प्रयोगशीलतेतून विज्ञान-गणिताशी मैत्री ; आयसरचा ऑनलाईन प्रयोग

राजेश कळंबटटे 
Thursday, 8 October 2020

बहूतांश ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा फंडा उपयुक्त ठरत आहे.

रत्नागिरी - ‘मैत्री करू या विज्ञान गणिताशी’हा कृतिशीलता आणि प्रयोगशीलवृत्ती वाढविण्यासाठीचा ऑनलाईन कार्यशाळा उपक्रम राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद आणि भारतीय विज्ञान शिक्षण व संशोधन संस्थेने (आयसर) राबविला आहे. त्याचा पहिला पाठ नुकताच प्रसिध्द झाला आहे. सोप्या भाषेत आणि उपलब्ध साहित्याच्या आधारे शिकवण्यात येणारे हे कठीण विषय विद्यार्थ्यांना कृतिशिलतेमधून सोपे होणार आहेत.

कोरोनामुळे संपूर्ण देशातील परिस्थिती गंभीर बनत चालली आहे. यंदाच्या शैक्षणिक संत्राची सुरवात कधी होईल हे आताच सांगणे कठीण आहे. बहूतांश ठिकाणी ऑनलाईन शिकवण्याचा फंडा उपयुक्त ठरत आहे. मोबाईलला रेंज नाही, तेथे ऑफलाईन अभ्यासक्रम शिकवण्यात येत आहे. नियमित शिकवणीत विद्यार्थ्यांना गणित विषय नेहमीच कठीण असतो. सध्या शाळा बंद असल्यामुळे घरबसल्या मुलांना उपलब्ध साहित्याच्या आधारे विज्ञानाचे प्रयोग करता यावेत आणि त्यांच्या बुध्दीला चालना मिळावी या उद्देशाने शासनाच्या आयसर संस्थेने विशेष ऑनलाईन मार्गदर्शनाला आरंभ केला आहे. त्याचा पहिला पाठ 3 ऑक्टोबरला सुरु झाला आहे. पहिल्याच दिवशी तज्ज्ञ मार्गदर्शकांनी विज्ञान आणि गणिताशी निगडीत कृतिशिलतेच्या माध्यमातून शिकवणी दिली. विज्ञानाचा तास घेत असताना संबंधित शिक्षकांनी छोटे छोटे प्रयोग सादर केले. पुण्यातील आयसर संस्थेच्या मुख्य कार्यालयातून हे सादरीकरण करण्यात आले होते. राज्यभरातील लाखो लोकांनी याचा लाभ घेतला. त्यात शिक्षक, विद्यार्थी आणि पालक तिघांचाही समावेश होता. सोप्या भाषेत केलेले हे मार्गदर्शन निश्‍चितच सर्वांसाठी उपयुक्त ठरणारे आहे. उष्णतेच्या गमतीजमती या विज्ञानावर आधारीत मार्गदर्शनपर पहिल्याच कार्यक्रमात सोपे प्रयोग यावर करुन दाखवण्यात आले होते. त्यासाठी आवश्यक प्रयोगांचे साहित्य घरात उपलब्ध होईल असे होते.

राज्याचे शिक्षण आयुक्त विशाल सोळंकी म्हणाले की, शाळा बंद असल्यामुळे विद्यार्थ्यांचे होत असलेले शैक्षणिक नुकसान भरुन काढण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त आहे. आरंभीलाच 22 हजार लोकांनी याचा लाभ घेता. विज्ञान, गणिताची गोडी वाढविण्यासाठी याचा उपयोग होईल. हा कार्यक्रम दर शनिवारी होणार आहे.

हे पण वाचामॉडेल ॲक्‍टची घाई नाही : कृषी महाविद्यालये सुरू करण्याला चाप  

मैत्री विज्ञान-गणिताशी ऑनलाईन मार्गदर्शनाचा फायदा निश्‍चित शिक्षकांबरोबरच विद्यार्थ्यांना होणार आहे. सोप्या भाषेत आणि कृतीमधून विषय सुटसुटीत पध्दतीने शिकवला जातो. त्याचे विद्यार्थ्यांना आकलन होऊ शकते.

- संदिप कडव, उपशिक्षणाधिकारी, रत्नागिरी

 संपादन - धनाजी सुर्वे 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Iiser online experiment