रत्नागिरीत आता ‘हायवे मृत्युंजय दूत’ उपक्रम; वाढत्या अपघातांच्या मदतीसाठी नवी मोहीम

Highway Mrityunjay Doot will be implemented at Kashedi Chiplun Hatkhamba Police Helpline in Ratnagiri district.jpg
Highway Mrityunjay Doot will be implemented at Kashedi Chiplun Hatkhamba Police Helpline in Ratnagiri district.jpg

रत्नागिरी : मुंबई-गोवा महामार्गावरील अपघातात जखमींना तातडीने मदत मिळून त्यांचा जीव वाचावा, यासाठी ‘हायवे मृत्युंजय दूत’ हा उपक्रम रत्नागिरी जिल्ह्यातील कशेडी, चिपळूण, हातखंबा पोलिस मदतकेंद्रात राबविण्यात येणार आहे. जिल्ह्यातील रस्ते अपघातांची संख्या वाढत असल्याने त्यातील जखमींना तातडीने उपचार मिळण्यासाठी या योजनेची मदत होणार आहे.

राज्य महामार्ग पोलिस महासंचालक डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांच्या संकल्पनेतून १ मार्चपासून या उपक्रमाला रायगड परिक्षेत्र पोलिस अधीक्षक संजय बारकुंड यांच्या मार्गदर्शनाखाली सुरवात होत आहे. देशात महामार्गावरील रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख नागरिकांचा मृत्यू होतो. वेळेवर उपचार न मिळाल्याने मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक असते. नेमकी हीच बाब ओळखून हा उपक्रम सुरू करण्यात येत आहे.

या उपक्रमात राष्ट्रीय व राज्य महामार्गावरील मॉल, पेट्रोलपंप, ढाबे, हॉटेल्समधील कर्मचारी, गावातील नागरिकांचा समावेश असेल. चार-पाचजणांचा समूह तयार करण्यात येऊन त्यांना मृत्युंजय दूत या नावाने संबोधले जाईल. खासगी, शासकीय हॉस्पिटलचे अधिकारी तसेच सामाजिक संस्थेच्या स्वयंसेवकामार्फत या देवदूतांना जखमींवर प्रथमोपचार कसे करावे, त्यांना कसे हाताळावे, याचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. 

देवदूतांना उपचाराचे साहित्यही

देवदूतांच्या प्रत्येक समूहाला स्ट्रेचर व प्राथमिक उपचाराचे साहित्यही देण्यात येईल. याशिवाय महामार्गावरील हॉस्पिटलची नावे आणि त्यांचे संपर्क क्रमांकही देवदूतांकडे असतील. १०८ क्रमांकाची रुग्णवाहिका कुठे आहे, याची अद्ययावत माहितीही त्या देवदूतांकडे असेल. याशिवाय यादीतील हॉस्पिटलच्या रुग्णवाहिकेच्या चालकांचे क्रमांकही त्या समूहाकडे असतील. स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेची माहिती देण्याची जबाबदारीही ते पार पाडतील.

देवदूतांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार 

हायवे मृत्युंजय दूतांना महामार्ग सुरक्षा पथकाकडून ओळखपत्रही देण्यात येणार आहे. चांगले काम करणाऱ्या देवदूतांचा प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात येणार आहे. नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने या उपक्रमात सहभागी व्हावे, असे आवाहन महामार्गाचे अतिरिक्त पोलिस महासंचालकांनी केले.

- राज्य महामार्ग पोलिस महासंचालकांची संकल्पना
- १ मार्चपासून या उपक्रमाला रायगडातून प्रारंभ
- रस्ते अपघातात दरवर्षी दीड लाख लोकांचा अंत
- वेळेवर उपचाराअभावी मृत्यू होणाऱ्यांची संख्या सर्वाधिक

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com