कोकण : गुहागरात गोवा बनावटीची दारू पकडली

सकाळ वृत्तसेवा
Friday, 15 January 2021

विना परवाना मद्याची वाहतूक केल्याबद्दल रिक्षा चालकावर गुन्हा दाखल केला आहे. 

गुहागर (रत्नागिरी) : येथील पोलिसांना बोऱ्या फाटा येथे रिक्षेची तपासणी करताना 16,560 रुपये किंमतीच्या 5 डझन मद्याच्या बाटल्या जप्त केल्या आहे. सदर मद्य गोवा बनावटीचे आहे. ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही कारवाई पोलिसांनी केली. रिक्षा चालक नितेश दिनेश आरेकर यांच्यावर विना परवाना मद्याची वाहतूक केल्याबद्दल गुन्हा दाखल केला आहे. 

पोलीस कॉन्स्टेबल संतोष साळसकर यांनी दिलेल्या माहिती नुसार, बोऱ्या फाटा परिसरात मद्याची वाहतूक होत असल्याची टीप आर. ए. कांबळे यांना मिळाली पेट्रोलिंग करताना मिळाली होती. या माहितीवरून पोलीस निरीक्षक अरविंद बोडके, सहाय्यक पोलीस निरीक्षक बी. के. जाधव, हेडकॉन्स्टेबल आर. एल. कांबळे, दोन पंचांसह बोऱ्या फाटा येथे पाळतीवर थांबले होते. सायंकाळी 4 च्या सुमारास सुरळ मार्गे एक रिक्षा (क्र. एम एच 08 आर 9943) वेगाने येताना पोलिसांनी पाहिली. सदर रिक्षा थांबवून पोलीस तपासणी करत होते. त्यावेळी रिक्षामध्ये प्रवासी बसतात, त्या आसनामागील डिकीत मद्याचे खोके सापडले.

हेही वाचा - घर जमीन, झाडांचे मुल्यांकन योग्य पध्दतीने झाले नसल्याने त्यांच्यात नैराश्‍याचे वातावरण होते

 

त्यामध्ये मद्याचा 16,560 रुपये किंमतीच्या 60 बाटल्या सापडल्या. ही रिक्षा नितेश दिनेश आरेकर (वय 30, रा. नरवण भंडारवाडा) चालवीत होता. त्याच्याकडे मद्य वाहतुकीच्या परवान्याची विचारणा केली असता, कोणताही परवाना नसल्याचे नितेशने सांगितले. पोलिसांनी विना परवाना वाहतुकीसाठी वापरलेली 40 हजार रुपये मूल्याची रिक्षा आणि 16560 रुपये किंमतीचे मद्य असा एकूण 56560 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. नितेश आरेकर याच्यावर दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.  

 

संपादन - स्नेहल कदम 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: illegal alcohol found in auto on election situation in guhagar ratnagiri