तीन दिवस जोरदार... पुन्हा गजबजली शेतशिवार

सकाळ वृत्तसेवा
रविवार, 5 जुलै 2020

तालुक्‍यामध्ये तिसऱ्यांदा आतापर्यंत अशा स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. सायंकाळच्या सुमारास या पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिक आपल्या कामासाठी घराबाहेर पडले होते.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - येथील तालुक्‍याला काल (ता. 3) रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. तालुक्‍यामध्ये विविध गावात असलेली पुले पाण्याखाली गेली होती. त्यामुळे अनेक गावांचा संपर्क तुटला. तालुक्‍यातील वाहतूक व्यवस्था विस्कळित झाली होती. 

कालपासून (ता. 3) पावसाने जोरदार बॅटिंग करत संपूर्ण तालुक्‍याला झोडपून काढले. मुसळधार पावसाने नदी, नाले, ओहोळ, विहिरी तुडुंब भरून वाहू लागले होते. मुसळधार पाऊस पाहता अनेकांनी घरातच थांबणे पसंत केले. काल सायंकाळपासून सुरू झालेला पाऊस आज दुपारपर्यंत थांबण्याचे नाव घेत नव्हता.

आज आणि काल झालेल्या पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. जिल्ह्यामध्ये कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाउन जाहीर केले आहे. अशा परिस्थितीत अनेक नागरिक घरांमध्ये आहेत. त्यामुळे वाहतूक व्यवस्था या पावसामुळे प्रभावित झाली असली तरी जनजीवनावर फारसा परिणाम दिसून आला नाही; मात्र ग्रामीण भागात गावांना जोडणाऱ्या पुलावर पाणी आल्यामुळे या मार्गावरची वाहतूक व्यवस्था ठप्प झाली होती. तालुक्‍यामध्ये तिसऱ्यांदा आतापर्यंत अशा स्वरूपाचा मोठ्या प्रमाणात पाऊस कोसळला आहे. सायंकाळच्या सुमारास या पावसाने थोडीशी उसंत घेतल्याने नागरिक आपल्या कामासाठी घराबाहेर पडले होते. 

दरम्यान, या मुसळधार पावसामुळे ओटवणे, इन्सुली, चराठा या तीन गावांना सावंतवाडी शहरास जोडणाऱ्या नमसवाडी पुलावर पाणी आल्याने दोन्ही बाजूला वाहने अडकून पडली आहेत. या पुलाची उंची वाढवावी, अशी मागणी तेथील नागरिकांमधून होत आहे. दांडेली पुलावर सकाळच्या सुमारास पाणी असल्याने वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. दुपारी पुलावरून पाणी ओसरले. 

शेत शिवारे गजबजली 
तालुक्‍यातील सह्याद्री पट्ट्यासह सावंतवाडी शहर परिसरातील गावे, सावंतवाडी शहर, गोवा सीमेजवळील गावे या पावसामुळे पूर्णतः प्रभावित झाली होती. काही ठिकाणी मोठ्या प्रमाणात पाऊस झाल्याने शेतकरी शेत कामांत व्यस्त असल्याचे दिसून आले. मुबलक पावसामुळे रखडलेल्या शेतीच्या कामांना आता जोर आला आहे. ज्या भागांत कमी व मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, तेथे लावणीच्या कामांना वेग आला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain in sawantwadi taluka konkan sindhudurg