परतीच्या पावसाने भातशेती पाण्यात ; आणखी चार दिवस मुसळधार 

राजेश कळंबटे
Tuesday, 13 October 2020

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पावसाचा जोर ओसरला आणि कडकडीत उन पडले. दुसर्‍या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे

रत्नागिरी - गेले तीन दिवस शेतकर्‍यांची झोप उडवणार्‍या पावसाने मंगळवारी दुपारपर्यंत उघडीप दिली. मात्र दुपारनंतर आभाळ भरुन आल्यामुळे पुन्हा कापलेले भात वाचवण्याची कसरत बळीराजाला करावी लागली.

हवामान विभागाकडून 17 ऑक्टोबरपर्यंत किनारपट्टीवर ताशी 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असून जिल्ह्यात गडगडाटासह मुसळधार पावसाची शक्यता व्यक्त केली आहे. 

मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये, असा इशाराही दिलेला आहे. 
मंगळवारी (ता. 13) सकाळी 8.30 वाजेपर्यंतच्या चोविस तासात जिल्ह्यात सरासरी 5.00 मिमी पाऊस झाला आहे. त्यात मंडणगड 12.40, दापोली 5.20, खेड 5.50, गुहागर 6.00, चिपळूण 11.60, संगमेश्‍वर 2.00, रत्नागिरी 0.30, लांजा 1.30, राजापूर 0.70 मिमी नोंद झाली. 1 जुनपासून आतापर्यंत जिल्ह्यात सरासरी 2,690 मिमी पाऊस झाला आहे. 

ऑक्टोबर महिन्याच्या सुरवातीला पावसाचा जोर ओसरला आणि कडकडीत उन पडले. दुसर्‍या आठवड्यात परतीचा पाऊस सुरू झाला आहे. शेतकर्‍यांनी भात कापून सुकवण्यासाठी मळ्यातच ठेवलेले होते. ढगफुटीप्रमाणे पडलेल्या पावसाचा सर्वाधिक तडाखा दक्षिण रत्नागिरीला बसला. लांजा, राजापूर, रत्नागिरीसह संगमेश्‍वर तालुक्यातील शेकडो एकरची भातशेती झोपली. शनिवार, रविवार आणि सोमवारी सलग पाऊस सुरू होता. मंगळवारी सकाळच्या टप्प्यात उघडीप मिळाली होती. पण सायंकाळी पुन्हा पावसाला सुरवात झाली. ढगांच्या गडगडाटासह पडणार्‍या पावसाने शेतकर्‍यांची गडबड झाली. सकाळी उन पडल्यामुळे अनेकांनी भात गोळा करण्यास सुरवात केली होती. तीन दिवस पावसात भिजल्याने लोंबी काळी पडली असून उत्पादनावर परिणाम होणार आहे. 16 आणि 17 ऑक्टोबरला मुसळधार पावसाची शक्यता असल्यामुळे तयार झालेले भातपीक वाया जाण्याची भिती शेतकरी व्यक्त करत आहेत.

परतीच्या पावसामुळे विजा चमकण्याची शक्यता आहे. अशावेळी विद्युत उपकरणे बंद ठेवावीत, दूरध्वनी, भ्रमणध्वनीचा वापर टाळावा. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, विजेच्या खांबापासून दूर रहावे, असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन कक्षाने केली आहे.

हे पण वाचामाजी सैनिकाने उघड केला कोरोना काळातील रेशन घोटाळा

साखरप्यात नाचणीवर संक्रात

साखरपा : गेले दोन दिवस सतत पडत असणार्‍या पावसामुळे कापणीयोग्य भात पिकाचे नुकसान झाले आहे. शेतातून ही पिके आडवी पडली आहेत. इतकेच नाही तर पसवणीला आलेले नाचणी पिकाही धोक्यात आले आहे. हस्त नक्षत्र कोरडे गेल्याने शेतकर्‍यांनी कापणी सुरू केली. पण पुन्हा पाऊस सुरू झाला आणि नुकसान केले. नाचणीही तयार होऊ लागले आहे. रोपांना कणसे धरू लागली आहेत.

संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in ratnagiri