#KonkanRains सिंधुदुर्ग पूरमय 

#KonkanRains सिंधुदुर्ग पूरमय 

कणकवली - सिंधुदुर्गात सुरू असलेल्या मुसळधार पावसाने आज कहर करीत अक्षरशः दाणादाण उडवली आहे. ढगफुटी सदृश्‍य पाऊस आणि त्याला वादळी वाऱ्यांची साथ, यामुळे मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गासह अनेक प्रमुख मार्गावर मोठमोठे वृक्ष कोसळले. यात जिल्ह्यातील वाहतूक ठप्प झाली होती. वीज तारांवर झाडे कोसळल्याने अनेक गावे अंधारात लोटली होती.

सायंकाळी पाचनंतर खारेपाटण शहरात विजयदुर्ग खाडीचे पाणी घुसल्याने तेथील नागरिकांनी एकच धावपळ उडाली होती. जिल्ह्याच्या इतर भागातही पुराच्या पाण्याने वेढा घातला. पावसाचा जोर कायम असल्याने सर्वच नद्या, नाल्यांनी धोक्‍याची पातळी ओलांडली आहे. यात अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे. सर्वच कंपन्यांची मोबाईल सेवा तसेच लॅण्डलाईन सेवा देखील कोलमडली आहे. 

गेल्या दोन महिन्यात कोसळला नाही एवढा पाऊस गेल्या चार दिवसांपासून सिंधुदुर्गात सुरू आहे. अक्षरशः ढगफुटीप्रमाणे कोसळणाऱ्या पावसामुळे आज सकाळपासूनच ग्रामीण भागातील बहुतांश रस्ते, पूल पाण्याखाली जाऊन अनेक गावांचा संपर्क तुटला. याखेरीज शेकडोंच्या संख्येने घरे व गोठयांची पडझड होऊन लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. 

मुसळधार पावसामुळे खारेपाटणवासीयांची झोप उडाली असून सायंकाळी पाच नंतर शहरात पाण्याचा शिरकाव झाला आहे. रात्री देखील असाच पाऊस सुरू राहिला. खारेपाटण बाजारपेठेसह अन्य भागात चार ते सहा फुटापर्यंत पाणी येण्याची शक्‍यता आहे. सद्यःस्थितीत खारेपाटण शहरात येण्याचा मार्ग बंद झाला आहे. याखेरीज जैनवाडीचाही संपर्क तुटला आहे. गडनदीचे धोक्‍याची पातळी ओलांडल्याने मसुरे गावातही पाणी आले आहे. यात खोत जुवा बेटावर पाणी घुसल्याने अनेक घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडला आहे. 

मुंबई- गोवा महामार्गावरील जानवली पुल येथे भले मोठे दोन वृक्ष सायंकाळी सहाच्या सुमारास कोसळले. त्यानंतर रात्री आठपर्यंत झाड हटविण्याचे प्रयत्न सुरू होते. आजच्या मुसळधार पावसामुळे कणकवली तालुक्‍यातील आचरा, जानवली, सातरल-कासरल, नागवे या रस्त्यांवर पाणी आल्याने वाहतूक बंद ठेवण्यात आली होती. 

कुडाळ तालुक्‍यात पावसाचा जोर कायम असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. ग्रामीण व शहरी भागात पूल पाण्याखाली गेल्याने वाहतूक ठप्प झाली. वादळी वाऱ्याने ठिकठिकाणी पडझड होऊन नुकसान झाले. कोकण रेल्वे वाहतूक बंद असल्याने स्थानके ओस पडली. 

माणगाव खोऱ्यात दुकानवाड, नेरूर कार्याद नारूर, उपवडे, वसोली, आंबेरी पुलावरून पाणी वाहत आहे. त्यामुळे वाहतूक बंद आहे. नागरिकांना खबरदारी घेण्याची सूचना देण्यात आली आहे. पिंगुळी तलाव येथे झाड पडल्याने विद्युत खांब जमीनदोस्त झाले आहेत. 

मालवण तालुक्‍यातील तोंडवळी तळाशीलला उधाणाचा धोका वाढला असून केव्हाही हा भाग समुद्र गिळंकृत करू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीच्या बराचसा भागाची मोठी धुप झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. 

वेंगुर्ले तालुक्‍यात वादळी वाऱ्यासह मुसळधार झालेल्या पर्जन्यवृष्टीत झाडे उन्मळून घरावर, रस्त्यावर व वीजवाहिन्यांवर पडून नुकसान झाले. तालुक्‍यातील वीज पुरवठा 24 तास खंडित झाला व वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडले. श्री देव मानसीश्‍वर देवस्थानच्या सभोवती पावसाच्या पाण्याने वेढा दिलेला होता. वेंगुर्ले मठ मार्गे कुडाळ रोडवर जुनाट वृक्ष कोसळून पडल्याने सुमारे पाच ते सहा तास वाहतूक ठप्प झाली होती. 
सावंतवाडी तालुक्‍यामध्ये ढगफुटी सदृश्‍य पाऊस झाला.

तालुक्‍यातील पुलावर पाणी आल्याने सर्व ठिकाणची वाहतूक ठप्प झाली. गावातील रस्त्यांना नदीचे स्वरूप आले होते. 
दोडामार्ग तालुक्‍यात आज पूरस्थिती उद्भवली. साटेली आवाडे येथे पुलावर पाणी आल्याने दोडामार्ग तिलारी मार्गावरील वाहतूक बंद झाली होती. मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळित झाले. तालुक्‍यातील सर्व मार्ग वाटेवरील बहुतेक पूल पाण्याखाली गेल्याने बंद झाले होते. 

कोकण रेल्वे सुरू 
कोकण रेल्वे मार्गावरील दरड हटविण्यात आल्यानंतर दुपारी कोकण रेल्वेचा मार्ग सुरळीत झाला. यात सर्वप्रथम जनशताब्दी आणि राजधानी एक्‍स्प्रेस मुंबईच्या दिशेने मडगाव येथून रवाना झाल्या. त्यानंतर सायंकाळी तुतारी आणि कोकणकन्या एक्‍स्प्रेस सोडण्यात आल्या. रखडलेलया नेत्रावती, मत्स्यगंधा, मंगलोर या गाडया देखील मार्गस्थ झाल्याने रेल्वे प्रवाशांना दिलासा मिळाला. 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com