धडकी भरवणारा पाऊस, रस्त्यावर पाणीच पाणी, भातशेती भूईसपाट

रूपेश हिराप
Tuesday, 22 September 2020

हे सारे चित्र पाहता ढगफुटी झाली की काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला. 
ग्रामीण भागात पानथळ भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने या वर्षीही ती कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे.

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - तालुक्‍याला काल रात्रीपासून मुसळधार पावसाने अक्षरशा झोडपले. धो..धो पडणाऱ्या पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाली. शहरातील बाजारपेठेत पाणी घुसल्याने हॉटेल चंदू भवन ते गांधी चौक परिसर पूर्णतः जलमय झाला. दुकानांत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. तालुक्‍यात ठिकठिकाणी नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. हे सारे चित्र पाहता ढगफुटी झाली की काय? असा प्रश्‍न नागरिकांना पडला. 
ग्रामीण भागात पानथळ भागातील भातशेती पाण्याखाली गेल्याने या वर्षीही ती कुजून शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होण्याची भीती आहे. 

तालुक्‍याला पुन्हा एकदा पावसाने चांगलेच झोडपून काढले. काल (ता. 20) रात्रीपासून सुरू झालेला पाऊस आज दिवसभर संततधार सुरू होता. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत होण्यासह ठिकठिकाणी पूरस्थिती निर्माण झाली होती. बऱ्याच गावात नदीकाठची भातशेती पाण्याखाली गेली होती. नदी, नाले दुथडी भरून वाहत होते. काही ठिकाणी खोल भागातील पुलावरून पाणी वाहत असल्याने वाहतुक खोळंबली होती. 
गेल्यावर्षी अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांची भातशेती पाण्याखाली गेल्यामुळे ती कुजल्याने भाताला कोंब आले होते. त्यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले होते.

आजच्या पावसाने भातशेती पाण्याखाली गेल्याने गतवर्षीची पुनरावृत्ती होण्याची भीती शेतकरी वर्गातून होत आहे. सद्यस्थितीत भातपीक चाचणीलायक झाले आहे; मात्र पाऊस जाण्याची वाट शेतकरी पाहत आहे. या वर्षी पाऊस लांबल्याने काही ठिकाणी भातपीक आडवे झाले आहे. 
तळवडे, सावंतवाडी बाजारपेठेत पाणी घुसल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात पाणी साठले होते. रात्रभर पडणाऱ्या पावसाने मोती तलावही तुडुंब भरला होता. शहरातील चंदू भवन हॉटेल रोड तसेच बाळकृष्ण कोल्ड्रिंग, गांधी चौक परिसरातही रस्त्यावर पाणी साचले. शहरातील सालईवाडा बीएसएनएलच्या कार्यालयासमोरही रस्त्यावर पाणी आले. चितारआळी परिसरात घराची संरक्षण भींत रस्त्यावर पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. पालिका प्रशासनाने बाजारपेठेत घुसलेले पाणी लक्षात घेता तलावाच्या सांडव्याचे दरवाजे खुले करत पाणी बाहेर सोडले. काही वेळ पावसानेही उसंत घेतल्याने बाजारपेठेतील पाणी ओसरले. दिवसभर मात्र पावसाची संततधार कायम होती. 

आंबोलीत दरड कोसळली 
आंबोली आणि चौकुळ गावातील मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले. आंबोली घाटात दरडीचा काही भाग कोसळला; मात्र याचा वाहतुकीवर तितकासा परिणाम झाला नाही. चौकुळ परिसरात ढगफुटीसदृश पाऊस झाल्याने पापडी पुलाच्या परिसरात पाणीच पाणी झाले होते; मात्र पापडी पुलावर नव्याने बांधलेल्या पुलामुळे दरवेळी तुटणार गावाचा संपर्क यावेळी कायम राहीला.  

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy rain sawantwadi taluka sindhudurg district