रत्नागिरीत प्रशासनाची होणार तारेवरची कसरत ; मिशन बंधार्‍याकडे दुर्लक्ष

मयूरेश पाटणकर
Sunday, 22 November 2020

टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्‍यता आहे.

गुहागर (रत्नागिरी) : महात्मा फुले जलभूमी संधारण अभियानांतर्गत मिशन बंधारे मोहीम गुहागरबरोबरच संपूर्ण जिल्ह्यात २००८ पासून सुरू झाली. श्रमदानावर आधारित या मोहिमेतून बंधारे बांधून पाणी अडवण्याचा अभिनव उपक्रम पंचायत समिती गुहागर व कृषी विभाग, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या सहकार्याने गेली ११ वर्षे जोमाने सुरू आहे. यावर्षी कोरोना संकटामुळे मिशन बंधारे मोहीम राबवण्याबाबत प्रशासनाकडून दुर्लक्षच झाले आहे. यामुळे टंचाईग्रस्त गावातील पाणीटंचाईवर मात करण्यासाठी प्रशासनाला तारेवरची कसरत करावी लागण्याची शक्‍यता आहे.

हेही वाचा - ....आणि मामाचे गावही गहिवरले! -

गुहागर तालुक्‍यात पाऊस जास्त पडला तरी जमिनीची जलधारण क्षमता कमी असल्याने पाणी वाहून जाते. त्यामुळे मार्चपासूनच नद्या-नाले कोरडे पडतात. पाणीटंचाई निर्माण होते. पिण्याबरोबरच नारळ, पोफळीच्या बागांना आवश्‍यक पाणी मिळत नाही. मिशन बंधारेमुळे जमिनीतील पाण्याच्या पातळीत वाढ झाली. पाणीटंचाईवर काही प्रमाणात का होईना, मात करण्यात प्रशासन व ग्रामस्थ यशस्वी झाले होते. दरवर्षी २ ऑक्‍टोबरला महात्मा गांधी जयंतीनिमित्ताने तालुक्‍यातील मिशन बंधारे मोहिमेला सुरवात होत असे.

पहिला बंधारा बांधण्याचे काम प्रशासन आणि लोकप्रतिनिधी करत. मग गावागावांत बंधारे बांधण्याची स्पर्धा सुरू होत असे. या मोहिमेत सरपंच, ग्रामपंचायत सदस्य, तंटामुक्त अध्यक्ष, विविध ग्रामविकास मंडळे, महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला बचतगट, सामाजिक संस्था असे सर्वजण सहभागी होत असत. खऱ्या अर्थाने जलसंवर्धनाची ही परंपरा तळागाळात रुजविण्यात गुहागर पंचायत समिती यशस्वी झाली होती.  

चांगल्या परंपरेचाही विसर 

यावर्षी कोरोनाच्या संकटामुळे प्रशासन ऑक्‍टोबर महिन्यापर्यंत विलगीकरण, उपचार, ‘माझे कुटुंब’ मोहीम यात इतके गुंतले की आपण सुरू केलेल्या चांगल्या परंपरेचाही विसर पडला. जिल्हा परिषदेने कार्यक्रम दिला नाही. पंचायत समितीने तो खाली नेला नाही. परिणामी ग्रामस्थांनीही या महत्त्वाच्या कार्यक्रमाकडे दुर्लक्षच केले. याची कोणती किंमत मार्च महिन्यानंतर मोजावी लागते, ते येणारा काळच ठरवेल.

हेही वाचा -  मालवण किल्ला मंदिराची पाहणी
 

"मिशन बंधारे कार्यक्रम शासनाने दिलेला नाही; मात्र बंधाऱ्यांमुळे आरे ग्रामपंचायत कार्यक्षेत्रातील १५ हेक्‍टरपेक्षा जास्त जमीन ओलिताखाली येते. त्यामुळे आम्ही डिसेंबर महिन्यात नेहमीच्या वेळापत्रकाप्रमाणे हे अभियान राबवू."

- श्रीकांत महाजन, सरपंच, ग्रामपंचायत आरेगांव

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: the ignorance of mission bandhara in ratnagiri the tradition was stop due to corona in ratnagiri