामी समर्थ रुग्णालयाचा समावेश महात्मा फुले जनआरोग्य योजनेच्या रुग्णालयामध्ये  2 ते 3 दिवसात करण्यात येणार आहे. यामुळे दापोली तालुक्यातील रुग्णांना या रुग्णालयामधून मोफत सेवा मिळणार आहे. दापोली उपजिल्हा रुग्णालयात स्त्री रोग तज्ञ व भुलतज्ञ नसल्याने या रुग्णालयात प्रसूतीसाठी येणाऱ्या महिलांना सीझेरीअनची आवश्यकता भासल्यास रत्नागिरी येथे पाठवावे लागते मात्र आता स्वामी समर्थ रुग्णालयात त्यांची मोफत प्रसूती करण्यात येईल.


राज्य शासनाद्वारे  500  रुग्णवाहिका घेण्यात येणार असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया पूर्ण झाल्या असून येत्या आठवड्यात किमान 250 रुग्णवाहिका ताब्यात मिळणार असून त्यापैकी रत्नागिरी जिल्ह्याला 17 रुग्णवाहिका देण्यात येतील तसेच दापोलीलाही एक रुग्णवाहिका प्राधान्याने दिली जाईल असेही राजेश टोपे यांनी सांगितले.प्रत्येक जिल्ह्यात एक मोबाईल रुग्णवाहिका असते. दापोली तालुका  हे पर्यटन क्षेत्र असल्याने येथे पर्यटकांची मोठी वर्दळ असल्याने तसेच अपघातांचे प्रमाण जास्त असल्याने दापोलीलाही एक मोबाईल रुग्णवाहिका देण्यासाठी आपण प्रयत्न करू असे आश्‍वासन राजेश टोपे यांनी दिले.

हेही वाचा- कर्जदार शेतकऱ्यांना मोठा दिलासा; अखेर कर्जमाफीचे पैसे झाले जमा


उत्तर रत्नागिरीच्या पाच तालुक्यांचे मध्यवर्ती ठिकाण असलेल्या उपजिल्हा रुग्णालय कळंबणी (खेड) येथे शासकीय रक्तपेढीला मान्यता  देण्यात येईल यासाठीचा होणारा खर्च डीपीडीसीतून करण्यात  येणार असून राज्य रक्तसंक्रमण परिषदेचीे मंजूरी मिळताच  ही रक्तपेढी सुरू करण्यात येईल.


कोकणात तज्ञ वैद्यकीय अधिकारी येण्यास तयार होत नाहीत त्यामुळे जेव्हा या अधिकार्‍यांचे प्रमोशन होते तेव्हा त्यांनी कोकणला प्राधान्य द्यावे यासाठी या चक्राकार प्रकियेत कोकणला प्राधान्य मिळेल यासाठी धोरणात्मक निर्णय घ्यावा लागणार असून  त्यासाठी हा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत आपण मांडणार असल्याचेही आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेला आ. योगेश कदङ्क, माजी आमदार संजय कदम, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष जयवंत जालगावकर उपस्थित होते.

संपादन- अर्चना बनगे