esakal | गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजापुरात पूरस्थिती 
sakal

बोलून बातमी शोधा

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजापुरात पूरस्थिती 

राजापूर - ऑगस्टच्या सुरवातीला धुमाकूळ घालून तब्बल पाच दिवस पूरस्थिती निर्माण करणारा पाऊस गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुन्हा परतला आहे. शनिवारपासून (ता. 31) पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ होऊन त्यांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. शहरातील चिंचबांध परिसर पाण्याखाली गेला असून शीळ - गोठणेदोनिवडे रस्त्यावरही पुराचे पाणी चढले आहे.

गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला राजापुरात पूरस्थिती 

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

राजापूर - ऑगस्टच्या सुरवातीला धुमाकूळ घालून तब्बल पाच दिवस पूरस्थिती निर्माण करणारा पाऊस गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुन्हा परतला आहे. शनिवारपासून (ता. 31) पडणाऱ्या पावसामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ होऊन त्यांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. शहरातील चिंचबांध परिसर पाण्याखाली गेला असून शीळ - गोठणेदोनिवडे रस्त्यावरही पुराचे पाणी चढले आहे. 

या महिन्याच्या सुरवातीला तालुक्‍यामध्ये अतिवृष्टी झाली. त्यामध्ये तालुक्‍यातून वाहणाऱ्या अर्जुना आणि कोदवली नद्यांना पूर आला होता. शहरासह बाजारपेठेला विळखा घातलेल्या पुराचे पाणी तब्बल पाच दिवस ओसरले नव्हते. अनेक गावांचा एकमेकांशी संपर्क तुटला होता. त्यातून तालुक्‍याचे जनजीवन विस्कळित झाले होते. त्यातून सावरत जनजीवन पूर्वपदावर आले होते. त्यानंतर पावसाने दडी मारली होती; मात्र गणेशोत्सवाच्या पूर्वसंध्येला पुन्हा एकदा पाऊस परतला आहे.

गेले दोन दिवस तालुक्‍यामध्ये जोरदार पाऊस पडत आहे. आज सकाळपासून पाऊस सुरूच आहे. त्यामुळे अर्जुना आणि कोदवली नद्यांच्या पाण्यामध्ये वाढ होऊन त्यांनी धोक्‍याची पातळी गाठली आहे. शहरातील शिवाजी पथ रस्त्यावरील चिंचबांध परिसर दुपारीच पाण्याखाली गेला. त्यामुळे तेथून सुरू असलेली वाहतूक सायंकाळी उशिरापर्यंत ठप्प होती. शहरानजीकचा शीळ-गोठणेदोनिवडे रस्ताही पाण्याखाली गेला होता.

जवाहर चौकातील कोदवली नदीच्या काठावरील टपऱ्यांना पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. नद्यांच्या काठावरील भातशेती उभारी घेत असताना पुन्हा एकदा पाण्याखाली गेली आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिल्यास राजापुरात गणेशोत्सवामध्ये पुन्हा एकदा पूरस्थिती निर्माण होण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. या संभाव्य पूरस्थितीने व्यापाऱ्यांच्या मनामध्ये चांगलीच घालमेल सुरू झाली होती. 

चाकरमान्यांना करावी लागली पायपीट 
गणेशोत्सवासाठी शीळ-गोठणे दोनिवडे गावामध्ये मोठ्या संख्येने मुंबईकर आज दाखल झाले. महामार्गावरील वाहतूक कोंडीने चाकरमानी आधीच त्रस्त झाले असताना पुराच्या पाण्याखाली गेलेल्या रस्त्याने भर घातली. अर्जुनीच्या काठावरील शीळ गोठणेदोनिवडे रस्ता पाण्याखाली गेल्याने या मार्गावरील वाहतूक विस्कळित झाली होती. त्याचा फटका चाकरमान्यांना बसला. त्यांना काही किमीचा प्रवास पायी करावा लागला. 

loading image
go to top