सावंतवाडीला पावसाने झोडपले; ग्रामीण भागालाही वादळी वाऱ्याचा तडाखा

savantwadi
savantwadi

सावंतवाडी : येथील तालुक्यात आज मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे. तालुक्याची राजधानी असलेल्या सावंतवाडी शहराला याचा सर्वात मोठा फटका बसला असून शहरातील संत गाडगेबाबा भाजी मंडईच्या छपराला असलेले पत्रे वादळी वाऱ्याने उडून गेल्याने मोठे नुकसान झाले. यातील एक पत्रा अंगावर पडून डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने एका महिलेला उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले तर येथील श्रीराम वाचन मंदिरासमोर उभ्या असलेल्या एका मोटारीवर सुरूचे झाड कोसळल्याने मोटारीचे मोठे नुकसान झाले. यातील एक महिला सुदैवाने बचावली. ग्रामीण भागालाही वादळी वाऱ्याचा तडाखा बसला आहे.

तालुक्यात काल मध्यरात्रीपासून सुरू झालेल्या पावसाने ग्रामीण तसेच शहरी भागाला तुफान बॅटिंग करीत अक्षरशः झोडपून काढले आहे. त्यामुळे आज दिवसभरात वाहतूक व्यवस्था आणि जनजीवन पूर्णतः विस्कळीत झालेले दिसून आले. अनेक दिवस वादात सापडलेल्या भाजी मंडईच्या छपराचा पत्रा अंगावर कोसळून भाजी विक्रेती महिला जखमी झाली. यात तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली आहे.

ही घटना आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास घडली. तिला अधिक उपचारासाठी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सुदैवाने अन्य कोणत्याही भाजी विक्री त्याला गंभीर दुखापत झाली नाही. संबंधित महिला भाजीपाला विकण्यासाठी भाजी मंडईत बसली होती. दरम्यान अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस झाल्याने मंडई वरील पत्रे उडून गेले. याच दरम्यान वार्‍यासोबत आलेला पत्रा संबंधित महिलेवर कोसळुन ती जखमी झाली. तर याठिकाणी असलेल्या अनेक व्यापाऱ्यांची सुद्धा पळता भुई थोडी झाली.

आज दुपारच्या सुमारास शहरात झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या आहेत. यात अनेकांचे मोठे नुकसान झाले आहे. तर अनेकांच्या घरावरची दुकानावरची छप्परे उडून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच येथील श्रीराम वाचन मंदिर समोर उभ्या असलेल्या कारवर तलावाकाठचे झाड कोसळल्यामुळे अपघात झाला. यावेळी या मार्गावरील वाहतूक एक मार्गे सुरू होती. झाड कोसळल्याने यात मोटारीचे मोठे नुकसान झाले. मात्र या मोटारीत असलेली एक महिला व वृद्ध सुदैवाने बचावले. पालिका पदाधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत हे झाड बाजूला करून रस्ता पूर्ववत केला.

शहरासह ग्रामीण भागालाही तुफान पावसाने झोडपून काढले आहे. काल रात्री मध्यरात्रीपासून हा पाऊस सुरू झाला आहे.  गेल्या चार ते पाच दिवसापासून अधून-मधून कोसळत असलेल्या पावसाने पुन्हा एकदा आपले उग्ररूप येथील तालुक्याला दाखवून दिले आहे. ग्रामीण भागात खालावलेली नदीची पात्रं पुन्हा एकदा भरून निघाली आहेत. अनेक ठिकाणी पुलावर पाणी येण्याचे प्रकार घडले मात्र वाहतूक व्यवस्था संथ गतीने सुरू होती

संपादन - सुस्मिता वडतिले 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com