
अन्न म्हणून आदिम बियाणांचे स्थान खूप महत्त्वपूर्ण आहे. आंतरराष्ट्रीय अन्न आणि शेती संघटनेनुसार जगातील प्रत्येक व्यक्तीला अन्न मिळण्याचे काही निकष आहेत. हे सारे आदिम बियाण्यांपासून तयार होणाऱ्या अन्नाला लागू होतात. सर्वांत प्रथम म्हणजे जगातील प्रत्येक व्यक्तीला अन्न सहज उपलब्ध व्हावे आणि ते सहज परवडणाऱ्या दरात उपलब्ध व्हावे त्याकरिता हे अन्न स्थानिक पातळीवर पिकवलेले असावे. हे अन्न त्या व्यक्तीची भूक भागवणारे त्याचबरोबर त्याच्या शरीराला पोषण देणारे असावे. या पोषणामुळे त्या व्यक्तीचे आरोग्य उत्तम राहावे आणि त्याचा आजारांपासून बचाव व्हावा. हे अन्न पिकवणाऱ्या शेतकऱ्याला त्याची उपजीविका उत्तम राखता यावी. हे सारे करत असतानाच पर्यावरणाचे रक्षण व्हावे, कार्बन फूटप्रिंट कमीत कमी असावे. आदिम बियाण्यांपासून केलेली शेती आणि त्यापासून उत्पादित केलेले अन्न या सर्व निकषांवर खरे उतरते.
- कुणाल अणेराव, वरिष्ठ प्रकल्प अधिकारी सृष्टीज्ञान संस्था