increased electricity bill against movement in ratnagiri the political leaders support this
increased electricity bill against movement in ratnagiri the political leaders support this

'वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा ; अन्यथा ऊर्जामंत्र्यांना फिरू देणार नाही'

रत्नागिरी : वीज बिल माफीसाठी काढलेला मोर्चा हा फक्‍त ट्रेलर आहे, पिक्‍चर अभी बाकी है, असे सांगत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते, खेडचे नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांनी सरकारला इशारा दिला. वीज बिल माफीचा निर्णय घ्यावा; अन्यथा ऊर्जामंत्र्यांना फिरू देणार नाही. जिल्ह्यात यापेक्षाही उग्र आंदोलन करू, असे त्यांनी मनसेच्या मोर्चाप्रसंगी जाहीर केले.

‘वीज बिल माफी झालीच पाहिजे...’ ‘राजसाहेब अंगार हाय, बाकी सब भंगार...’, ‘कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहणार नाही’, अशा घोषणा देत मनसेने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढत शक्‍तिप्रदर्शन केले. जिल्ह्याचे मनसेचे नेते नगराध्यक्ष वैभव खेडेकर, दक्षिण जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण, उपजिल्हाध्यक्ष रूपेश सावंत यांच्यासह सर्व तालुकाध्यक्ष, शहराध्यक्षांसह शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत हा मोर्चा काढण्यात आला.

मारुती मंदिर येथून मोर्चाला सुरुवात झाली. मनसे कार्यकर्ते आक्रमक होतील, अशी शक्‍यता असल्याने पोलिसांचा कडक बंदोबस्त ठेवला होता. खेडेकर म्हणाले, 'अनेकांना वाटत होते की मनसे आहे कुठे? मोर्चा कसा निघणार? पण हा विशाल मोर्चा पाहिल्यानंतर राज्यकर्त्यांना धडकी भरली असेल. कोरोना काळात एकमेव मनसे पक्ष रस्त्यावर उतरून काम करत होता. बाकी पक्षांचे खासदार, आमदार घरी क्वारंटाईन झाले. परप्रांतीयांना घरी पाठवण्यासाठी राज्यातील याच सरकारने पैसे खर्च केले; पण मुंबईतील चाकरमान्यांना घरी आणण्यासाठी पैसे नव्हते. जिल्ह्याचे पालकमंत्री ॲड. अनिल परब हे परिवहनमंत्री आहेत; पण त्यांनाही निर्णय घेता आला नाही. ते साडेचार दिवसांचे पालकमंत्री आहेत. तीच स्थिती राज्यातील वीज ग्राहकांची आहे.'

हातात भगवे झेंडे 

मनसे कार्यकर्त्यांच्या खांद्यावर भगवा पट्टा, हातात भगवे झेंडे असे चित्र या मोर्चामध्ये पाहायला मिळत होते. त्यामुळे हा परिसर भगवामय झाल्यासारखाच दिसत होता.
 

सगळ्या भूलथापा

मुख्यमंत्री म्हणाले, वीज बिलात सूट देणार. ऊर्जामंत्री यांनी १०० युनिट माफ करतो, असे सांगितले. कुणी म्हणाले, दिवाळीत गोड बातमी देणार. पण त्या सगळ्या भूलथापा होत्या. वीज बिल माफीचे श्रेय कुणाला मिळू नये, यासाठी सरकार हा निर्णय घेत नाही. वीज बिल माफ केले नाही, तर मंत्र्यांना फिरू देणार नाही. ग्राहकांनीही वीज बिल भरू नये, असेही आवाहन खेडेकर यांनी केले. 

जितेंद्र चव्हाण म्हणाले...

  •  आघाडी सरकार सर्वच क्षेत्रांत ठरले अपयशी 
  •  वीज बिल माफ करण्याचे आश्वासन सरकारने  दिले
  •  ते आता माफ करणार नाही, असे सरकारनेच जाहीर केले. 
  •  जनतेला जागरूक करण्यासाठी आजचे हे आंदोलन

संपादन - स्नेहल कदम 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com