कृषीचे दुष्टचक्र भेदायचे कसे?

सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ, गारपीट आणि पूर्वमोसमी पावसाच्या धारा यामुळे कोकणची ओळख बनलेला आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभूळ यांसह विविध फळपीक उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
Agriculture Loss
Agriculture LossSakal
Summary

सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ, गारपीट आणि पूर्वमोसमी पावसाच्या धारा यामुळे कोकणची ओळख बनलेला आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभूळ यांसह विविध फळपीक उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, तापमान वाढ, गारपीट आणि पूर्वमोसमी पावसाच्या धारा यामुळे कोकणची ओळख बनलेला आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभूळ यांसह विविध फळपीक उत्पादनाचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. तीन ते चार वर्षांत नैसर्गिक आपत्तीने फळपिकांच्या नुकसानीचा आलेख वर्षागणिक वाढल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे जिल्ह्याचे अर्थकारण कोलमडले आहे. बागायतदार आर्थिक दुष्टचक्रात अडकत चालला आहे. हजारो हेक्टरवर लागवड केलेल्या फळपिकांचे भवितव्य काय? असा प्रश्न आता निर्माण झाला असून, पर्यायी पिकांचा अभ्यास होण्याची गरज आहे.

कोकणची ओळख

आंबा, काजू, कोकम, सुपारी, जांभूळ यांसह करवंदे, चारोळी ही वनपिके कोकणची ओळख मानली जाते. सिंधुदुर्ग जिल्ह्यात भौगोलिक रचनेनुसार या फळझाडांची लागवड करण्यात आली आहे. किनारपट्टीच्या तालुक्यांनी आंबा लागवडीवर भर दिला. पूर्वपट्ट्यातील तालुक्यांनी काजू लागवडीवर लक्ष केंद्रित केले.

शासनाने १०० टक्के अनुदानावर राबविलेली योजना आणि वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राने संशोधनातून तयार केलेल्या विविध फळपिकांच्या कमी कालावधीत अधिक उत्पन्न देणाऱ्या जाती यामुळे १९९० नंतर फळलागवडीने क्रांतिकारक वेग घेतला. आंबा, काजू पिकांखालील क्षेत्र हजारो हेक्टरने वाढले. याशिवाय कोकम, सुपारीचे क्षेत्र देखील वाढले. अलीकडे जांभळासारख्या फळपिकांची कलमे तयार करण्यात आली असून, आता त्याचीही लागवड होऊ लागली आहे. पारंपरिक पद्धतीला

रामराम करीत शेतकऱ्यांनी व्यावसायिक आंबा, काजू लागवडीवर भर दिला. आंबा पिकातून हजारो शेतकऱ्यांची आर्थिक उन्नती झाली, तर काजू पिकामधून अनेक शेतकरी आर्थिक स्थिरस्थावर झाले.

ऋतुचक्रच बदलले

फळपिकांच्या दृष्टीने उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा हे तीनही ऋतू खूप महत्त्वाचे आहेत; परंतु गेल्या पाच-सहा वर्षांपासून ऋतुचक्रच बदलत असल्याचे समोर येत आहे. जून ते सप्टेंबरपर्यंत चालणारा पावसाळा आता कधी नोव्हेंबर, तर यावर्षी डिसेंबरपर्यंत सुरू होता. यावर्षीचा विचार केला असता जानेवारी वगळता आतापर्यंतच्या प्रत्येक महिन्यात पाऊस झाला आहे. नोव्हेंबर ते जानेवारी हे थंडीचे महिने; परंतु अलीकडे काही मोजकेच दिवस थंडी जाणवत असल्याचे दिसून येते. तापमानवाढीमुळे उन्हाळा कधी सुरू होतो आणि कधी संपतो, हेच समजेनासे झाले आहे. त्यामुळे ऋतुचक्र बदलाचा सर्वाधिक फटका फळपिकांना बसत आहे.

किडरोगांचा वाढता प्रादुर्भाव

बदलत्या वातावरणामुळे कीडरोगांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. फुलकिडे, तुडतुडे, फळमाशी, बुरशी यासारख्या किडरोगांचा प्रादुर्भाव गेल्या तीन-चार वर्षांत वाढला आहे. त्यामुळे बागांचे व्यवस्थापन करणे शेतकऱ्यांना कठीण बनत चालले आहे. कधी पाऊस, कधी ढगाळ वातावरण यामुळे नेमके काय करावे, हेच शेतकऱ्यांना समजत नाही. परिणामी उत्पादनावर परिणाम होतो. मागील तीन वर्षांत सरासरीच्या ३० ते ३५ टक्केच आंबा, काजूचे उत्पादन शेतकऱ्यांना मिळाले आहे.

दरवर्षी पावसाचा फटका

मागील तीन वर्षांपासून नैसर्गिक आपत्तीने सुरू केलेला पाठलाग यावर्षी देखील कायम आहे. यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून अवकाळी पावसाने पाठ काढली. त्यानंतर जानेवारी वगळता प्रत्येक महिन्यात पाऊस झाला.

आता तर ऐन हंगामात ४ ते १० एप्रिल या कालावधीत जोरदार पाऊस झाला. वादळाने तर हाहाकार उडाला. त्यामध्ये मोठे नुकसान झाले. हातातोंडाशी आलेले आंबा, काजूचे पीक वाया गेले आहे.

पर्यायावर संशोधन व्हावे

जिल्ह्यातील फळपिकांना भविष्यात धोका निर्माण होणार, हे निश्चित झाले आहे. त्यामुळे वातावरणाचा कोणताही परिणाम होणार नाही, अशा पर्यायी पिकांवर संशोधन होण्याची गरज आहे. दापोली कृषी विद्यापीठ, फळसंशोधन केंद्र वेंगुर्ले यांनी त्यासाठी अधिक गतीने पुढाकार घेण्याची गरज आहे.

नैसर्गिक आपत्तींचा कहर

सतत ढगाळ वातावरण, अवकाळी पाऊस, पूर्वमोसमी, वादळे आणि अलीकडे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात होत असलेली गारपीट या नैसर्गिक संकटांचा कहर गेल्या तीन-चार वर्षांत पाहायला मिळाला. फयान, निसर्गपासून अलीकडे झालेल्या तौक्ते वादळाने फळपिकांची मोठी हानी केली.

बागायतदार कर्जबाजारी

गेल्या काही वर्षांत आंबा आणि काजू ही आर्थिक उत्पन्न मिळवून देणारी प्रमुख दोन पिके ठरली आहेत. जिल्ह्यातील ३० हजारांहून अधिक हेक्टर क्षेत्र आंबा लागवडीखाली, तर ७२ हजार हेक्टर क्षेत्र काजू पिकाखाली आहे. या दोन्ही पिकांची उलाढाल साधारणपणे २० हजार कोटींच्या आसपास आहे. लाखो शेतकरी या दोन फळपिकांवर अवलंबून आहेत. अशा या दोन्ही पिकांचे गेल्या काही वर्षांत नुकसान होऊन बागायतदार कर्जबाजारी झाले आहे. यावर्षी नुकसान झाले, तर पुढच्या वर्षी पीक मिळेल, त्यातून कर्ज फेडता येईल, अशी भावना शेतकऱ्यांमध्ये असते; परंतु मागील तीन-चार वर्षांत शेतकऱ्यांच्या हातात पीकच येईनासे झाले आहे. त्यामुळे शेतकरी दिवसेंदिवस आर्थिक संकटात सापडताना दिसत आहे.

फळबागांचे करायचे काय?

कुणी दहा, कुणी पंधरा, तर काहींनी दोन-दोन हजार एकरांवर आंबा, काजू लागवड केलेली आहे. वातावरणातील बदलामुळे फळपिकांचे होत असलेले नुकसान पाहता या फळबागांचे पुढे करायचे काय? असा प्रश्न आता बागायतदारांसमोर उभा राहिला आहे. भविष्यात तापमान वाढीमुळे किनारपट्टीच्या भागांना यापुढेही नैसर्गिक आपत्तींना सामोरे जावे लागणार आहे.

देखभाल झाली खर्चिक

एकीकडे नैसर्गिक आपत्तीने बागायतदार हैराण झालेले असताना दुसरीकडे रासायनिक खते, कीटकनाशके, सूक्ष्म अन्नद्रव्ये यांच्या किमतीत भरमसाट वाढ झाली आहे. याशिवाय मजुरांच्या समस्येने देखील बागायतदार त्रस्त आहेत. किडरोगांचा प्रादुर्भाव नियत्रंणात आणण्यासाठी कीटकनाशकांचा वापर करावा लागतो; परंतु कीटकनाशकांची विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामध्ये देखील भेसळीचे प्रकार वाढले असून, त्यावर नियंत्रण ठेवणारी यंत्रणा तोकडी पडली आहे.

बदलत्या वातावरणाच्या पाशर्वभूमीवर दापोली कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून नैसर्गिक वातावरणात तग धरतील, अशा पिकांची लागवड करण्यात आली आहे. यामध्ये राम्बुतान, ड्युरीयन, लोंगन, आव्हाक्याडो, स्टार फट, मँगोस्टीन या फळझाडांचा समावेश आहे. याशिवाय अन्य प्रयोगही सुरू आहेत.

- डॉ. अजय मुंज, शास्त्रज्ञ, फळसंशोधन केंद्र, वेंगुर्ले

दहा-बारा वर्षांच्या तुलनेत गेल्या तीन-चार वर्षांत किडरोगांचा प्रादुर्भाव वाढत आहे; परंतु रोगांच्या नियत्रंणासाठी वापरण्यात येत असलेल्या कीटकनाशकांच्या किमतीत मोठी वाढ झाली आहे. कधीकधी महागडी कीटकनाशके फवारून देखील त्याचा उपयोग होत नाही. अलीकडे तर चायनामेड कीटकनाशकेही बाजारात उपलब्ध होत आहेत. त्यामुळे या सर्व गोष्टींवर नियंत्रण आणणे आवश्यक आहे.

- सुशांत नाईक, बागायतदार, वेतोरे.

सध्याचे वातावरण फळबागांसाठी धोकादायक आहे. भविष्यात देखील असेच वातावरण राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे नैसर्गिक आपत्तींच्या अनुषंगाने शासन आणि विद्यापीठाने फळपिकांबाबत धोरणात्मक निर्णय घेणे आवश्यक आहे.

- प्रा. विवेक कदम, काजू अभ्यासक, कृषी महाविद्यालय, सांगुळवाडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com