esakal | सिंधुदुर्गात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द 
sakal

बोलून बातमी शोधा

ideal teacher award canceled in sindhudurg district

आदर्श शिक्षक पुरस्कार योजना जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिक्षक पुरस्कार न मिळण्याची घटना घडली आहे. 

सिंधुदुर्गात यंदा आदर्श शिक्षक पुरस्कार रद्द 

sakal_logo
By
विनोद दळवी

ओरोस (सिंधुदुर्ग) - यंदा शिक्षक पुरस्कारासाठी तालुक्‍यातून प्रत्येकी दोन प्रस्ताव आले आहेत. किमान पाच प्रस्ताव तालुक्‍यातून येणे अपेक्षित होते. प्राप्त प्रस्तावात आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी पात्र प्रस्ताव नाहीत. त्यामुळे या वर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार दिले जाणार नाहीत, अशी माहिती जिल्हा परिषद अध्यक्षा समिधा नाईक यांनी दिली. आदर्श शिक्षक पुरस्कार योजना जाहीर झाल्यापासून जिल्हा परिषदेच्या इतिहासात प्रथमच शिक्षक पुरस्कार न मिळण्याची घटना घडली आहे. 

"माझे कुटुंब, माझी जबाबदारी' योजना नियोजनाची माहिती देण्यासाठी अध्यक्षा नाईक यांनी आपल्या दालनात आज पत्रकार परिषद घेतली. या वेळी 5 सप्टेंबर हा शिक्षक दिन उलटून गेला तरी आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर केले नाहीत. याबाबत नाईक यांना विचारले असता त्या म्हणाल्या, ""जिल्ह्यात मोठ्या संख्येने जिल्हा परिषदेचे शिक्षक असताना प्रत्येक तालुक्‍यातून केवळ दोनच प्रस्ताव प्राप्त झाले आहेत. प्रत्येक तालुक्‍यातून किमान पाच प्रस्ताव प्राप्त यायला हवे होते. 

प्राप्त प्रस्तावातून आदर्श शिक्षक पुरस्कारासाठी स्पर्धा होवू शकत नाही. प्राप्त प्रस्तावात पात्र स्पर्धक नाहीत. निवड समितीच्या अध्यक्ष या नात्याने आदर्श शिक्षक पुरस्कार निवडीसाठी स्पर्धा व्हावी, असे वाटते. ती स्पर्धा होणार नसल्याचे लक्षात आल्याने आपण यावर्षी आदर्श शिक्षक पुरस्कार निवड न करण्याचा निर्णय घेतला आहे. 

गंभीर रुग्णांना तत्काळ मदत 
यावेळी अध्यक्षा नाईक म्हणाल्या, ""जिल्हा परिषद सध्या ग्रामीण भागातील गंभीर रुग्णांना 15 हजारांची आर्थिक मदत करीत आहे. पूर्वी ही मदत केवळ दारिद्य्ररेशेखालील रुग्णांना होती. आता यात बदल केला असून ही अट काढून टाकली आहे. यापूर्वी सर्व प्रस्ताव जमल्यावर निवड समिती बैठक घेऊन याची निवड करीत होती. यापुढे तसे होणार नाही. प्रत्येक महिन्याला बैठक होणार असून या वेळी आलेल्या प्रस्तावांना मान्यता देण्यात येईल. यामुळे गरजेच्या वेळी रुग्णांना मदत मिळेल. त्यानुसार आणखी 10 लाभार्थी निवडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत 49 लाभार्थी निवडण्यात आले आहेत.'' 

संपादन - राहुल पाटील