आंदोलने झाली, आश्वासने मिळाली, तरीही दुर्लक्षच! काय आहे हेवाळेची व्यथा?

प्रभाकर धुरी
Tuesday, 11 August 2020

गावात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली आणि गेली, राजकारण्यांनी वारेमाप आश्‍वासने दिली; पण पुलाचा प्रश्‍न काही सुटला नाही. त्यातच आता पूल कोसळल्याने हेवाळेत जाणाऱ्यांना बाबरवाडीमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

साटेली भेडशी (सिंधुदुर्ग) - मुळस हेवाळे पुलाचा काही भाग आणि एक पाईप नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे वाहून गेली. गेली अनेक वर्षे पुलाची मागणी झाली, त्यासाठी आंदोलने झाली. गावात आणि राज्यात वेगवेगळ्या पक्षांची सत्ता आली आणि गेली, राजकारण्यांनी वारेमाप आश्‍वासने दिली; पण पुलाचा प्रश्‍न काही सुटला नाही. त्यातच आता पूल कोसळल्याने हेवाळेत जाणाऱ्यांना बाबरवाडीमार्गे प्रवास करावा लागणार आहे.

वाचा - शरद पवारांचा खंदा समर्थक भाजपमध्ये दाखल ; नारायण राणेंच्या बंगल्यावर झाला पक्षप्रवेश 

अर्थात तो रस्ता तिलारीतून जवळचाही आहे. 
तिलारी पाटबंधारे प्रकल्पाकडून खरारी नदीवर मुळस हेवाळे जोडणारा कॉजवे वजा पूल बांधण्यात आला होता. तो कमी उंचीचा असल्याने तो नेहमीच पाण्याखाली असतो. शिवाय या पुलावरून अनेक गुरे आणि माणसे वाहून गेल्याने मृत्युमुखी पडली आहेत. तत्कालिन आमदार शिवराम दळवी, तत्कालिन पालकमंत्री व विद्यमान आमदार दीपक केसरकर, आमदार नीतेश राणे, भाजपचे तत्कालिन जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार आदींनी या पुलाला निधी मिळवून देण्याचे आश्‍वासन दिले; पण अद्याप त्या पुलाला निधी मिळाला नाही.

हेही वाचा - कणकवलीत कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट सेंटर उद्यापासून सुरू : वैभव नाईक 

अनेक सरपंच, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ यांनी शासनदरबारी पाठपुरावा केला; पण सर्वांना आश्‍वासनेच मिळाली. आता ग्रामपंचायतीचा कार्यकाल संपला आहे. ग्रामपंचायतीवर प्रशासक नियुक्त होत आहे. लवकरच नवी विटी, नवे राज्यही अस्तित्वात येईल; पण तेव्हा तरी पुलाचा प्रश्‍न सुटेल की नाही? हा प्रश्‍नच आहे. 

गणेशोत्सवात अडचण 
गतवर्षी मुळसच्या बाजूने पुलाचा भाग वाहून गेला होता. आता मोठ्या प्रमाणात पुलाचा भाग वाहून गेला आहे. शिवाय सिमेंट पाईपही वाहून गेला आहे. त्यामुळे ऐन गणेशोत्सव काळात लोकांचे येण्याजाण्याचे हाल होणार आहेत. सुदैवाने नुकत्याच आलेल्या पुरानंतर कुणी पाण्यातून ये-जा केली नाही, अन्यथा तुटलेल्या पुलाचा अंदाज न आल्याने एखाद्याचा बळीही गेला असता.

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: ignoring the demand for bridges in mulas hawale konkan sindhudurg