भारतात आलेल्या भूतान, नेपाळी नागरिकांवर नजर ठेवणारे अॅप 

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 3 मे 2019

एक नजर

  • नेपाळ, भूतानसह सात देशातून आलेल्या नागरिकांची ठेवण्यात येणार नोंद
  • रत्नागिरी जिल्हा पोलिसांकडील "आयडी 24 बाय 7' नावाचे अॅप ठेवणार नजर
  • गद्रे इन्फोटेकचे वैभव गोगटे, अनुज देवस्थळी, अमेय बापट यांनी तयार केले "आयडी 24 बाय 7' नावाचे अॅप. 

रत्नागिरी - नेपाळ आणि भूतानमधून देशात येणाऱ्या अनेक नागरिकांची कोणतीही नोंद, माहिती येथील सुरक्षा यंत्रणेकडे नाही. नोकरी, रोजगारानिमित्त बांगलादेश,भूतान, नेपाळमधून देशात येणारे नागरिक गुन्हे करून फरार होतात. त्यांच्यावर नजर राहावी, शोधणे सोपे व्हावे, यासाठी जिल्हा पोलिसांनी "आयडी 24 बाय 7' नावाचे अॅप तयार केले आहे. या ऍपवर नेपाळ, भूतानसारख्या अन्य देशातून जिल्ह्यात येणाऱ्यांची नोंद राहणार आहे. 

गद्रे इन्फोटेकचे वैभव गोगटे, अनुज देवस्थळी आणि अमेय बापट यांनी हे "आयडी 24 बाय 7' नावाचे ऍप तयार केले आहे. जिल्ह्यापुरते हे ऍप मर्यादित असून पायलट प्रोजेक्‍ट म्हणून तो जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे. हा प्रयत्न यशस्वी झाल्यास देशाचा सुरक्षेचा प्रश्‍न लक्षात घेऊन त्याची व्याप्ती राज्य आणि राष्ट्रीय पातळीपर्यंत वाढविण्याचा विचार आहे. आयडी 24 बाय 7 ऍपचे पालकमंत्री रवींद्र वायकर यांच्या उपस्थितीत अनावरण झाले. यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे, जि.प. अध्यक्षा स्वरूपा साळवी, मुख्य कार्यकारी अधिकारी आंचल गोयल, शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजेंद्र महाडिक उपस्थित होते. 

नेपाळ, भूतानवरून येणाऱ्या मंडळींचे नाव, गाव, कुटुंबातील नातेवाईक, कुणाकडे कामाला आलाय याची कुंडलीच ठेवली जाणार आहे. जिल्ह्यातील नेपाळ, भूतान किंवा बांगलादेशवरून जे नागरिक नोकरीसाठी भारतात येतात. त्यांचे कागदोपत्री पुरावे पोलिस ठाण्यात जमा केले जातात. अशा सर्व व्यक्तींची नोंद आयडी 24 बाय 7 या ऍपवर ठेवण्यात येणार आहे. त्या व्यक्तीला त्या ऍपचे ओळखपत्र देण्यात येणार आहे. हे ओळखपत्र स्कॅन केल्यास त्याची सर्व माहिती एका क्षणात उपलब्ध होणार आहे. वेळ पडल्यास ऍपवर त्या व्यक्तीचे नाव टाकूनही त्याची माहिती उपलब्ध होणार आहे.

नेपाळ, भूतानसह सात देशातून भारतात येण्यासाठी व्हिसा किंवा पासपोर्ट लागत नाही. तेथील नागरिकांना सहज प्रवेश मिळतो. असे आलेले अनेक नागरिक कोकणात अपार्टमेंटमध्ये वाॅचमन किंवा बागामध्ये कामास आहेत. साडे तीन हजार खलाशी आहे. अशा व्यक्तींचे रजिस्ट्रेशन कोठेच नसते. त्यांची नोंद राहावी या उद्देशाने हे अॅप आम्ही तयार केले आहे. 1800 पोलिसांच्याकडे हे अॅप असणार आहे. परदेशी नागरिकांना देण्यात आलेले ओळखपत्र या अॅपवरून तपासले जाऊ शकते.  या नागरिकडून घडणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी हे अॅप निश्चितच उपयुक्त ठरू शकेल. असे आम्हाला वाटते. 

- वैभव गोगटे, रत्नागिरी 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ID 24x7 app launched to keep watch on Bangladesh Bhutan Nepali peoples