अतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा

अतिवृष्टीचा कोकणातील सुपारी बागांना तडाखा

कोलझर - अतिवृष्टीचा तडाखा दोडामार्ग तालुक्‍यासह जिल्हाभरातील सुपारी बागायतींना बसला आहे. कोट्यवधी किमतीचे पीक गळून बागायतीमध्ये अक्षरश: सडा पडत आहे. यामुळे सुपारी बागायतदार मोठ्या संकटात सापडला आहे. कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे उद्या (ता.२१) जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांनी बागायतदारांना दिलासा द्यावा, अशी मागणी होत आहे.

जिल्ह्यात दोडामार्ग, वेंगुर्ले, कुडाळ तालुक्‍यात सुपारी बागायतीचे प्रमाण बऱ्यापैकी आहे. पंचक्रोशीतील अर्थकारण तर याच पिकावर अवलंबून आहे. मुळातच सुपारीच्या दराबाबत असलेल्या अनिश्‍चिततेमुळे हे बागायतदार आर्थिक ओढाताणीत असतात. याची बाजारपेठ पूर्णतः गोव्यावर अवलंबून आहे. महाराष्ट्र सरकारच्या गणतीतच हे पीक नसल्यात जमा आहे. अतिवृष्टीमुळे सुपारीला खूप मोठा फटका बसला आहे.

साधारणपणे सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून सुपारीच्या काढणीचा हंगाम सुरू होतो. मे पासून फलधारणेला सुरवात होते. यंदा हे पीक पक्‍व होण्याच्या काळातच मुसळधार पावसाने झोड उठवली. सततच्या पावसामुळे बुरशीजन्य रोगाचा प्रादुर्भाव व्हायला सुरवात झाली. पूरस्थिती निवळल्यानंतर या नव्या संकटाची चाहूल लागली. 

तळकट येथील बागायतदार सिध्देश देसाई याबाबत म्हणाले, ‘‘यंदा सलग पडलेल्या पावसाचे प्रमाण खूप जास्त होते. पावसाचे प्रमाण कमी झाल्यानंतर बुरशी वाढली. याचा खूप मोठा फटका सुपारी बागांना बसला आहे. अख्ख्या बागायतीत कोवळ्या सुपारीचा खच पाहायला मिळत आहे. 

ही स्थिती बघून बागायतदार अक्षरशः डोळ्यात पाणी आणतो. पंचक्रोशीतील शेकडो कुटुंबांचे अर्थकारण केवळ सुपारीवर अवलंबून आहे. पूर्ण पीकच हातचे गेल्यामुळे पुढचे वर्ष कसे काढायचे, हा प्रश्‍न आहे. आमच्या सुपारी बागायतदारांना कधीच भरपाई मिळत नाही. शासन कधीही या बागायतदारांचे अश्रू पुसायला येत नाही. सध्या पुरस्थितीमुळे मोठ्याप्रमाणात सुपारीची झाडे मोडून पडली. अनेकांची शेतजमीन वाहून गेली. त्यापाठोपाठ बसणारा हा फटका सहनशिलतेच्या पलिकडे आहे. कृषीमंत्र्यांनी याची सहानुभूतीपूर्वक दखल घ्यावी.’’

सावत्र वागणूक
राज्याकडून कृषी उत्पादनांवर कर लावला जात नाही; मात्र काही वर्षापूर्वी सुपारी बागांवर उपकर लावला गेला. याची याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. हे कारण दाखवून राज्यशासन या बागायतदारांना कोणतीच भरपाई देत नाही. गेल्यावर्षीही मोठ्या प्रमाणात गळ होवून सुध्दा काहीच मदत करण्यात आली नाही. एकूणच सुपारी बागायतदारांना राज्याकडून सावत्र वागणूक मिळते. यावेळची हानी कल्पनेपलीकडची आहे.

सुपारीची गळ होण्याचे प्रमाण खूप मोठे आहे. येत्या काही दिवसांत ही गळ अशीच चालू राहिल्यास झाडावर फळच शिल्लक राहणार नाही. सुपारी बागांवर व्यवस्थापनासाठी येणारा खर्च मोठा असतो. यात पाणी व्यवस्थापन, खत, फवारणी आदीचा समावेश आहे. यावेळी बागायतदारांना मदतीचा हात मिळायलाच हवा. सिंधुदुर्ग दौऱ्यावर येणाऱ्या कृषीमंत्र्यांकडे याबाबतचे गाऱ्हाणे घातले जाणार आहे.
- गणेशप्रसाद गवस,
माजी सदस्य- पंचायत समिती

सरकार आणि प्रशासनाच्या मते माड आणि सुपारीचे झाड मोडले तरच नुकसान भरपाई मिळते. रोगामुळे नुकसान झाल्यास ती भरपाई देता येत नाही. आताही कृषी अधिकारी सुपारीचे नुकसान नोंदवून घ्यायला नकार देत आहेत. गेली २० वर्षे आम्ही हेच अनुभवतोय. सुपारी बागायतीचा अनुभव व अभ्यास नसलेले नेते व लोकप्रतिनिधी आमच्या रास्त मागण्यांकडे लक्ष देत नाहीत.
- दीपक सिद्धये,
बागायतदार

गळत असलेली सुपारी कोवळी
सध्या मोठ्या प्रमाणात सुपारीची गळ सुरू झाली आहे. अनेकांच्या अख्ख्या बागा रिकाम्या झाल्या आहेत. झोळंबे, असनिये, कोलझर, तळकट, शिरवल, उगाडे आदी गावांत याची तीव्रता प्रचंड आहे. सुकवून सोललेल्या सुपारीला किलोमागे साधारण सव्वादोनशे रुपये दर मिळतो; मात्र गळ झालेल्या सुपारीला सर्रास फेकून द्यावे लागते. सध्या गळत असलेली सुपारी एकदमच कोवळी आहे. यामुळे कच्ची सुपारी (गेर) म्हणून विकण्यासारखीही स्थिती नाही. यामुळे बागायतदार मोठ्या आर्थिक संकटात सापडला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com