
वैभववाडीत चोरट्यांचा उच्छाद
वैभववाडी - चोरट्यांनी तालुक्यात धुडगूस घालत सात दुकाने व दोन बंद घरे फोडली. त्यात तहसीलदारांचे शासकीय निवासस्थानही लक्ष्य केले. दोन दुचाकी, रोख रकमेसह सुमारे तीन लाखांचा मुद्देमाल चोरून नेला. एका दुकानाच्या सीसीटीव्हीमध्ये चोरटे कैद झाले आहेत. या चोरीमुळे खळबळ उडाली असून, शहरातील सुरक्षेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
शहरात शुक्रवारी (ता. १५) रात्री चोरट्यांनी धुमाकूळ घातला. करुळ येथील विजय पाटील यांच्या किराणा मालाच्या दुकानाचे पुढील लोखंडी शटर चोरट्यांनी तोडले. दुकानातील टेबलाच्या ड्रॉव्हरमधील रोख २४ हजार चोरले. हा प्रकार आज सकाळी निदर्शनास आला. शरद सावंत यांची बीअर शॉपीही फोडली; मात्र तेथे चोरट्यांच्या हाती फारशी रक्कम लागली नाही. करुळनंतर वैभववाडी शहरातील पाच दुकाने व दोन बंद घरे फोडली. संतोष कोलते यांचे स्वरगंगा इलेक्ट्रिकल्स, गोखले हॉटेल, वैभव स्टील सेंटर, नितिराज जनरल स्टोअर, मच्छीमार्केटजवळील रूपाली ज्वेलर्स या पाच दुकानांची शटर्स चोरट्यांनी उचकटली; मात्र या दुकानांतून काहीच चोरीला गेले नाही. बँक ऑफ महाराष्ट्रच्या मागील बाजूस असलेले अशोक कुबडे यांचे बंद घर चोरट्यांनी फोडले.
कुबडे कुटुंब रत्नागिरी येथे गेल्याने घर बंद होते. चोरट्यांनी त्यांच्या घरातील दोन लाख १८ हजार किमतीच्या चार तोळे वजनाच्या सोन्याच्या दोन बांगड्या चोरल्या. शहरातील प्रभाग एकमध्ये असलेले तहसीलदारांचे शासकीय निवासस्थानासही चोरट्यांनी लक्ष्य केले; मात्र येथीलही कुठलीही वस्तू चोरीस गेली नाही. वैभववाडी बाजारपेठेलगत माईणकरवाडीत राहणारे सुभाष सावंत यांची दुचाकी चोरट्यांनी नेली. घराशेजारील शेडमध्ये दुचाकी उभी केली होती. खांबाळे-साळुंखेवाडी येथील संजय साळुंखे यांच्या अंगणातील दुचाकीही चोरून नेली. पोलिस निरीक्षक अतुल जाधव, मारुती साखरे, अभिजित तावडे, नितीन खाडे, संदीप राठोड यांनी पाहणी करून पंचनामा केला.
चोरटे सीसीटीव्हीत कैद
शहरातील संभाजी चौक आणि दत्तमंदिर चौकात पोलिसांचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत. शिवाय रात्री पोलिस गस्तीवर असतात. तरीही शहरातील मुख्य रस्त्यावरील पाच दुकानांची शटर्स तोडली गेली. स्वरगंगा इलेक्ट्रॉनिक्सच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्य़ात चोरटे कैद झाले आहेत. त्यावरून पहाटे चोरट्यांनी डाव साधल्याचे स्पष्ट झाले आहे.
श्वान पथक अपयशी
शहरातील चोरी झालेल्या दुकानमालकांनी पोलिसांत तक्रार देणे टाळले; मात्र या प्रकारामुळे पोलिस चक्रावले आहेत. चोरीची घटना उघड होताच सकाळी शहरात श्वानपथक व ठसे तज्ज्ञ दाखल झाले; मात्र त्यांच्या हाती ठोस काही लागले नाही. त्यामुळे या चोरीचा तपास करणे पोलिसांसमोर आव्हान आहे.
Web Title: In Vaibhavwadi Thieves Broke Into Seven Shops And Two Closed Houses
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..