#KonkanRains रत्नागिरी जिल्ह्यात पावसाने हाहाकार 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 5 ऑगस्ट 2019

रत्नागिरी - श्रावणात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात हाहाकार माजला. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांना आलेल्या पुरामुळे चिपळूण, खेड शहर पाण्याखाली गेले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले. चिंचघर (ता. मंडणगड) येथे दरड कोसळल्याने 27 घरांना धोका निर्माण झाला आहे.

रत्नागिरी - श्रावणात वादळी वाऱ्यासह पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रत्नागिरी जिल्ह्यात हाहाकार माजला. वाशिष्ठी, जगबुडी नद्यांना आलेल्या पुरामुळे चिपळूण, खेड शहर पाण्याखाली गेले आहे. अनेक गावांचा संपर्क तुटला असून जनजीवन विस्कळित झाले. चिंचघर (ता. मंडणगड) येथे दरड कोसळल्याने 27 घरांना धोका निर्माण झाला आहे. पावसामुळे मुंबई-गोवा महामार्ग बंद होता, तर निळे येथे पाणी भरल्याने कोल्हापूरकडील मार्ग बंद झाला. कोकण रेल्वे ठप्प झाल्याने रत्नागिरीचा अन्य जिल्ह्यांशी संपर्क तुटला. 

रविवारी मध्यरात्रीपासून वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस कोसळत होता. या पावसाने जिल्ह्यातील सगळ्याच मोठ्या नद्यांना पूर आला होता. रत्नागिरीसह जिल्ह्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. कोयना धरणातील पाणी सातत्याने नदीपात्रात सोडल्याने वाशिष्ठी नदीने रुद्रावतार धारण केला होता.

किनाऱ्यावरील भातशेती, पूल, रस्ते पाण्याखाली गेले होते. अनेक गावांचा शहराशी संपर्क तुटला होता. छोट्या-छोट्या नद्यांनाही पाणी आल्यामुळे नागरिकांनी घरातच राहणे पसंत केले होते. शहरांसह ग्रामीण भागातील प्रमुख बाजारपेठांमध्ये दिवसभर शुकशुकाट होता. जगबुडी नदीचे पाणी खेड शहरात घुसले होते, तर मुंबई-गोवा महामार्ग बंद ठेवण्यात येत होता. त्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. बावनदीवरील पुलाजवळ पुराचे पाणी आल्यामुळे तेथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण होते; मात्र पाण्याची पातळी ओसरल्यामुळे सर्वांनी निःश्‍वास सोडला. 

रत्नागिरी तालुक्‍यात काजळी नदीच्या पुराचे पाणी चांदेराई बाजारपेठेत शिरले. सोमेश्वर येथे खाडीच्या पाण्याची पातळी वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी आल्याने वाहतूक बंद होती. समुद्राच्या लाटांमुळे मिऱ्या गाव उद्‌ध्वस्त झाले असून येथील भाग आणखी वाहून गेला आहे. घराच्या प्रवेशद्वारासह आणखी एक नारळाचे झाड वाहून गेले. साटवली (लांजा) येथे नदीचे पाणी घरात शिरले असून चार घरे, एक मदरसा व एक दर्गा पाण्याने वेढला गेला होता.

तेथील लोकांचे तात्पुरते स्थलांतर केले. साटवली येथील पूलही पाण्याखाली गेल्यामुळे दोन वाड्यांचा संपर्क तुटला आहे. आसगे टोळेवाडी (ता. लांजा) येथील घरे, गोठ्यांचे वादळामुळे मोठे नुकसान झाले आहे. काही ठिकाणी वाऱ्यामुळे पत्रे उडाले होते. मंडणगडमधील पालवणी ते नारगोली हा रस्ता दरड कोसळल्यामुळे बंद झाला असून मातीचा ढिगारा काढण्याचे काम सुरू होते. तेथील वाहतूक बंद ठेवली होती. 

शाळांना आज सुटी 
हवामान विभागाने 7 ऑगस्टपर्यंत अतिवृष्टी होण्याची शक्‍यता वर्तविली आहे. तसेच ताशी 40 किलोमीटर वेगाने वारे वाहतील असेही सूचित केले आहे. सुरक्षिततेसाठी रत्नागिरी जिल्ह्यातील सर्व शाळांना सोमवारी (ता. 5) सुटी देण्यात आल्याचे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी जाहीर केले आहे. 

समुद्राचे तांडव 
वेगवान वाऱ्यामुळे समुद्र खवळलेला असून किनारी भागात पाणी घुसत आहे. रत्नागिरी, दापोली तालुक्‍यातील गावांना याचा फटका बसला. अजस्र लाटांमुळे सलग दोन दिवस मासेमारी ठप्प झालेली आहे. भरतीच्या वेळी पाणी वाढल्याने जेटीला उभ्या केलेल्या नौकांना धोका निर्माण झाला होता. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Heavy Rains in Ratnagiri District