सावंतवाडीला पावसाने झोडपले; तेरेखोल नदीने ओलांडली पुन्हा धोक्याची पातळी 

निलेश मोरजकर 
Sunday, 16 August 2020

पाण्याची पातळी वाढत असल्याने ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे.

बांदा(सिंधुदुर्ग) - सावंतवाडी तालुक्यातील बांदा शहर व परिसराला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीने गेल्या दहा दिवसांत पुन्हा धोक्याची पातळी ओलांडली आहे. तेरेखोल नदीचे पाणी आज सकाळीच शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. 

शहरातील आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता नेहमीप्रमाणे पाण्याखाली गेला आहे.

पाण्याची पातळी वाढत असल्याने ऐन गणेश चतुर्थीच्या तोंडावर व्यापाऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. पुराचे पाणी वाढत असल्याने स्थानिक व्यापाऱ्यांनी आपल्या दुकानातील सामान सुरक्षितस्थळी हलविण्यास प्रारंभ केला आहे. पावसाचा जोर आज सकाळी देखील कायम आहे. हवामान खात्याने आज अतिवृष्टीचा इशारा दिल्याने स्थानिक प्रशासन देखील सतर्क झाले आहे. गेल्या दहा दिवसांत शहरातील आळवाडी बाजारपेठेत दुसऱ्यांदा तेरेखोल नदीच्या पुराचे पाणी शिरले आहे. आळवाडी येथील कित्येक दुकाने आज सकाळीच पाण्याखाली गेली आहेत.

हे पण वाचाचंद्रकांत पाटील म्हणजे सौ चुहे खाके बिल्ली हज को चली ; हसन मुश्रीफांचा टाेला 

पुराचे पाणी वाढत असल्याने बांदा सरपंच अक्रम खान, तंटामुक्ती समिती अध्यक्ष गुरुनाथ सावंत, माजी ग्रामपंचायत सदस्य सुशांत पांगम, प्रसाद चिंदरकर, सुनील धामापूरकर यांनी याठिकाणी धाव घेत परिस्थितीची पाहणी केली. स्थानिक व्यापाऱ्यांना सतर्क राहण्याबाबत सरपंच खान यांनी सूचना दिल्यात.

 

संपादन- धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in sawantwadi