सिंधुदुर्गात अवैध व्यवसायात होतीये वाढ ; पोलीस यंत्रणेवर प्रश्नचिन्ह

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 21 November 2020

दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्याबरोबरच अल्पवयीन मुलेही याकडे ओढले जाण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली.

देवगड (सिंधुदुर्ग) : तालुक्‍यात सध्या अवैध व्यवसाय बोकाळले आहेत. राजरोसपणे अवैध दारूची विक्री होत असल्याने पोलिसांचे यावर नियंत्रण नाही काय? असा संतप्त प्रश्‍न सदस्य सदाशिव ओगले यांनी येथील पंचायत समितीच्या मासिक सभेत उपस्थित केला. दारूमुळे तरुण पिढी व्यसनाधिनतेकडे वळण्याबरोबरच अल्पवयीन मुलेही याकडे ओढले जाण्याची भीती व्यक्‍त करण्यात आली. दरम्यान, कोरोना कालावधीत एकूणच झालेल्या खर्चाची ग्रामपंचायतनिहाय माहिती देण्याची मागणीही ओगले यांनी केली.

हेही वाचा -  मगरीनंतर आता घोरपडीची दहशत ; दिवसाढवळ्या होतंय दर्शन -

येथील पंचायत समितीची मासिक सभा सभापती सुनील पारकर यांच्या अध्यक्षतेखाली छत्रपती संभाजी महाराज सभागृहात झाली. मंचावर उपसभापती अमोल तेली, गटविकास अधिकारी जयप्रकाश परब होते. तालुक्‍यात अवैध दारूविक्री सुरू असल्याचा मुद्दा श्री. ओगले यांनी उपस्थित करून पोलीसांच्या सुमार कामगिरीबाबत नाराजी व्यक्‍त केली. याला सदस्या पूर्वा तावडे यांनी साथ देत दारूमुळे तरुण व्यसनाधीन बनत आहेत. अल्पवयीन मुलेही याकडे ओढली जाण्याची शक्‍यता 
व्यक्‍त केली. 

कोरोना काळात कोवीड केंद्रासह अन्य बाबींवर किती खर्च झाला याची ग्रामपंचायतनिहाय माहिती प्रशासनाने देण्याची ओगले यांनी मागणी केली. चुकीच्या कामाच्या तक्रारी काही लोकप्रतिनिधीच करतात आणि त्यांची बीले काढण्याचा आग्रहही काही लोकप्रतिनिधीच धरतात याबाबत चर्चा रंगली. यावर कामाबाबत कोणालाही पाठीशी घालणार नसल्याचे सभापतींनी सांगितले.

वाडा परिसरातील गुरांची संख्या लक्षात घेऊन तेथील पशुवैद्यकीय दवाखाना उघडा राहण्यासाठी किमान शिपाई असावा अशी मागणी पूर्वा तावडे यांनी केली. इळयेसडा - वरंडवाडी रस्ता तसेच जामसंडे पडेल रस्ता कामाची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. कार्यालयात आधीच अपूरी कर्मचारी संख्या असताना येथे दिलेल्या कर्मचाऱ्याला तातडीने कामगिरीवर काढले गेल्याकडे सदस्यांनी लक्ष वेधून याबाबत मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची भेट घेण्याची गरज व्यक्‍त केली.  

हेही वाचा - २३ नोव्हेंबरपासून विद्यार्थ्यांसाठी एसटीच्या फेऱ्या सुरू -

 

नोंदी अपूर्णावस्थेत

तालुक्‍यातील ग्रामपंचायतींना अचानक भेटी देऊन त्यांच्या नोंदी तपासल्या जाव्यात. त्यामुळे कामात सुसूत्रता येऊ शकेल, असे सदाशिव ओगले यांनी सांगितले. यावर काही ग्रामपंचायतींना अचानक दिलेल्या भेटीत त्यांच्या नोंदी अपूर्णावस्थेत आढळल्याची माहिती सभापतींनी दिली.

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal activities are increased in sindhudurg the working of police system questions in sindhudurg