लागवडीयोग्य जमीन, पोषक वातावरणाचा शेतकऱ्यांनी उठवला `असा` लाभ

एकनाथ पवार
Saturday, 29 August 2020

शासनाने 1990 मध्ये 100 टक्के अनुदानावर फलोद्यान योजना राज्यभरात राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काजू लागवड करण्यात आली; परंतु त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये जागृती नव्हती.

वैभववाडी (सिंधुदुर्ग) - लागवडीयोग्य जमीन, पोषक वातावरण आणि शेतकऱ्यांना काजू लागवडीतून चांगले उत्पादन मिळते. यामुळे जिल्ह्यात दहा-बारा वर्षांत काजू लागवडीकडे शेतकऱ्यांचा कल वाढला आहे. अलीकडच्या दोन-तीन वर्षांत तर काजू लागवडीखालील क्षेत्रात दरवर्षी पाच हजार हेक्‍टरने वाढ होताना दिसत आहे. 

शासनाने 1990 मध्ये 100 टक्के अनुदानावर फलोद्यान योजना राज्यभरात राबविली. या योजनेंतर्गत जिल्ह्यातील अनेक गावांमध्ये काजू लागवड करण्यात आली; परंतु त्यावेळी शेतकऱ्यांमध्ये जागृती नव्हती. पारंपरिक काजू पद्धतीनुसारच बहुतांशी शेतकऱ्यांनी काजू लागवड केली. काहींनी अनुदान, खते, रोपे मिळतात म्हणून लागवड केली; परंतु खऱ्या अर्थाने काजू क्रांतीची चळवळ वेंगुर्ले फळसंशोधन केंद्राने विकसीत केलेल्या काजू कलमांच्या लागवडीनंतर सुरू झाली.

वेंगुर्ला 1 पासून वेंगुर्ला 7 पर्यंतच्या अनेक काजूच्या जाती विकसीत केल्या. त्यातील 4 आणि 7 या जाती शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरल्या. सुरूवातीच्या काळात काही मोजक्‍या शेतकऱ्यांनी या काजूलागवडीचा प्रयोग आपआपल्या जमिनीत केला. तीन चार वर्षानंतर लागवड केलेल्या शेतकऱ्यांच्या झाडांपासून चांगले उत्पादन मिळू लागल्याचे चित्र इतर शेतकऱ्यांना दिसू लागले. तिथपासून जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा काजू लागवडीचा कल वाढू लागला. 

दरवर्षी काजू लागवडीचे क्षेत्र वाढू लागले. पडीक जमिनी अनेकांनी लागवडीखाली आणल्या. शेतकऱ्यांसह काही उद्योगपती काजू लागवडीत उतरले. त्यांनी अतिशय नियोजनबद्ध लागवड करून काजू हा उत्तम व्यवसाय असल्याचे सिद्ध केले. त्यामुळे स्थानिक शेतकऱ्यांनीही काजू लागवडीची पद्धत बदलली. कृषी विभाग, काजू तज्ज्ञांच्या सल्ल्याने फायदेशीर पद्धतीने लागवडीस सुरूवात केली. जिल्ह्यातील वातावरण कमी-अधिक फरकाने प्रत्येक तालुक्‍यात वेगळे आहे.

त्यामुळे प्रत्येक तालुक्‍यात वेगवेगळी पिके घेतली जातात; मात्र काजू पिक जिल्ह्याच्या सर्व भागात चांगल्या पद्धतीने होते. त्यामुळेच जिल्ह्यात सर्वत्र काजू पिकाला प्राधान्य दिले जात आहे. 2016-17 पर्यंत जिल्ह्यात 59 हजार हेक्‍टर क्षेत्र काजू पिकाखाली होते. त्यामध्ये आता वाढ झाली आहे. सध्या काजू लागवडीखालील क्षेत्र हे सुमारे 72 हजाराच्यावर पोहोचले आहे. 

क्षेत्रात झपाट्याने वाढ 
काजू लागवडीसाठी सध्या एमआरजीएस योजना वगळता अन्य कुठलीही योजना अस्तित्वात नाही. तरीही यावर्षी एमआरजीएस योजनेंतर्गत 2 हजार 100 हेक्‍टर लागवड झाली. याशिवाय खाजगी लागवड देखील झाली आहे. सामाजिक आणि सेवाभावी संस्थांनीही काजू क्रांतीसाठी प्रयत्न सुरू केले असून त्यांनी देखील हजारो काजू रोपांचे वाटप शेतकऱ्यांना केले आहे. त्यामुळे एकप्रकारे काजूचे क्षेत्र झपाट्याने वाढत आहे. 

रोपवाटीकांमध्ये वाढ 
जिल्ह्यात काजू लागवडीखालील क्षेत्राबरोबरच काजू रोपवाटीकांमध्येही वाढ झाली आहे. जिल्ह्यात शासकीय रोपवाटीका व्यतिरिक्त शंभरहून अधिक रोपवाटीका तयार झाल्या. या रोपवाटीकांच्या माध्यमातून शेकडो लोकांना रोजगार मिळाला आहे. 

भातपीक हेच आमचे प्रमुख पिक होते; परंतु भात पिकांवर होणारा खर्च आणि मिळणारे उत्पादन याचा ताळमेळ कधीच बसला नाही. त्यामुळे भातपिकासोबत आता काजू लागवड केली आहे. काजू लागवड क्षेत्रात दरवर्षी थोडी थोडी वाढ केली जाते. 
- सज्जन माईणकर, काजू बागायतदार 

संपादन - राहुल पाटील


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Increase in cashew cultivation in Sindhudurg district