मालवण तालुक्‍यात पूरस्थिती; मुसळधार सुरूच, अनेक गावांना फटका

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 8 जुलै 2020

गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका तालुक्‍यातील अनेक गावांना बसला आहे. यात सुकळवाड येथील सुनील पालकर यांच्या भात गिरणीच्या इमारतीत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

मालवण ( सिंधुदुर्ग ) - तालुक्‍यास आजच्या चौथ्या दिवशीही मुसळधार पावसाने झोडपून काढले. मुसळधार पावसामुळे नद्या, नाल्यांना पूर आला असून तालुक्‍यातील अनेक रस्ते बंद झाल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. पुराच्या पाण्याचा फटका तालुक्‍यातील अनेक गावांना बसला आहे. यात घुमडेतील घुमडाई मंदिरात पावसामुळे आलेल्या पुराचे पाणी घुसले. शहरात ठिकठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. मुख्य वीज वाहिन्यांवर झाडे पडल्याने शहरातील वीजपुरवठा खंडित झाला होता. सकाळी आठ वाजेपर्यंत 104 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असल्याची माहिती महसूल कार्यालयातील आपत्कालीन कक्षातून देण्यात आली. 

गेले तीन दिवस कोसळणाऱ्या पावसाचा जोर आणखीनच वाढला आहे. मुसळधार पावसाचा फटका तालुक्‍यातील अनेक गावांना बसला आहे. यात सुकळवाड येथील सुनील पालकर यांच्या भात गिरणीच्या इमारतीत पाणी घुसल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यांच्या भातशेतीतही मोठ्या प्रमाणात पाणी घुसले आहे. ग्रामपंचायत सदस्य नरेंद्र पाताडे व बाळा बागकर यांच्या राहत्या घराच्या परिसरात पाणी घुसले. सुकळवाड पुलानजीक बागकर यांच्या जुन्या व नवीन बांधलेल्या घरात पाणी घुसल्याने घरातील मंडळींना सुरक्षितरित्या घराबाहेर काढण्यात आले. पूरस्थिती वाढल्याने त्यांच्या घरातील सर्व अत्यावश्‍यक साहित्य बाहेर काढणे आवश्‍यक असल्याने पंचायत समिती सभापती अजिंक्‍य पाताडे, किशोर पेडणेकर, कौस्तुभ मसुरकर, संतोष बिलये, विष्णू पेडणेकर, संतोष टेंबुलकर, सुनील पाताडे, मामा वायंगणकर आदींनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्यात सहभाग घेतला. सुकळवाडचे तलाठी, ग्रामसेवक यांनी घटनास्थळी भेट देऊन झालेल्या नुकसानीची पाहणी केली. 

नदीला आलेल्या पुराचा फटका घुमडे येथील घुमडाई मंदिरासही बसला. पुराचे पाणी मंदिरात मोठ्या प्रमाणात घुसले होते. शिवाय पुराच्या पाण्याने मंदिरास वेढा घातल्याचे दिसून आले. ओझर नाक्‍यानजीकच्या रस्त्यावरून मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते; मात्र वाहतूक सुरू होती. पुराच्या पाण्यामुळे नांदरूख-कातवड मार्ग बंद झाला होता. कांदळगाव-मसुरे रस्त्यावरही मोठ्या प्रमाणात पाणी आले होते. बागायत माळगाव परिसरातही मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी घुसल्याने तिन्ही मार्ग बंद झाले होते.

या भागातील भातशेती पाण्याखाली गेली होती. चांदेर येथील रामचंद्र मेस्री यांच्या घरालगतची दरड कोसळल्याची घटना घडली. भगवंतगड-बांदिवडे येथील छोटा पूल पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक पूर्णतः ठप्प झाली होती. पोईप धरणातील पाण्याच्या साठ्यात वाढ झाल्याने पोईप मार्गही बंद झाला होता. किर्लोस गावात जाणारा बंधारा पाण्याखाली गेला होता; मात्र पर्यायी मार्ग असल्याने त्याचा वाहतुकीवर परिणाम झाला नाही. मुसळधार पावसामुळे कट्टा येथील रस्ते पाण्याखाली गेले होते. तसेच बाजारपेठेतील चार दुकानांमध्ये पाणी घुसल्याची घटना घडली.

रेवंडी सिंडिकेट बॅंकेलगतच्या कॉजवेवर पुराचे पाणी तुंबल्याने रस्ते पाण्याखाली गेले होते. शिवाय पुराचे पाणी लगतच्या बागांमध्ये घुसले. कॉजवेच्या खालून पाणी जाण्याचा मार्ग हा अरूंद असल्याने पाण्याच्या प्रवाहाबरोबर कॉजवे वाहून जाण्याची भीती ग्रामस्थांनी व्यक्त केली. याचा फटका बॅंकेसह परिसरातील घरांना बसण्याची शक्‍यता असून प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष पुरवून नवीन कॉजवे या ठिकाणी मंजूर करावा, अशी मागणी माजी सभापती सोनाली कोदे, ग्रामपंचायत सदस्या प्रज्वला चेंदवणकर, विजय कांबळी, अनिल वराडकर, पांडुरंग कांबळी, विलास चेंदवणकर, शैलेश कांबळी, श्री. वाडेकर यांनी केली आहे. 

शहरात मुसळधार पावसामुळे पंचायत समिती कार्यालयाकडे जाणाऱ्या मार्गावरील शशांक घुर्ये यांचे आंब्याचे झाड कोसळले. याच परिसरात मेथर कुटुंब राहते. त्यांच्या घराच्या बाजूला झाड कोसळल्याने कोणतेही नुकसान झाले नाही. घरासमोर असलेली मोटारही बचावली; मात्र रस्त्यावरून जाणाऱ्या मुख्य वीज वाहिनीवर झाड कोसळले. यात एक माडाचे झाड कोसळल्याने नुकसान झाले. नगराध्यक्ष महेश कांदळगावकर यांनी तत्काळ याची माहिती महावितरण व पालिका प्रशासनास दिली.

बांधकाम सभापती यतीन खोत, मंदार केणी यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. महावितरणने वीजपुरवठा तत्काळ खंडित केला. त्यानंतर पालिका कर्मचाऱ्यांनी रस्त्यावरील फांद्या हटवून मार्ग खुला केला. सायंकाळपर्यंत हे झाड हटविण्याचे काम सुरू होते. सायंकाळी साडेचार वाजण्याच्या दरम्यान शहरातील वीजपुरवठा पूर्ववत झाला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains In Malvan Taluka Flood Situation Sindhudurg Marathi News