सावधान : मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करत फायनान्स कंपनीने शंभर महिलांना घातली टोपी 

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 21 February 2021

पाच महिलांचा एक गट करून प्रत्येकी 50 हजार कर्ज देतो, असे सांगत ही कंपनी फायनान्स करते.

रत्नागिरी : शहर परिसरात आणखी एका फायनान्स कंपनीने उच्छाद मांडला आहे. मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट करून या कंपनीने शेकडो महिलांना चुना लावला. पाच महिलांचा एक गट करून प्रत्येकी 50 हजार कर्ज देतो, असे सांगत ही कंपनी फायनान्स करते. महिलांकडून कर्ज देण्यासाठी कंपनीने महिलांकडून पैसे घेतले; मात्र तीन ते चार महिने झाले तरी कर्जाचा पत्ता नाही. फायनान्स कंपनीचा दिलेला पत्ता बनावट आहे. अनेक महिला चौकशी करून निराश होऊन परतत आहेत. 

शहर आणि परिसरात सध्या या एका फायनान्स कंपनीची जोरदार चर्चा सुरू आहे. मध्यमवर्गीय महिलांना गाठून त्यांना सहज कर्ज उपलब्ध करून देण्याचा दावा या कंपन्या करीत आहेत. त्यासाठी पाच महिलांचा एक गट तयार करून प्रत्येक महिलेला 50 हजार याप्रमाणे गटाला अडीच लाख फायनान्स करण्याचे आमिष ही कंपनी दाखवते. काही दिवसांत कर्जाचे पैसे आपल्या खात्यात जमा होतील, असे आमिष दाखवले जाते. या कंपनीचे एजंट म्हणून काही महिला राबत आहेत.

शहर परिसरातील शेकडो महिलांकडून या कंपनीने कर्ज देण्याच्या नावाखाली प्रत्येकी 5 हजार याप्रमाणे लाखो रुपये जमा केल्याची चर्चा आहे. महिलांनी पैसे भरून तीन ते चार महिने झाले तरी कर्जाचा पत्ता नाही. तेव्हा काही महिलांनी या पत्त्यावर जाऊन चौकशी केली तर तेथे कंपनीचे ऑफिसच नाही. पत्ता बोगस असून आपली फसवणूक झाल्यामुळे निराश होऊन परतत आहेत. 

हेही वाचा- बापरे !  सरकारी कर्मचारी सोबत कुटुंबियही सामील ; तेरा हजार बीपीएल शिधापत्रिका रद्द

याआधीही फसवणूक...! 
या आधी जिल्ह्यात अनेक फायनान्स कंपन्यांनी विविध आमिषे दाखवत अनेकांना गंडा घातला आहे. 21 दिवसात रक्कम दामदुप्पट करण्याचे आमिष दाखवून रत्नागिरीकरांना सव्वा कोटीचा गंडा यापूर्वी एका मल्टीनेट कंपनीने घातला आहे. त्यानंतर सॅफरॉन कंपनी, संचयनी, कल्पवृक्ष आदी कंपन्यांनी रत्नागिरीकरांना टोपी घातली. आता काहींनी नवा फंडा अवलंबून मध्यमवर्गीय महिलांना टार्गेट केले आहे. काही अधिकृत फायनान्स कंपन्या, बॅंकांच्या बचत गटांसाठी राबवत असलेल्या योजनांची हुबेहूब नक्कल करून महिलांची फसवणूक केल्याचे उघड झाले. 
 
संपादन- अर्चना बनगे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hundreds of women in finance company fraud crime marathi news