मटण दरवाढीमागे 'हे' आहे कारण

सकाळ वृत्तसेवा
Thursday, 2 January 2020

बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, मालेगाव, सायखेडा, सटाणा, साखरी येथील स्थानिक मेंढपाळ तसेच व्यापारी बकरे विक्रीसाठी आणायचे. तेथील निर्यातदार कंपन्याकडून मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांची खरेदी केली जाते.

चिपळूण ( रत्नागिरी ) - महाराष्ट्रातील बकऱ्यांची निर्यात हे मटण दरवाढीचे मूळ कारण आहे. 31 डिसेंबरला मागणी असताना चिपळुणातील मटण व्रिक्री करणारी बहुतांशी दुकाने मालाअभावी बंद होती. नववर्षात ग्राहकांना चांगले मटण हवे तर जादा पैसे मोजण्याची तयारी ठेवावी लागेल, असे मटण विक्रेता संघटनेचे अध्यक्ष बिलाल पालकर यांनी "सकाळ'ला सांगितले. 

पालकर म्हणाले, आम्ही सातारा, पुणे व कल्याण जिल्ह्यातील बाजारातून बकरे खरेदी करतो. या बाजारपेठेत नाशिक जिल्ह्यातील पिंपळगाव, मालेगाव, सायखेडा, सटाणा, साखरी येथील स्थानिक मेंढपाळ तसेच व्यापारी बकरे विक्रीसाठी आणायचे. तेथील निर्यातदार कंपन्याकडून मोठ्या प्रमाणावर बकऱ्यांची खरेदी केली जाते. डिसेंबर अखेर नाशिक येथील विमानतळावरून दहा हजार बकरे आखाती देशातील शारजा, अबुधाबी तसेच अन्य भागात विक्रीसाठी पाठविण्यात आले. या कंपन्यांकडून परदेशात शेतीमाल निर्यात केला जातो. मात्र, या वर्षी या कंपन्यांनी थेट जिवंत बकरे खरेदी करून ते विमानांनी आखाती देशात पाठविले. त्यामुळे बाजारात बकऱ्यांचा तुटवडा निर्माण झाला आहे. 

परराज्यात मटणाचे किलोचे दर 700 ते 740 रुपयांपर्यंत

परराज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातील बकरे स्वस्त आहेत. मध्यप्रदेश, राजस्थान, उत्तरेतील बकऱ्यांपेक्षा महाराष्ट्रातील बकऱ्यांचे मांस चांगले असते. त्यामुळे परराज्यातील व्यापारी महाराष्ट्रातील मेंढपाळ व व्यापाऱ्यांना जादा पैसे देत आहेत. परराज्यात मटणाचे किलोचे दर 700 ते 740 रुपयांपर्यंत आहेत. दक्षिणेकडील आंध्रप्रदेश, तामिळनाडू तसेच पश्‍चिम बंगालमधील कोलकाता भागातील व्यापाऱ्यांनी महाराष्ट्रातून बकरे खरेदी करण्यास सुरवात केली आहे. त्याचा फटका स्थानिक बाजारपेठेला बसला आहे. 

मटणाऐवजी थेट विमानाने जिवंत बकऱ्याची निर्यात

आखाती देशात पाठविण्यात येणाऱ्या बकऱ्यांना जादा पैसे 
परराज्यातील मटणापेक्षा महाराष्ट्रातील मटणाचे दर कमी आहेत. मुंबईतील देवनार आणि औरंगाबाद येथील कत्तलखान्यातून आखाती देशात हवाबंद मटण विक्रीसाठी पाठविले जायचे. आता मटणाऐवजी थेट विमानाने जिवंत बकरे पाठविले जातात. आखाती देशात पाठविण्यात येणाऱ्या बकऱ्यांना साहजिकच जादा पैसे मिळत असल्याने मेंढपाळ आपले बकरे थेट कंपन्यांना विकत आहेत. आम्हाला जादा पैसे मोजणे परवडत नाही. त्यामुळे या स्पर्धेत टिकून राहण्यासाठी महाराष्ट्रातील व्यापारी तसेच मटण विक्रेत्यांना जादा दर मोजून बकरे खरेदी करावे लागत आहेत, असे पालकर यानी सांगितले. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hike In Mutton Rate Due To Goat Export Ratnagiri Marathi News