आंबोलीत मोटारीत जळालेल्या `त्या` महिलेची पटली ओळख 

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 19 मार्च 2020

आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून पुढे सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या वळणावर मोटारीला आग लागून त्या महिलेचा मृत्यू झाला होता. सोबत असलेला पदमान्नावर गंभीर जखमी झाला होता.

सावंतवाडी ( सिंधुदुर्ग ) - आंबोली घाटात मोटार पेटून जळून मृत्यू झालेल्या "त्या' महिलेची ओळख पटली आहे. रिजवाना अस्लम पाथरवट (वय 45, कंग्राळ गल्ली, बेळगाव) असे तिचे नाव आहे. तिच्या सोबत असलेल्याचे नाव दुंडाप्पा पदमान्नावर असून तो तिचा फॅमिली डॉक्‍टर असल्याचे स्पष्ट झाले. 

आंबोली घाटात मुख्य धबधब्यापासून पुढे सुमारे तीन किलोमीटरवर असलेल्या वळणावर मोटारीला आग लागून त्या महिलेचा मृत्यू झाला होता. सोबत असलेला पदमान्नावर गंभीर जखमी झाला होता. संबंधित महिला त्याची पत्नी असल्याचा अंदाज व्यक्त होत होता; मात्र आज त्या महिलेची ओळख पटली. तिचा जावई मैनुद्दिन मोहम्मद शेख (रा. आजरा) यांनी येथील पोलिस ठाण्यात धाव घेत संबंधित महिलेचे नाव रिजवाना असल्याचे स्पष्ट केले. 

त्यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार ः पाथरवट यांना एक विवाहित मुलगी आणि मुलगा आहे. मुलगा चेन्नई येथे नोकरीला आहे. त्या एकट्याच बेळगाव येथे राहत होत्या. अपघातात वाचलेला मोटारचालक दूंडप्पा बंगारप्पा पद्मान्नावर त्यांचा फॅमिली डॉक्‍टर असल्याची माहितीही तपासात पुढे आली आहे. 

येथील हॉटेल ग्रीन व्हॅलीमध्ये दुंडाप्पा पदमान्नावर (वय 45, रा. राणोजी बिल्डिंग, ब्रमानगर, पिरनवाडी, जि. बेळगाव) व रिजवाना पाथरवट 16 मार्चला वास्तव्याला होते. दुसऱ्या दिवशी ते अन्य ठिकाणी राहिल्याचे समजते. दोघेही काल (ता.18) सायंकाळी सावंतवाडीच्या दिशेने जाण्यासाठी घाट उतरत असताना अपघात झाला. दुंडप्पाला उपचारासाठी गोवा बांबुळी येथे हलविण्यात आले. 

आज सकाळी संबंधित महिलेचा जावई, मुलगा व इतर नातेवाईक आंबोलीत दाखल झाले. सावंतवाडीच्या वैद्यकीय अधिकारी श्‍वेता शिरोडकर यांनी शवविच्छेदन केले. त्यांनी सांगितले की, ज्यावेळी घटना घडली तेव्हा महिला जिवंत होती. सीट बेल्ट लावलेला होता. अचानक तीव्र आग लागल्याने जळून मृत्यू झाल्याचे शवविच्छेदनानंतर लक्षात येते. ओळख पटवल्यानंतर मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. गडहिंग्लज येथे माहेरी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 

संबंधित मोटारचालकाचे कोणतेही नातेवाईक उपचार सुरू असलेल्या हॉस्पिटलमध्ये आलेले नाहीत. काही मित्र सावंतवाडी व त्यानंतर गोव्यात दाखल झाल्याची माहिती मिळाली आहे. त्याने हॉटेलवर दिलेल्या ओळखपत्राच्या पत्त्यावर तो राहत नसल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे. 

दरम्यान जळालेली मोटार नेमकी कोणाची होती याबाबतही तपास सुरू आहे. सावंतवाडी पोलीस निरीक्षक शशिकांत खोत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस उपनिरीक्षक बाबु तेली, राजेश गवस, गुरुदास तेली, गजानन देसाई तपास करीत आहेत. मोटारचालक पदमान्नावरवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

दुर्घटनेआधी धडक 

दरम्यान गाडीने पेट घेण्याआधी पदमान्नावर याने माझ्या गाडीला धडक दिल्याची तक्रार काल (ता.18) रात्री मूळ चौकुळ कुंभवडे (रा. सावंतवाडी) येथील सत्यप्रकाश गावडे यांनी आंबोली पोलिस ठाण्यात दिली आहे. आपल्या मोटारीला ठोकर देऊन ते पळून गेल्याचे तक्रारीत म्हटले आहे. याबाबतही पोलिसांनी पदमन्नावरवर गुन्हा दाखल केला.  

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Identification Of Woman Burnt In Amboli Sindhudurg Marathi News