गाळ ठरतोय गरम पाण्याच्या कुंडाचा काळ

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 31 October 2020

उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड या स्थळाला पर्यटनाचा ‘क’ दर्जा देण्यात आला.

दाभोळ (रत्नागिरी) : उन्हवरे खाडीत मोठ्या प्रमाणात गाळ साठल्याने भरतीचे पाणी या गरम पाण्याच्या कुंडात येते. भविष्यात हे गरम पाण्याचे कुंड नामशेष होण्याची शक्‍यता वर्तविण्यात येत असल्याने या खाडीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी उन्हवरे ग्रामस्थांनी केली आहे. 

उन्हवरे येथील गरम पाण्याचे कुंड या स्थळाला पर्यटनाचा ‘क’ दर्जा देण्यात आला. देशभरातून अनेक पर्यटक या ठिकाणी येत असतात. या कुंडाजवळ असलेल्या उन्हवरे खाडीत गाळ साठल्यामुळे खाडीतील पाणी या गरम पाण्याच्या कुंडात येते. त्यामुळे कुंडाला धोका उत्पन्न झाला आहे. तसेच खाडीचे पाणी जवळ असलेल्या शेतामध्येही येते. या क्षेत्रातील तीन आंबा ते भोयाचे बंदर या पट्ट्यातील शेकडो एकर भातशेतीचे दरवर्षी नुकसान होत आहे.

हेही वाचा - भीषण अपघातानंतर युवती कोसळल्या नदीत -

उन्हवरे येथील प्रगतशील शेतकरी इब्राहिम चिकटे यांच्यासहित अनेक शेतकरी खाडीजवळील खारवा जमिनीत संपूर्ण पट्ट्यात भातशेती करत होते. त्यामुळे उन्हवरे, वावघर, फरारे येथील स्थानिकांना रोजगार उपलब्ध होत होता; मात्र या खाडीत गाळ वाढत असल्याने खाडीतील पाणी भातशेतीत घुसल्याने शेकडो एकर शेती ओस पडली. शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात होणारे नुकसान टाळण्यासाठी खाडीतील गाळ काढण्यात यावा, अशी मागणी आहे.  

किराणा माल मचव्यातून व डीपकोतून आणला जातो काही वर्षांपूर्वी उन्हवरे खाडीमधून होड्यांमधून दळणवळणाची व्यवस्था होती. उन्हवरे बाजारपेठेतील किराणा मालाचे व्यापारी दाभोळ किंवा चिपळूण येथील व्यापाऱ्यांकडून किराणा माल मचव्यातून व डीपकोतून आणत असत. सुक्‍या मासळीचा व्यवसायदेखील होत असे. मात्र, ही खाडी गाळाने भरल्याने  होड्या येणे आता बंद झाले. अशा एक ना अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. शासनाने त्वरित खाडीचा गाळ काढून भातशेतीबरोबरच पर्यटन क्षेत्राची हानी थांबवण्याची मागणी केली आहे.

हेही वाचा -  आंबोली परिसरात टस्करची दहशत -

"एकीकडे काळा तांदूळ, लाल तांदूळ भातशेतीचे कौतुक केले जात आहे; तर दुसरीकडे शेतकऱ्यांना शेतात खारे पाणी येत असल्याने नाइलाजाने शेती सोडून द्यावी लागत आहे."

- मंगेश शिंदे, उन्हवरे

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: hot water puddings in ratnagiri due to bund in sea sprem in ratangiri