esakal | चिपळूणात अख्खी रात्र त्यांनी काढली जागून ; काय कारण ?
sakal

बोलून बातमी शोधा

heavy rain in chiplun and water thrust in market

वाशिष्ठी व शिव नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली आहे. 

चिपळूणात अख्खी रात्र त्यांनी काढली जागून ; काय कारण ?

sakal_logo
By
मुझफ्फर खान

चिपळूण : तालुक्यात शनिवारी मुसळधार पाऊस झाला. नदी, नाले तुडूंब भरून वाहूू लागले. चिपळूण शहरातील बाजारपेठेत पाणी भरले. त्यामुळे शहरातील नागरिकांनी रात्र जागून काढली. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर शहरातील पाणी ओसरण्यास सुरवात झाली आहे. शनिवारी दिवसभरात चिपळूण आणि शहर परिसरात मुसळधार पाऊस कोसळला. 

हेही वाचा - Good News : आता मध्य रेल्वे धावणार कोकण रेल्वे मार्गावर..

सह्याद्रीचे खोरे आणि कोयना धरण क्षेत्रातही दमदार पाऊस पडत आहे. यामुळे वाशिष्ठी व शिव नद्यांनी धोक्याची पातळी ओलांडली. चिपळूण शहरातील बाजारपेठत रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास पाणी भरण्यास सुरुवात झाली. प्रभात गल्ली, अबकारी खाते कार्यालय, भाजी मंडई, चिंचनाका, गुहागरनाका, खाटीकआळी, मुरादपूर आणि पेठमापचा काही भाग पाण्याखाली होता.

शहराची बाजारपेठ पाण्याखाली होती. त्याशिवाय गांधी चौक, अर्बन बँक परिसर, भोगाळेचा काही भाग आणि बुरूमतळी येथील मध्यवर्ती एसटी बसस्थानकात पुराचे पाणी शिरले होते. त्यामुळे बसस्थानकावरील एसटी रात्री बाहेर काढून त्या शिवाजी नगर बसस्थानकात हलवण्यात आल्या. वडनाका परिसरात पाणी आल्यानंतर पालिकेने भोंगा वाजवून नागरिकांना सावधानतेचा इशारा दिला. बाजारपेठेत पाणी भरण्यास सुरुवात झाल्याने व्यापार्‍यांनी, नागरिकांनी काळजी घ्यावी, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले.

हेही वाचा -  ब्रेकिंग : रत्नागिरीत कोरोनाचा कहर सुरुच...

रात्री एक वाजता वाशिष्ठी नदीचे पाणी नव्या बाजारपुलाला टेकले होते. खाटीक आळी, पेठमापसह ज्या भागातील बैठ्या घरांमध्ये पाणी शिरले होते. मात्र तेथील नागरिकांनी रात्रीच स्थलांतरित केले आहे. अनेकांनी शेजारच्या इमारतींमध्ये आसरा घेतला आहे. तर काहींनी रात्रीच पाग, बुरूमतळी, ओझरवाडी, बहादूरशेख नाका आदी भागातील आपल्या नातेवाईकांकडे आसरा घेतला. सकाळी पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पाणी ओसरण्यास सुरवात झाली. त्यामुळे नागरिकांनी सुटकेचा श्‍वास घेतला.

संपादन - स्नेहल कदम 

loading image