मजुरांसाठी अनेक धावले मुक्यांसाठी कोणी नाही...

मुझफ्फर खान
शुक्रवार, 22 मे 2020

कोरोना संकटाच्या काळात हातावर पोट असलेल्या मजुरांना अन्नधान्य पुरविण्यासाठी अनेकांनी पुढे हात केले पण...

चिपळूण - लोटे गोशाळेतील गुरांसाठी आणलेला शेकडो टन चारा अज्ञाताने जाळून टाकला. कोरोना संकटाच्या काळात हातावर पोट असलेल्या मजुरांना अन्नधान्य पुरविण्यासाठी अनेकांनी पुढे हात केले. मात्र गोशाळेच्या मदतीसाठी ना प्रशासन धावले न लोकप्रतिनिधी. सर्वांनीच पाठ फिरवल्यामुळे 700 मुक्या प्राण्यांच्या चार्‍याचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

चार्‍याला अज्ञानाने लावली आग

मोकाट गुरे, गुरांची बेकायदा वाहतूक यानंतर या गुरांच्या होत असलेला संगोपनाचा प्रश्न या सार्‍या गोष्टी लक्षात घेऊन प्रसिद्ध कीर्तनकार ह.भ.प. भगवान कोकरे यांनी 2008 मध्ये लोटे येथे गोवंशच्या संगोपनाचा श्री संत ज्ञानेश्वरी माऊली मुक्तिधाम सेवा संस्थेच्या माध्यमातून निर्णय घेतला. दोन गुरांच्या संगोपनाला सुरुवात केली. 12 वर्षानंतर या गोशाळेत 700 गुरे  आहेत. त्यांच्या संगोपनासाठी 19 कर्मचारी आहेत. त्यांचा पगार वगळता केवळ चार्‍यासाठी दिवसाला 27 हजार रुपयाचा खर्च येतो. महाराज स्वतः करीत असलेल्या किर्तन सेवेतून मिळणार्‍या मानधनातून या गो-शाळेसाठी खर्च करतात. प्रसंगी आपले सोने-चांदीचे दागिने गहाण ठेवून ही गोशाळा चालवत आहेत. शासनाने यापूर्वी जे काही अनुदान दिले होते. ते खर्च झाले त्याचा लेखी हिशेब आहे. कोरोना परिस्थितीमुळे आर्थिक संकट, लॉक डाऊनमुळे कीर्तन सेवाही बंद आहे. यामुळे आता आर्थिक उत्पन्नही नाही. काही दिवसांपूर्वी गोशाळेतील चार्‍याला अज्ञानाने आग लावली. हजारो टन चारा जळून खाक झाला. त्यामुळे येथील गुरांच्या चार्‍याचा मोठा प्रश्‍न निर्माण झाला आहे.

मदतीची गरज

गो शाळेच्या चार्‍याचा खर्च भागविण्याच्या दृष्टीने दानशूर व्यक्तिमत्व, संस्थानी पुढे यावे. या गो शाळेला चार्‍याची किंवा आर्थिक स्वरूपात मदत करावी अशी मागणी ह.भ.प. भगवान कोकरे यांनी केली आहे.

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of tons of fodder brought for cattle were burnt by unknown persons