esakal | लोकमान्य टिळक जन्मभूमी ही रत्नागिरीकरांची जबाबदारी 
sakal

बोलून बातमी शोधा

homeland of lokmanya tilak in ratnagiri

टिळकांना हारतुरे घालणे आणि तेथे निरनिराळे प्रकल्प होतील, अशी आश्‍वासने देणे, हेही नित्याचे झाले आहे.

लोकमान्य टिळक जन्मभूमी ही रत्नागिरीकरांची जबाबदारी 

sakal_logo
By
शिरीष दामले

1 ऑगस्ट रोजी पुण्यतिथी दिनी आणि त्यानंतर येणाऱ्या गणेशोत्सवात लोकमान्य टिळकांचे स्मरण एखाद्या प्रथेप्रमाणे सोपस्कार उरकावेत तसेच केले जाते. रत्नागिरीतील टिळक जन्मभूमीच्या दुरवस्थेबाबत नित्यनेमाने वार्षिक खंत व्यक्त न करता लोकांनी पुढाकार घेऊन याबाबत बरेच काही करता येईल. हे स्मारक टिळकांसारख्या थोर व्यक्तिमत्त्वाची ओळख सांगेल, अशा पद्धतीने करता येईल, असे प्रतिपादन येथे केले आहे.

 
टिळक पुण्यतिथी आली की, रत्नागिरीतील टिळक जन्मभूमीच्या वाईट अवस्थेबद्दल बोलले जाते. समाजमाध्यमांवरही पुन्हा पुन्हा लिहिले जाते. निष्कर्ष एकच, या दुरवस्थेबद्दल साऱ्यांनाच खेद वाटतो. टिळक जन्मस्थानाची दुर्दशा आणि त्याबद्दलच्या अपेक्षा या 1 ऑगस्टदरम्यान व्यक्त होतात. जोडीला पुढाऱ्यांची भाषणे, त्यांनी टिळकांना हारतुरे घालणे आणि तेथे निरनिराळे प्रकल्प होतील, अशी आश्‍वासने देणे, हेही नित्याचे झाले आहे. यावर दोन दिवस गेले की, पुन्हा पुढचे वर्ष येईपर्यंत सारे शांत असते. 


यावर्षी धनंजय भावे यांनी टिळक जन्मभूमीच्या दुर्दशेबद्दल "सकाळ'मध्ये आत्यंतिक कळवळ्याने लिहिले होते. महत्त्वाचे म्हणजे तेथे काय करता येईल, हे सुचवले होते. त्या जोडीला रत्नागिरीतील एक विधिज्ञ आणि सामाजिक स्तरावर काम करणारे विनय परांजपे यांनी टिळकांचे जन्मस्थान हा विषय फक्त शासनाचा नाही, तर रत्नागिरीकरांचा आहे, असा मुद्दा मांडला. या जन्मस्थानाची देखभाल, दुरुस्ती, जतन, संवर्धन आणि विकास ही रत्नागिरीकरांची जबाबदारी आणि कर्तव्ये आहेत. रत्नागिरिकरांनी ती पार पाडण्यासाठी पुढे यावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. भावे यांनी सुमारे एक एकरच्या जन्मस्थानाच्या जागेत काय पद्धतीने विकास करता येईल, हे मांडले होते. स्थूलमानाने टिळक जन्मस्थानाचा विकास आणि त्याचे व्यवस्थापन हे रत्नागिरीत ट्रस्ट उभे करून करावे. पुरातत्व खाते वा शासकीय यंत्रणा यांच्याशी समन्वय राखून जन्मस्थानाचे संवर्धन करावे लागेल.

सरकारकडे निधीचा प्रश्‍न येतो. त्यासाठी लोकांमधूनही निधी उभा करता येईल. टिळकांच्या कार्याचे स्मरण होईल, अभिमान वाटेल असे संग्रहालय, ग्रंथालय, प्रदर्शन, टिळकांच्या चरित्रातील अत्यंत महत्त्वाचा प्रसंग तेथे रेखाटता येईल अथवा आधुनिक तंत्राने तो जिवंत करता येईल. टिळकांच्या कर्तृत्वाची आठवण करून देणाऱ्या स्पर्धा अथवा आणखी काही कार्यक्रम घेता येतील. यासाठी इच्छाशक्तीची गरज आहे. निधी अपुरा पडणार नाही. टिळक लोकनेते, लोकमान्य खरेच; त्याचबरोबर अत्यंत विद्वान आणि व्यासंगी, पत्रकार, गीतेचे भाष्यकार म्हणूनही थोर होते. त्यांची थोरवी कळेल, असे कायमस्वरूपी काम किंवा एखादे अध्यासनही सुरू करता येईल. 

तालुक्‍याचे आमदार आणि खासदार शिवाय पुरातत्त्व खात्याचे सर्वोच्च अधिकारी हे या न्यासाचे पदसिद्ध सदस्य, शिवाय जाणकार मंडळींचा यामध्ये समावेश करता येईल. जमवलेला निधी पुरातत्त्व खात्याच्या सल्ल्याने आखलेल्या कार्यक्रमांवर आणि योजनेवर खर्च केला जाईल. त्यावर निगराणी, देखरेख न्यासाची असल्याने लाल फितीत हा विषय अडकणार नाही. रत्नागिरीचे सुजाण आणि उत्साही जाणकार आमदार उदय सामंत हे यामध्ये फक्त नेते वा लोकप्रतिनिधी म्हणून नव्हेत, तर रत्नागिरीचे सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून मोठी कामगिरी बजावू शकतात. तसेच लोकांमधून आलेल्या सूचनांचा साकल्याने विचार करता येईल. पुढच्या वर्षीच्या टिळक पुण्यतिथीपर्यंत रत्नागिरीकरांकडून यासाठी काही ठोस पावले पडली तर जन्मभूमीच्या विकासाबद्दल काही विधायक लिहिण्याची संधी मिळेल. नाहीतर मागील पानावरून खंत पुढील पानावर.... 

 संपादन - धनाजी सुर्वे 
 

loading image