
मंडणगड (रत्नागिरी) : 'एक काळजी आपली आणि आपल्या कुटुंबाची' हे ब्रीद वाक्य घेऊन लाकडी घाण्यावरचे शुद्ध आणि रसायन मुक्त खाद्य तेलाचे उत्पादन करून ग्राहकांच्या आयुष्याला ऊर्जा देण्याचे काम भामघर येथील बबन पवार यांनी सुरू केले आहे. पारंपरिक उत्पादने घेत त्याच्या शुद्धतेला महत्त्व देताना आरोग्याला हितवर्धक असणाऱ्या तेलाची निर्मिती करण्यावर भर दिला आहे.
मुंबईत कॉम्प्युटर सॉफ्टवेअरमध्ये काम करणारे बबन पवार यांनी नाशिक येथे खादी ग्रामोद्योग संस्थेत पंतप्रधान स्वयंरोजगार योजनेअंतर्गत तीन महिन्यांचे प्रशिक्षण घेतले आहे. ग्रामीण भागात कमी होत चाललेली तेलाची शुद्धता जपावी व नागरिकांचे आरोग्य उत्तम रहावे या विचाराने मंडणगड येथे त्यांनी वर्षभरापूर्वी लाकडी घाण्याच्या तेल उत्पादनाला सुरवात केली. लाकडी घाण्यातून निघणाऱ्या तेलात नैसर्गिक घटक तसेच राहतात. परिणामी हे तेल आरोग्यासाठी उत्तम असून नैसर्गिक तत्त्वामुळे पचनक्रिया चांगली होण्यास मदत होते.
सध्याच्या काळात सेंद्रीय उत्पादनांना अधिक महत्व प्राप्त झाले आहे. प्रत्येकजण आरोग्याविषयी अधिक जागरुक आणि सतर्क झाल्याचे दिसून येते. आयु ऊर्जा ऑरगॅनिक एंटरप्राइजेस माध्यमातून शेंगदाणा तेल, खोबरेल, काळे व सफेद तिळ तेल, मोहरी तेल, सूर्यफूल तेल, सेंद्रिय गुळ, करडई तेलाचे उत्पादन घेत आहेत. ग्राहकांचे अनुभव उत्साह वाढवणारे असून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचे पवार सांगतात. शरीरात रोग प्रतिकारशक्ती वाढण्यास याची मदत होते.
"पूर्वी घाण्याच्याच तेलाचा वापर केला जात असे. त्यामुळे त्यावेळची मानवी वयोमान ही ९० ते १०० वर्षे असायची. आता रसायन युक्त तेलाचे प्रमाण वाढल्याने आरोग्य ढासळत आहे. यामुळेच लाकडी घाण्याच्या तेलाचे उत्पादन घेत आहे."
- बबन पवार
संपादन - स्नेहल कदम
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.