तेरेखोलच्या रौद्ररूपाने हाहाकार; व्यापाऱ्यांची उडाली एकच तारांबळ

निलेश मोरजकर
Thursday, 6 August 2020

परिसरातील छोटया पुलांवर पाणी आल्याने या गावांचा बांदा शहराशी संपर्क तुटला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पुराचे पाणी जैसे थे होते. बांदा शहरात पुराचे पाणी शिरूनही आपत्ती व्यवस्थापनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही.https://www.esakal.com/kokan/heavy-rains-were-followed-strong-winds-sawantwadi-taluka-329773?amp

बांदा (सिंधुदुर्ग) - बांदा शहर व परिसराला आज दिवसभर मुसळधार पावसाने झोडपून काढल्याने तेरेखोल नदीला पूर आला. नदीचे पाणी आज पहाटेच शहरातील आळवाडी बाजारपेठेत शिरल्याने व्यापाऱ्यांची एकच तारांबळ उडाली. शहरातील आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेला. कट्टा कॉर्नर येथील भंगार आळी, लमाणी वस्तीत तसेच निमजगा येथील लक्ष्मी-विष्णू या रहिवासी इमारतीचा तळमजला पाण्याखाली गेल्याने रहिवाश्‍यांनी तारांबळ उडाली. आपत्ती व्यवस्थापन केवळ कागदावरच राहिल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. 

परिसरातील छोटया पुलांवर पाणी आल्याने या गावांचा बांदा शहराशी संपर्क तुटला होता. सायंकाळी उशिरापर्यंत पुराचे पाणी जैसे थे होते. बांदा शहरात पुराचे पाणी शिरूनही आपत्ती व्यवस्थापनाचा एकही अधिकारी किंवा कर्मचारी फिरकला नाही. तसेच पावसाळ्याच्या सुरुवातीला बांदा शहरातील लोकांना वाचविण्यासाठी देण्यात आलेली जीवरक्षा बोट पोलीस ठाण्यात धूळ खात पडून असल्याने स्थानिकांनी नाराजी व्यक्त केली. शहरात 8 वीज खांब उन्मळून पडल्याने महावितरणचे 1 लाख रुपयांचे नुकसान झाले. 

वाचा - सिंधुदुर्गमधील  या तालुक्यात वादळी वाऱ्यामुळे घरांसह गोठ्यांचे नुकसान...

गतवर्षी 5 ऑगस्ट रोजीच बांद्यात महापूर आल्याने पुरच्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. पावसाचा जोर कायम असल्याने बांदावासीयांवर रात्र जागून काढण्याची वेळ आली आहे. व्यापाऱ्यांनी दुकानांमधील साहित्य सुरक्षितस्थळी हलविले. बाजारात असलेले भाजी विक्रेते तसेच बाजारासाठी आलेल्या छोट्या विक्रेत्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले. छोट्या भाजी विक्रेत्यांची भाजी पुराच्या पाण्यात वाहून गेली. 

आळवाडी-कट्टा कॉर्नर रस्ता पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. रात्रीच्या काळोखात व्यापारी व स्थानिक यांना सामान सुरक्षितस्थळी हलविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. ग्रामपंचायत उद्यानात पाणी शिरल्याने नुकसान झाले. मच्छीमार्केट पाण्याखाली गेल्याने मच्छी बाजार कट्टा कॉर्नर चौकात बसविला होता. निमजगा येथील लक्ष्मी-विष्णू या निवासी इमारतीचा तळमजला पूर्णपणे पाण्याखाली गेला. त्यामुळे रहिवासी इमारतीत अडकून पडले.

हेही वाचा - सावंतवाडीला पावसाने झोडपले; ग्रामीण भागालाही वादळी वाऱ्याचा तडाखा

तेथिलच भंगार आळीत व लमाणी वस्तीत पाणी शिरल्याने कामगारांच्या झोपड्या वाहून गेल्या. श्री यमतेश्वर मंदिरावर झाड पडल्याने नुकसान झाले. शेर्ले येथील जुने कापई पूल, मडुरा येथील माऊली मंदिर समोरील पुलावर पाणी आल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णपणे बंद होती. शेर्ले कापई परिसरातील भातशेती वाहून गेली. बांदा-डेगवे रस्त्यावर कॉजवे पाण्याखाली गेल्याने वाहतूक बंद होती. सरपंच अक्रम खान यांनी पूरस्थितीची पाहणी केली. 

स्थानिक युवकांचे मदतकार्य 
आळवाडी बाजारपेठेत तब्बल 8 फुटांहून अधिक पाण्याची पातळी होती. अनेक दुकाने व घरांमध्ये पुराचे पाणी शिरले होते. अशा परिस्थितीत आपत्ती व्यवस्थापन नसल्याने स्थानिक युवकच नेहमीप्रमाणे मदतीसाठी सरसावले. पुराच्या पाण्यातून पोहत जाऊन आळवाडी येथे नदीकाठी बांधून ठेवलेली होडी बाजारपेठेत आणून पुराच्या पाण्यात अडकलेल्या अनेकांना सुरक्षितस्थळी आणण्यात आले. होडीच्या साहाय्याने साहित्य देखील काढण्यात आले. 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy rains cause flooding in Banda