परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची घुसखोरी ; अंधाराचा फायदा घेत पुन्हा एकदा गस्ती नौकेवर हल्ला 

Infiltration of offshore high speed trawlers Taking advantage of the darkness again attacked the patrol boat kokan marathi news
Infiltration of offshore high speed trawlers Taking advantage of the darkness again attacked the patrol boat kokan marathi news
Updated on

मालवण : जिल्ह्याच्या सागरी हद्दीत निवती रॉकनजीकच्या 16 वाव समुद्रात काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या दरम्यान पुन्हा एकदा मत्स्यव्यवसायच्या ‘शीतल’गस्ती नौकेला परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी घेरत हल्ला करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली आहे. परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सच्या या दहशतीमुळे मत्स्यव्यवसाय विभाग कारवाई करण्यास पुन्हा असमर्थ ठरला. मात्र काही हायस्पीड ट्रॉलर्सचे नंबर मिळविण्यात मत्स्यव्यवसाय विभागाला यश आले आहे. या घटनेची गंभीर दखल घेत याबाबतची तक्रार मुंबईतील सागरी पोलिस ठाणे तसेच येथील पोलिस ठाण्यात करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी दिली. 


याबाबतची माहिती अशी

जिल्ह्याच्या सागरी हद्दीत गेले काही महिने परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सचे अतिक्रमण वाढले आहे. त्याचबरोबर एलईडी दिव्यांच्या साहाय्याने अवैधरीत्या मासेमारी सुरू आहे. या अवैध मासेमारीमुळे स्थानिक पारंपरिक मच्छीमारांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे हायस्पीडचे अतिक्रमण रोखण्याबरोबरच एलईडी दिव्यांच्या साहाय्याने होणारी अवैध मासेमारी विरोधात कडक कारवाई व्हावी यासाठी अखिल महाराष्ट्र मच्छीमार कृती समितीच्यावतीने गेले तीन दिवस येथील सहायक मत्स्यव्यवसाय कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू आहे. 


या उपोषणाच्या पार्श्‍वभूमीवर काल रात्री येथील मत्स्यव्यवसाय कार्यालयाचे सहायक मत्स्यव्यवसाय आयुक्त ना. भि. भादुले, मालवणचे परवाना अधिकारी मुरारी भालेकर, देवगडचे परवाना अधिकारी रवींद्र मालवणकर यांच्यासह अन्य कर्मचारी शीतल गस्तीनौकेच्या साहाय्याने समुद्रात गस्त घालण्यास गेले होते. त्यांना मध्यरात्री दोन वाजण्याच्या दरम्यान निवती रॉकनजीकच्या सुमारे 16 वाव समुद्रात परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सद्वारे अवैधरीत्या मासेमारी केली जात असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांनी गस्तीनौकेद्वारे त्या हायस्पीड ट्रॉलर्संना गाठत त्यांच्याकडून माहिती घेण्यास सुरवात केली असता परिसरात अवैधरीत्या मासेमारी करणार्‍या सुमारे 35 हून अधिक हायस्पीड ट्रॉलर्सनी मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेला घेरत हल्ला करण्याचा प्रयत्न केला. यात काही हायस्पीड ट्रॉलर्संना थांबविण्याचा मत्स्यव्यवसायच्या गस्तीनौकेने प्रयत्न केला मात्र त्यांना पकडण्यात गस्तीनौकेला यश मिळाले नाही.

अन्य नौकांनी घेरल्याने गस्तीनौकेवरील मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी दोन ते तीन हायस्पीड ट्रॉलर्सचे क्रमांक मिळविण्यात यश मिळविले. मात्र हायस्पीड ट्रॉलर्सधारकांच्या दहशतीमुळे मत्स्यव्यवसाय विभागाला त्यांना पकडण्यात अपयश आले. गस्तीनौकेने कशीबशी आपली सुटका करून घेत माघारी परतण्याचा निर्णय घेतला. परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सच्या गस्तीनौकेवर हल्ल्याच्या प्रयत्नामुळे एकच खळबळ उडाली आहे. याबाबतची तक्रार मुंबईतील सागरी पोलिस ठाणे तसेच येथील पोलिस ठाण्यात करण्यात येणार असल्याची माहिती मत्स्यव्यवसायच्या अधिकार्‍यांनी दिली. 


गेली काही वर्षे परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सच्या घुसखोरीबाबत पारंपरिक मच्छीमारांकडून सातत्याने आवाज उठवीत शासनाकडे कारवाईची मागणी केली जात आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेवर यापूर्वीही परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सनी हल्ला करण्याचा प्रयत्न केला आहे. मत्स्यव्यवसाय विभागाच्या गस्तीनौकेचा वेग आणि हायस्पीड ट्रॉलर्सचा वेग पाहता गस्तीनौकेला हायस्पीड ट्रॉलर्स पकडणे अशक्य बनत आहे. शिवाय समुद्रातील परप्रांतीय हायस्पीड ट्रॉलर्सची ही दहशत वाढतच चालली असून त्याला चाप लावण्याचे मोठे आव्हान शासनासमोर आहे. यात आता शासनाकडून कोणते पाऊल उचलले जाते याकडे लक्ष लागून राहिले आहे.

संपादन- अर्चना बनगे

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com