ऐन पर्यटन हंगामात मासळी कडाडली

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 20 एप्रिल 2019

एक नजर

  • वादळी वाऱ्याचा मासेमारीवर परिणाम
  • छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध
  • वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ
  • पर्यटन हंगामातच दर वाढ झाल्याने मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी  माेजावे लागत आहेत जादा पैसे. 

मालवण -  वादळी वाऱ्याचा जोरदार फटका कोकण किनारपट्टीस बसला आहे. याचा परिणाम मासेमारीवर झाला. छोट्या मच्छीमारांना किरकोळ मासळीच उपलब्ध होत असून, वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात दुप्पट वाढ झाली आहे. सध्या पर्यटन हंगाम सुरू झाला असून, मत्स्यखवय्यांना किमती मासळीचा आस्वाद लुटण्यासाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. आज या वाऱ्याचा जोर काहीसा कमी झाल्याचे मच्छीमारांनी स्पष्ट केले.

कोकण किनारपट्टी भागात रात्रीच्यावेळेस होणाऱ्या पर्ससीन, एलईडीच्या विध्वंसकारी मासेमारीमुळे गेले तीन चार महिने स्थानिक मच्छीमारांना मासळी मिळणेच कठीण बनले होते. मासेमारीसाठी मोठ्या प्रमाणात इंधनावर खर्च होत असताना मासळीचे म्हणावे तसे उत्पन्नच मिळत नसल्याने अनेक मच्छीमारांनी नौका समुद्रातच उभ्या केल्याचे चित्र दिसून आले.

एलईडी मासेमारीमुळे स्थानिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आल्याने पारंपरिक मच्छीमारांनी आक्रमक भूमिका घेतल्याने समुद्रात संघर्ष होण्याची शक्‍यता निर्माण झाली. यात सत्ताधाऱ्यांकडून एलईडीची मासेमारी रोखण्यात कोणतीही कार्यवाही होत नसल्याने मच्छीमारांनी ऐन निवडणुकीत मच्छीमारांनी निवडणुकीवर बहिष्काराची भूमिका घेतली.

मच्छीमारांच्या आक्रमक भूमिकेमुळे सत्ताधाऱ्यांनी या गंभीर प्रश्‍नाकडे तत्काळ लक्ष पुरविल्याने गेल्या काही दिवसांत जिल्ह्याच्या किनारपट्टी भागात मत्स्य व्यवसाय खात्याकडून कडक मोहीम राबवीत एलईडी मासेमारी करणाऱ्या नौका पकडण्याची कारवाई झाली. त्यामुळे मच्छीमारांमधून समाधान व्यक्त करण्यात आले.

गेल्या काही दिवसांत स्थानिक मच्छीमारांना मुबलक प्रमाणात किमती मासळी उपलब्ध होत होती. मात्र अचानक वादळी वाऱ्यामुळे समुद्रातील वातावरणात बदल होऊन त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. 

गेले तीन चार दिवस समुद्रातील वादळी वाऱ्याचा जोर वाढल्याने त्याचा परिणाम मासेमारीवर झाला आहे. गेल्या दोन दिवसात छोट्या मच्छीमारांना किमती मासळी काही प्रमाणात मिळाली. मात्र या मासळीच्या वाढत्या मागणीमुळे मासळीच्या दरात मोठी वाढ झाली.

खिश्‍याला कात्री
सध्या पर्यटन हंगाम तसेच सुटीचा कालावधी असल्याने मुंबईकर चाकरमानी, पर्यटक मोठ्या प्रमाणात दाखल होऊ लागले आहेत. यात किमती मासळीच्या दरात वाढ झाल्याने हॉटेलमधील मत्स्याहारी थाळ्यांच्या दरात ५० टक्के वाढ झाल्याचे दिसून येत आहे. मत्स्य खवय्यांकडून सुरमई, पापलेट, बांगडा आदी मासळीला पसंती असल्याने त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. 

मासळीचे दर 
५५० ते ७०० रुपये किलो दराने मिळणारी सुरमई आज १ हजार रुपये किलो, ८०० रुपये किलो दराने मिळणारे पापलेट १२०० रुपये, १२०० रुपये टोपली दराने मिळणारा बांगडा २४०० रुपये टोपली, ३५० रुपये किलो दराने मिळणारी मोरी ५०० रुपये किलो दराने आज उपलब्ध होत होती.

वातावरण बदलाची अपेक्षा
गेले तीन चार दिवस समुद्रातील वादळी वाऱ्याचा जोर आज काहीसा कमी झाला आहे. त्यामुळे चांगली मासळी मिळेल अशी अपेक्षा मच्छीमारांमधून व्यक्त होत आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: high rate to fish in Tourism season