अशक्य ते शक्य! शेतीमधून साधली आर्थिक समृद्धी 

hi tech farming chinchole konkan sindhudurg
hi tech farming chinchole konkan sindhudurg

खारेपाटण (सिंधुदुर्ग) - बाजारपेठेचा अचूक अंदाज आणि उत्पादित शेतीमालाच्या विक्री व्यवस्थेचे नियोजन केले तर खरीप आणि रब्बी हंगामातही शेतीमधून भरघोस आर्थिक उत्पन्न निघू शकते. चिंचवली गावातील शेतकरी अनिल पेडणेकर यांनी हे वास्तवात उतरवून दाखविले आहे. शेतीक्षेत्रातील विविध पुरस्कार प्राप्त प्रगतिशील शेतकरी श्री.पेडणेकर यांनी यंदाच्या पावसाळ्यात चार एकर काजू बागेत भाज्यांचे आंतरपीक घेऊन तब्बल 40 हजाराचे उत्पन्न मिळविले. 

शेतीबागायती परवडत नाही असा सूर नेहमीच ऐकायला मिळतो; मात्र व्यावसायिक पद्धतीने शेती-बागायती केली तर शेतकरी निश्‍चितपणे आर्थिक समृद्ध होऊ शकतो याचा आदर्श चिंचवलीतील अनिल पेडणेकर यांनी घालून दिला आहे. मे अखेरीस काजू हंगाम संपतो. त्यानंतर पुन्हा पुढील वर्षीच्या मार्च-एप्रिल पर्यंत काजू बागांतून उत्पन्न निघत नाही; मात्र पेडणेकर यांनी चार एकर क्षेत्रातील काजू बागायतीतील काजू झाडांवर यंदा काकडी, दुधी भोपळा आणि भोपळा या वेलवर्गीय भाजीपाल्याची लागवड केली. यात ऑगस्ट ते ऑक्‍टोबर या कालावधीत काकडीचे भरघोस उत्पन्न निघाले. तर ऑक्‍टोबर नंतर भोपळा आणि दुधी भोपळा उत्पन्न देणारा ठरला. या चार एकर काजू बागेतून श्री.पेडणेकर यांनी 40 हजाराचे उत्पन्न मिळवून दाखवले आहे. 

श्री.पेडणेकर यांची दोन एकरात ऊस शेतीही आहे. सततच्या ऊस लागवडीमुळे मातीचा पोत बदलतो अनेकवेळा जमीनही नापिक होते. त्यामुळे यंदा ऊस शेती क्षेत्रात फेरपालट करण्यासाठी अनिल पेडणेकर यांनी दीड एकर क्षेत्रात भुईमूग लागवड केली आहे. तर उर्वरित अर्धा एकर क्षेत्रामध्ये कलिंगड, टॉमेटो, कोथिंबीर, वाल, लालभाजी, मूळा, मेथी, नवलकोल, गवार, मिरची, ढब्बू मिरची याखेरीज तूर, मटकी, मूग, कुळीथ, वरणे आदी पिकांची लागवड केली आहे. तर शेतीच्या बांधावर झेंडू, पांढरा तीळ आणि सूर्यफुलाची लागवड केल्याने शेतीशिवार देखील सुंदर बनले आहे. श्री.पेडणेकर यांचे शेतीप्रयोग पाहण्यासाठी अनेक कृषी विद्यापीठातील विद्यार्थीही चिंचवली येथे येत आहेत. 

बारमाही पाण्याची उपलब्धता असेल तर शेतीमधून दरवर्षी उत्पन्न निघू शकते. जिल्ह्यातील बाजारपेठांमध्येच शेतमालाला प्रचंड मागणी आहे. तरुणांनी मात्र मेहनत घ्यावी. तसेच हंगामानुसार विविध पिकांची लागवड केली तर युवक शेतीमधून आत्मनिर्भर बनू शकतो. 
- अनिल मनोहर पेडणेकर, चिंचवली 

संपादन - राहुल पाटील

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com