अवैध धंद्यामुळे सुसंस्कृत सिंधुदुर्गचा आत्मा दूषित

शिवप्रसाद देसाई 
Monday, 12 October 2020

नजीकच्या काळात कोणत्याही मोठ्या निवडणुका किंवा कार्यक्रम नसल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याला फारसे प्राधान्य असणार नाही. मात्र, अवैध धंद्यांना रोखून सामाजिक स्वास्थ्य स्थिरस्थावर झाले तरी सिंधुदुर्गवासीय मोकळा श्‍वास घेऊ शकतील. 

सावंतवाडी (सिंधुदुर्ग) - फोफावलेला दारू धंदा, खुलेआम मटका जुगार यामुळे दूषित झालेले सामाजिक स्वास्थ्य रोखण्याचे आव्हान नवे पोलिस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यांच्यासमोर आहे. याच्या जोडीला गोव्याच्या अमली पदार्थ नेटवर्कचे सिंधुदुर्ग कनेक्‍शन असण्याच्या शक्‍यतेचीही जोड असेल. नजीकच्या काळात कोणत्याही मोठ्या निवडणुका किंवा कार्यक्रम नसल्याने कायदा-सुव्यवस्था राखण्याला फारसे प्राधान्य असणार नाही. मात्र, अवैध धंद्यांना रोखून सामाजिक स्वास्थ्य स्थिरस्थावर झाले तरी सिंधुदुर्गवासीय मोकळा श्‍वास घेऊ शकतील. 

सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या पोलिस अधीक्षकपदाला एक वलय आहे. आतापर्यंत जिल्ह्यात काम केलेले अनेक अधिकारी पुढे राज्यात चमकले. संजीवकुमार सिंघल, डॉ. निखिल गुप्ता, कैसर खलीद, संतोष रस्तोगी, मल्लिकार्जुन प्रसन्न, डॉ. रवींद्र शिसवे अशी त्यातील काही नावे. जिल्ह्यात आतापर्यंत बरेच थेट आयपीएस अधिकारी अधीक्षक म्हणून नियुक्‍त झाले.

नव्याने अधीक्षकपदाचा कार्यभार स्वीकारलेले राजेंद्र दाभाडे हे थेट आयपीएस नसले तरी त्यांनी गडचिरोली, ठाणे, मुंबई अशा ठिकाणी प्रभावी काम केले आहे. यामुळे सिंधुदुर्गाचे बिघडलेले सामाजिक स्वास्थ्य पुन्हा मिळवून देण्यात ते हातभार लावतील, अशी अपेक्षा व्यक्‍त करता येऊ शकते. 
जिल्ह्यातील गुन्हेगारी विश्‍वाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला तर फोफावलेले अवैध धंदे आणि त्याला खुलेआम मिळणारे पाठबळ प्रामुख्याने दिसते. सिंधुदुर्ग हा सुसंस्कृत जिल्हा आहे. येथे सामाजिक प्रदूषण होऊ देणे म्हणजे जिल्ह्याच्या मूळ ढाच्याला धक्‍का देण्यासारखे आहे.

वाढलेले अवैध धंदे जिल्ह्याच्या याच सुसंस्कृतपणाला आव्हान देत आहेत. यात खाकीचे अप्रत्यक्षरीत्या या प्रकारांना मिळणारे पाठबळ, भ्रष्ट यंत्रणा आणि अवैध धंदेवाल्यांमध्ये पोलिसांनी गमावलेला धाक ही प्रमुख कारणे आहेत. अवैध दारू वाहतूक ही गेली काही वर्षे जिल्ह्यासाठी डोकेदुखी ठरली आहे. गोव्यात या दारूची निर्मिती होते. तेथून अनेक राज्यांत ती बेकायदा वाहतुकीद्वारे पोचवली जाते. गोवा लगतचे राज्य असल्याने अर्थातच सिंधुदुर्ग या वाहतुकीमधला महत्त्वाचा दुवा ठरत आहे. त्यामुळे इथल्या भ्रष्ट यंत्रणेला हाताशी धरून जिल्ह्यातच या दारू वाहतुकीसाठीची यंत्रणा उभारली गेली.

यासाठी मोठ्या प्रमाणात इथल्या तरुणांचा वापर होत आहे. त्यातून अनेक सामाजिक प्रश्‍न निर्माण झाले आहेत. अनेक तरुण गैरमार्गाला लागले आहेत. दारू वाहतुकीत सहभाग असल्याने सिंधुदुर्ग पोलिस विभागातील कर्मचाऱ्यांना निलंबित केल्याच्या घटना गेल्या काही वर्षांत वारंवार घडताना दिसतात. यावरून दारू रोखणारी यंत्रणा भ्रष्टाचाराने किती पोखरली आहे, याचा प्रत्यय येतो. हिच बनावट दारू जिल्ह्यातही विकली जाते. त्यात वापरल्या गेलेल्या निकृष्ट रसायनांमुळे अनेकांना प्राण गमवावे लागल्याचे चित्र आहे. यातून कित्येक संसार उद्‌ध्वस्त झाले आहेत. 

जुगार, मटका याचाही स्वैरसंचार जिल्ह्यात आहे. जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात मटक्‍याचे अड्डे सुरू आहेत. रोज यातून लाखो रुपयांची उलाढाल होत आहे. अनेक जण कंगाल झाले आहेत. जुगाराचे अड्डे तर अनेक भागांत पाहायला मिळतात. विशेषतः गोव्याच्या सीमाभागात याचे प्रमाण जास्त आहे. जागा बदलून हे अड्डे चालविले जातात. यावरही पोलिसांचे कोणतेच नियंत्रण नसल्याचे चित्र आहे. 

अमली पदार्थांचे डंपिंग स्टेशन सिंधुदुर्ग बनल्याचा संशय काही वर्षे सातत्याने व्यक्‍त केला जात आहे. सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणानंतर याला पुन्हा वाचा फुटली. या प्रकरणातील ड्रग्सचे कनेक्‍शन गोव्याशी जोडले गेले आहे. गोवा हे अमली पदार्थांचे गेल्या काही वर्षांपासूनचे ट्रेडिंग सेंटर आहे. मात्र, ते स्वतंत्र राज्य असल्याने याठिकाणी राज्य आणि केंद्राच्या विविध तपास यंत्रणा सक्रिय असतात. अशावेळी तेथे अमली पदार्थ साठवून ठेवणे जोखमीचे असते. त्यामुळे हे अमली पदार्थ माफिया सिंधुदुर्गात याचा साठा करीत असल्याचा संशय आहे. राजपूत प्रकरणातही गोव्याच्या तपास यंत्रणांनी तसा संशय व्यक्‍त केला होता. त्या दिशेनेही तपासाचे आव्हान असेल. 

झारीतील शुक्राचार्य शोधा 
जिल्ह्यात सध्या बहुसंख्य अधिकारी ठाणे आणि मुंबईत काम केलेले आहेत. श्री. दाभाडे यांची बरीच कारकीर्द याच भागात गेली आहे. त्यामुळे कामाच्या पातळीवर अधिकाऱ्यांशी समन्वय साधणे त्यांना फारसे अवघड जाणार नाही. मात्र, पोलिस दलातील "झारीमधले शुक्राचार्य' शोधण्यात ते किती यशस्वी होतात, यावरच बरेच काही अवलंबून असेल. अनेक पोलिस कर्मचारी दीर्घकाळ ठाण मांडून आहेत. यातील काही भ्रष्ट कर्मचाऱ्यांनी या अवैध धंद्यांना पोषक अशी साखळी तयार केली आहे. 

सीमा भागात मक्तेदारी 
विशेषतः गोव्याच्या सीमा भागात असणाऱ्या पोलिस ठाण्यात झारीतील शुक्राचार्यांची संख्या मोठी आहे. त्यांना शोधून ही मक्‍तेदारी मोडीत काढली तर बऱ्याच प्रमाणात अवैध धंदे थोपविणे शक्‍य होईल. सुसंस्कृतपणा हा सिंधुदुर्गाचा आत्मा आहे. तो पवित्र ठेवण्याची मुख्य जबाबदारी खाकीकडे आहे. नव्या पोलिस अधीक्षकांनी हे आव्हान पेलत अवैध धंद्यांना आवर घातल्यास जिल्ह्यातील त्यांची कारकीर्द नक्‍कीच यशस्वी होईल. 

नव्या अधीक्षकांची कारकीर्द 
- गडचिरोली, सातारा, रायगड, मुंबईत काम 
- बढतीने आयपीएस म्हणून नियुक्त 
- मुंबई गुन्हे शाखा, सायबर क्राईममध्ये प्रभावी सेवा 

सिंधुदुर्गाची नैसर्गिक संपन्नता पर्यटकांना आकर्षित करते. सर्वांच्या सहकार्यातून चांगले काम करू. गडचिरोलीत नक्षलवाद रोखण्यासह आणखी नक्षली तयार होऊ नये, यासाठी काम करावे लागत असे. यात प्रबोधन महत्त्वाचे ठरते. येथेही कारवाई आणि सामाजिक बांधिलकीची सांगड घालून काम करू. 
- राजेंद्र दाभाडे, पोलिस अधीक्षक, सिंधुदुर्ग 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Illegal business in Sindhudurg district