
आत्महत्या रोखण्यासाठी विद्यार्थीनी रिया लाडने बनवला हूक
राजापूर : जीवनयात्रा संपविण्यासाठी पंख्याला लटकून आत्महत्या करण्याच्या घटना रोखणारे ‘एस.पी.हूक’ (सुसाईड प्रिव्हेटींग हूक) नामक उपकरण विद्यार्थीनी रिया लाड हिने तयार केले आहे. या उपकरणाच्या सहाय्याने बंदखोलीमध्ये पंख्याला लटकून होणाऱ्या आत्महत्या रोखण्याला मदत होणार आहे. तालुक्यातील कोंड्ये येथील अमल विद्यावर्धिनी मुंबई संचलित निर्मला भिडे विद्यालय व इंद्रनील तावडे कनिष्ठ महाविद्यालयाची ती विद्यार्थिनी आहे. विविध कारणांमुळे मानसिक खच्चीकरण होवून वा मानसिक संतुलन बिघडून आलेल्या नैराश्येतून अनेकजणांनी घरातील पंख्याला स्वतःला लटकवून जीवनयात्रा संपविली आहे. वारंवार घडणाऱ्या या घटनांबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. मात्र, रियाने त्यावर उपाय शोधला.
हेही वाचा: कधीतरी तयार झालेला रस्ता दाखवा MIDC रस्त्यांवरुन मनसेकडून शिवसेना ट्रोल
रिया हिने तयार केलेल्या या अनोख्या आणि उपयुक्त उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अॅवार्ड प्रदर्शनासाठी रत्नागिरी जिल्ह्यातून निवड झाली आहे. जिल्हास्तरीय इन्स्पायर मानक अवॉर्ड प्रदर्शनाकरीता ७७ विद्यार्थ्यांनी मांडलेल्या उपकरणांमधून रियाने तयार केलेल्या या उपक्रमाची निवड झाली. राज्यस्तरीय प्रदर्शनासाठी निवड झालेले राजापूर तालुक्यातील हे एकमेव उपकरण ठरले आहे.
विविध कारणांमधून मानसिक खच्चीकरण होवून अनेकजण आत्महत्येचा मार्ग स्वीकारत मृत्यूला कवटाळत असल्याच्या घटना घडत असतात. वारंवार घडणार्या या घटनांबाबत समाजाच्या विविध घटकांमधून तीव्र चिंता व्यक्त केली जात आहे. या घटनांमध्ये अनेकजण घरातील बंद खोलीतील पंख्याला स्वतःला लटकवून आत्महत्या करीत असल्याचे चित्र दिसते. त्या कशा रोखता येतील यावर विचार विनियम करून कोंड्ये हायस्कूलची विद्यार्थीनी रिया हिने एस.पी. हूक हे आत्महत्या रोखणारे उपकरण तयार केले आहे. त्यासाठी तिला विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे, मुख्याध्यापक प्रशाळेचे मुख्याध्यापक अरूण कुराडे यांचे मार्गदर्शन लाभले.
हेही वाचा: पैसे कोणी मागितले! ग्लोबल टिचर डिसलेंना द्यावे लागणार उत्तर, अन्यथा...
जिल्हास्तरीय इन्स्पायर मानक अॅवार्ड प्रदर्शन नुकतेच पार पडले. त्या प्रदर्शनामध्ये रिया हिने तयार केलेल्या ‘एस.पी. हूक’ या उपकरणाने सार्यांचे लक्ष वेधून घेतले होते. एवढेच नव्हे तर, हे उपकरण परिक्षकांच्या पसंतीला उतरताना त्या उपकरणाची राज्यस्तरीय इन्स्पायर मानक अॅवार्ड प्रदर्शनासाठी निवड झाली आहे.
एस.पी. हूक असे करणार काम
इमारतीचे बांधकाम करताना एखाद्या खोलीमध्ये पंखा अडकविण्यासाठी छताला सुरूवातील हूक तयार करून ठेवला जातो. या हूकाला एस.पी.हूक अडकवून त्या हूकाला पंखा अडकवायचा. छताच्या मूळ हुकाला एस.पी. हूक अडकविलेला फारसा निदर्शनास येत नाही. पंख्याला सुमारे दहा किलोपेक्षा जास्त वजन लटकत त्यावेळी खर्या अर्थाने एस.पी. हूकाचे काम सुरू होते. त्यामध्ये दहा किलोपेक्षा जास्त वजन लटकते. त्यावेळी एस.पी.हूक अॅटोमेटीक पंखा सोडून देते. त्यानंतर पंखा एकदम जमीनीवर खाली न येतो तो सावकाशपणे खाली येतो. त्याच्यातून आत्महत्या रोखली जाते. विज्ञान शिक्षक ज्ञानेश्वर शिंदे यांनी ही माहिती दिली. पंखा खाली येत असताना त्याला जोडणी करण्यात येणारी वीजेची तार तुटून त्यातून व्यक्तीला शॉक लागण्याची शक्यता असते. ही शक्यता ओळखून तशी घटना घडणार नाही अशी यंत्रणा या एस पी हूकमध्ये तयार करण्यात आल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
Web Title: Hook Made By Student Riya Lad To Prevent Suicide
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..