तोंडवळी तळाशीलला उधाणाचा धोका

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 6 ऑगस्ट 2019

आचरा - तोंडवळी तळाशीलला उधाणाचा धोका वाढला असून, केव्हाही हा भाग समुद्र गिळंकृत करू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीच्या बऱ्याचशा भागाची मोठी धूप झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आचरा हिर्लेवाडी येथे किनारपट्टीवर उभा केलेला हायमास्ट कोसळण्याच्या स्थितीत आहे.

आचरा - तोंडवळी तळाशीलला उधाणाचा धोका वाढला असून, केव्हाही हा भाग समुद्र गिळंकृत करू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीच्या बऱ्याचशा भागाची मोठी धूप झाली आहे. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. आचरा हिर्लेवाडी येथे किनारपट्टीवर उभा केलेला हायमास्ट कोसळण्याच्या स्थितीत आहे.

जिल्ह्यात पावसाचा जोर कायम असून याचा मोठा फटका किनारपट्टीतील भागाला बसत आहे. आचरा समुद्र किनाऱ्याचीही मोठ्या प्रमाणात धूप होत असून समुद्र सुरू बने गिळंकृत करत आहे. हिर्लेवाडी येथे समुद्र किनारी उभा केलेला हायमास्ट केव्हाही कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. तोंडवली तळाशिला उधाणाचा धोका वाढला असून केव्हाही हा भाग समुद्र गिळंकृत करू शकतो, अशी स्थिती निर्माण झाली आहे. समुद्राच्या लाटांमुळे किनारपट्टीच्या बराचसा भागाची मोठी धुप झाली असून दिवसेंदिवस खाडी आणि समुद्र यांच्यातील अंतर कमी होत आहे. समुद्र वस्तीपासून काही फुटांवर आल्याने भयभीत झालेले ग्रामस्थ घराबाहेरच थांबले होते; मात्र येवढे संकट कोसळून ही शासन, प्रशासनाकडून कोणतीही दखल घेतली गेलेली नाही.

आज संतापलेले तळाशिलवासिय समुद्र किनारी एकवटले. यावेळी सरपंच आबा कांदळकर, संजय तारी, रमेश रेवंडकर,आबा मलबारे, पांडूरंग शेलटकर, रघुनाथ हडकर,सत्यवान केळूस्कर,संजय अंकुश तारी आदी ग्रामस्थ उपस्थित होते. तोंडवळी तळाशील सरपंच आबा कांदळकर यांनी शासनाकडून दाखविण्यात येणाऱ्या उदासीनतेबद्धल नाराजी व्यक्त केली. वस्तीपासून काही फूटावर समुद्र आल्याने येथील ग्रामस्थांवर बुडून मरण्याची वेळ आली आहे. गेल्या वर्षाप्रमाणे यावर्षी ही उधाणाचा धोका वाढला आहे. तीन दिवस उधाणाचा प्रभाव जाणवत असून शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप तोंडवळी सरपंच कांदळकर यांनी केला असून गेल्यावर्षी तीन वेळा बंधाऱ्याबाबत लेखी निवेदन शासनास देण्यात आली होती.

फक्त बंधारा मंजूरी बाबत ग्रामपंचायतीला गेल्यावर्षी पत्र प्राप्त झाले होते; पण अजून पर्यंत बंधारा बांधण्याबाबत कोणतीही कार्यवाही झाली नाही.  बंधारा न झाल्याने बुडून मरण्याची भिती निर्माण झाली आहे. सी वर्ल्ड प्रकल्पाला तोंडवळीवासियांनी संमत्ती पत्रलेखन दिली म्हणणारे येथील ग्रामस्थ बुडण्याच्या मार्गावर असताना कोणी फिरकले नाहीत. ते आमच्या मरणाची वाट बघत आहेत का असा संतप्त सवाल यावेळी कांदळकर यांनी केला.

आचरा हिर्लेवाडी किनारपट्टीची समुद्राच्या लाटांनी मोठी धुप झाली असून चाळीस फुटांच्या आसपास किनारपट्टीची धुप झाल्याने किनाऱ्यावरचे सुरुचे वृक्ष समुद्रात कोसळून पडत आहेत. किनारपट्टीवर उभा केलेला हायमास्टही केव्हाही कोसळण्याची शक्‍यता निर्माण झाली आहे. याबाबत आचरा पोलीस पाटील जगन्नाथ जोशी यांनी खबर देताच आचरा सरपंच प्रणया टेमकर, उपसरपंच पांडूरंग वायंगणकर, मंगेश टेमकर, रेश्‍मा कांबळी आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. सोसाट्याच्या वारयांसह बरसणाऱ्या पावसाने आचरा हिर्लेवाडी येथील श्री प्रकाश वसंत वायगणकर व सुरेश वसंत खोत यांच्या राहत्या घरातील भिंत कोसळून किरकोळ नुकसान झाले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: heavy sea waves effects on Tondavali talasheel Coast